(म्हणे) ‘पुणे विद्यापिठाला शनिवारवाड्याऐवजी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचा लोगो लावा !’ – डॉ. भारत पाटणकर

सातारा, १० जानेवारी (वार्ता.) – पुणे विद्यापिठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले असले, तरी विद्यापिठाच्या कामकाजातील कागदपत्रांवर अजूनही शनिवारवाड्याचा लोगो छापण्यात येत आहे. तो तात्काळ पालटून तेथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचा लोगो लावण्यात यावा, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. (शनिवारवाडा हा मराठ्यांच्या इतिहासाचे वैभव आहे. तो वगळण्याची मागणी करण्यामागे काहीतरी षड्यंत्र आहे, असेच जनतेला वाटते. डॉ. पाटणकर यांनी उद्या ‘शनिवारवाडा पाडण्याची अनुमती द्या’, अशी मागणी पत्रकार परिषद घेऊन केल्यास आश्‍चर्य वाटायला नको ! – संपादक)

डॉ. भारत पाटणकर पुढे म्हणाले की,

१. थोरल्या बाजीराव पेशव्यांनंतर शनिवारवाडा हा जातीयवाद, पिळवणूक, दडपशाही आणि अत्याचाराचे केंद्रबिंदू होता. अशा शनिवारवाड्याचा ‘लोगो’ विद्यापिठाने अवलंबला आहे. आता कर्मभूमीतील सावित्रीबाई फुले यांचे नाव विद्यापिठाला देण्यात आले आहे. शिवाजी विद्यापिठाच्या धर्तीवर सावित्रीबाईंचा लोगो विद्यापिठाने कागदपत्रांवर छापला पाहिजे, अशी मागणी अनुमाने १५ संघटना करत आहेत; मात्र पुण्यातील ब्राह्मण सभेच्या अध्यक्षांनी लोगो पालटण्याची चर्चाही संघटनांच्या प्रतिनिधींशी करू नये, असे सांगितले आहे.

२. वास्तविक त्यांनी व्यक्ती म्हणून हे विचार मांडले असते, तर समजू शकलो असतो; मात्र एखाद्या समाजाचे प्रतिनिधी म्हणून जेव्हा ते भूमिका मांडतात, तेव्हा त्यांच्या हेतूविषयी शंका निर्माण होते. (ब्राह्मणद्वेषाने पछाडलेल्या डॉ. भारत पाटणकर यांचे हे वक्तव्य म्हणजे, चोराच्या उलट्या बोंबा ! – संपादक) थोरल्या बाजीरावांविषयी इतर समाजाने कधीही आक्षेप नोंदवले नाहीत; मात्र त्यांच्यानंतर शनिवारवाड्याने जातीयवादाला खतपाणी घातले. गळ्यात मडके आणि हातात खराटा देऊन पेशवे कायम जातीव्यवस्थेच्या बाजूने उभे राहिले. (याचा पुरावा पाटणकर यांच्याकडे आहे का ? – संपादक) शनिवारवाड्याचा शिक्षणाचा कधीही संबंध आला नाही. अशा शनिवारवाड्याचा ‘लोगो’ किमान सावित्रीबाई फुले यांच्या नामकरणानंतर तरी पालटण्यात यावा. ही मागणी मान्य न झाल्यास पूर्ण शक्तीने लढा तीव्र करण्यात येईल.


Multi Language |Offline reading | PDF