प्रशासनाचा रंग कोणता ?

युपीएस्सी परीक्षेमध्ये अव्वल क्रमांक पटकावणारे आएएस् अधिकारी शाह फैजल यांनी सेवेचे त्यागपत्र दिले आहे. काश्मिरी असणारे फैजल राजकारणात उतरण्याची शक्यता असून येणार्‍या लोकसभा निवडणुकीत त्यांना नॅशनल कॉन्फरन्सकडून उमेदवारी मिळणार असल्याचे वृत्त आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती कुठल्या तरी राजकीय विचारांशी जोडलेली असते अथवा तिला कुठल्या तरी राजकीय व्यक्तीचे विचार आवडत असतात. ‘प्रशासकीय व्यवस्था ही निधर्मी असून तेथे कुठल्याही राजकीय विचारांना थारा नाही’, असे जरी म्हटले जात असले, तरी उपरोक्त नियम प्रशासनातील अधिकारी-कर्मचार्‍यांनाही लागू होतो. आतापर्यंत बर्‍याच आयएएस् किंवा आयपीएस् अधिकार्‍यांनी राजकारणात प्रवेश केला अथवा त्यांनी कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या तिकिटावरून निवडणूक लढवली आहे. या पार्श्‍वभूमीवर शाह फैजल यांच्या या निर्णयाकडे आश्‍चर्याने पहाण्याची तशी आवश्यकता नव्हती; मात्र नोकरीचे त्यागपत्र देतांना त्यांनी जी मुक्ताफळे उधळली, त्यामुळे पुन्हा एकदा ‘असहिष्णुता’, ‘हिंदूंमधील कथित धर्मांधता’ आदी सूत्रांवर समाजमाध्यमांवर चर्चा रंगू लागल्या आहेत. काश्मीर खोर्‍यात होणार्‍या हत्या आणि त्याविषयी केंद्र सरकारकडून कुठलीही विश्‍वासार्ह कृती न होणे, हे त्यांनी त्यागपत्रामागील कारण सांगितले आहे. आता ‘हे ठार झालेले काश्मिरी तरुण म्हणजे आतंकवाद्यांच्या हातून मारले गेलेले हिंदु तरुण नसून पाकप्रेमापायी भारतीय सैनिकांवर दगड फेकणारे, जिहादसाठी रायफली हातात घेणारे काश्मिरी धर्मांध तरुण आहेत’, हे वेगळे सांगायला नको. ‘भारतातील २० कोटी मुसलमानांना म्हणे हिंदुत्व शक्तींकडून दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात आहे’, असेही फैजल यांचे म्हणणे आहे. त्यांच्या या विचारांवरून त्यांच्यातील धर्मांध मनोवृत्ती लक्षात येते. फैजल हे पेशाने आधुनिक वैद्य आहेत, तसेच ते अमेरिकेतील हॉवर्ड केनेडी स्कूलमधूनही उच्च शिक्षण घेऊन परतले आहेत. थोडक्यात सांगायचे तर सर्व प्रकारचे पुस्तकी आणि व्यवहारी ज्ञान त्यांच्या गाठी असूनही त्यांच्या धर्मांध वृत्तीत पालट झालेला नाही. ‘मुसलमान हा प्रथम मुसलमान असतो आणि नंतर तो आधुनिक वैद्य, उद्योजक किंवा सनदी अधिकारी असतो’, हे फैजल यांच्या धर्मांध विचारांतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले. अशा विचारांच्या अधिकार्‍यांचा व्यवस्थेत भरणा असेल, तर ‘या प्रशासनाचा रंग हिरवा आहे’, असे म्हटल्यास चूक ते काय ?

प्रशासनाचे हिरवेकरण !

वर्ष २०१४ मध्ये भाजप सत्तेवर आल्यानंतर ‘शिक्षणाचे भगवेकरण’ ‘प्रशासनाचे भगवेकरण’ अशा प्रकारचे शब्दप्रयोग वारंवार वापरले जातात. प्रशासनात ‘संघ’,  ‘भाजपधार्जिणे’ आणि ‘ब्राह्मण’ लोकांचा भरणा असल्यामुळे व्यवस्थेचे भगवेकरण झाल्याचे निधर्मीवादी आणि हिंदुद्वेषी घटक यांचे म्हणणे आहे. त्यांच्या विचारातील फोलपणा फैजल यांच्या या वक्तव्यावरून दिसून येतो. फैजल हे काश्मीरमधील गृह खात्यात कार्यरत होते, तसेच त्यांनी काही काळ जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले, तसेच ते शिक्षण विभागातही कार्यरत होते. या सर्व क्षेत्रात कार्यरत असतांना त्यांनी दृष्टीकोन कसा ठेवला असेल ? ‘धर्मांध युवकांकडून भारतीय सैन्यावर दगडफेक करण्याचे एक प्रकारे समर्थन करणार्‍या व्यक्तीने शिक्षणक्षेत्रात कार्यरत असतांना विद्यार्थ्यांसाठी कोणती धोरणे राबवली असतील ?’, असे प्रश्‍न ‘शिक्षणाचे भगवेकरण’ अशी आरोळी ठोकणारे महाभाग उपस्थित करतांना दिसत नाहीत. धर्मांध, हिंदुद्वेषाने पछाडलेली, राष्ट्रघातकी विचारांची व्यक्ती प्रशासनात कार्यरत असल्याचे हे काही एकमेव उदाहरण नाही. उच्चपदस्थ पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले शमशुद्दीन मुश्रीफ यांनी ‘हू किल्ड करकरे ?’ हे पुस्तक लिहून स्वतःचा हिंदुद्वेषाचा कंड शमवून आतंकवाद्यांचा उदोउदो केला. पोलीसदलात असे अधिकारी कार्यरत असतांना कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा उडाल्यास नवल ते काय ? मात्र अशा वेळी ‘पोलीसदलाचे हिरवेकरण झाले’, असे कुठल्याही बुद्धीजीवी अथवा पुरोगामी टोळ्यांना वाटले नाही. सत्य परिस्थिती अशी आहे की, भाजप जरी सत्तेत असला, तरी प्रशासनातील अनेक महत्त्वपूर्ण हुद्द्यांवर साम्यवादी आणि धर्मांध मनोवृत्तीचे अधिकारी कार्यरत आहेत. अशांचा भरणा असलेली व्यवस्था राष्ट्रहित काय साधणार ?

व्यवस्थेत पालट हवा !

लोकशाहीत प्रत्येक ५ वर्षांनी निवडणुका होतात आणि लोक शासनकर्ते निवडतात. असे असले, तरी ते ज्या अधिकारी-कर्मचार्‍यांना घेऊन लोकाभिमुख कारभार करण्याचे आश्‍वासन देतात, त्यांना निवडण्याचा अधिकार लोकांना नाही. पाच वर्षांनी सत्तापालट होतो; मात्र प्रशासनात कोणताही पालट होत नाही. फैजल यांची राष्ट्रघातकी मनोवृत्ती काही नवीन नाही. त्यांनी बर्‍याच वेळा उघडपणे राष्ट्रघातकी विचार मांडले आहेत; मात्र त्यांच्यावर कारवाई झाली नाही. मुळात अशांवर कारवाई होण्याची तरतूदच आपल्या व्यवस्थेत नाही. एखादा अधिकारी भ्रष्ट, कामचुकार, धर्मांध, राष्ट्रघातकी मनोवृत्तीचा असला, तरी त्याला खपवून घेण्याविना लोकांकडे पर्याय नसतो. फैजलसारख्या अधिकार्‍यांना म्हणे भारतात असुरक्षित वाटते. वास्तविक काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षित आहेत कि धर्मांध ? ‘इसिसचे झेंडे फडकावणारे आणि ‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हणणार्‍या तरुणांच्या गळ्यात भारतीय सैनिकांना हार घालून त्यांची आरती करावी’, असे फैजल यांना वाटते का ? कितीही शिक्षण घेतले, तरी इतरांची संस्कृती, त्यांचे आचार-विचार यांच्याशी जुळवून घेणे धर्मांधांना जमत नाही. याला कारण म्हणजे त्यांना बालपणापासून मिळत असलेले धर्मांधतेचे बाळकडू ! अशी धर्मांध मानसिकता असलेल्या व्यक्तीला प्रशासनाने ९-१० वर्षे झेलले. आता नॅशनल कॉन्फरन्ससारख्या पक्षात गेल्याने फैजल हिंदुविरोधी आणि राष्ट्रघातकी विचारांचे प्रसारण करतील. त्यांच्यासारखे अधिकारी निर्माण होणे, हेच व्यवस्थेचे अपयश आहे. त्यामुळे समाजाची आणि त्याहून राष्ट्राची होणारी हानी कोण भरून काढणार ?


Multi Language |Offline reading | PDF