एस्.एस्.आर्.एफ्.च्या पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

३ जानेवारी २०१९ पासून रामनाथी आश्रमात चालू झालेल्या ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ च्या शिबिराच्या निमित्ताने…

३.१.२०१९ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’च्या आंतरराष्ट्रीय शिबिराला आरंभ झाला. त्या दिवशी न्यू जर्सी (अमेरिका) येथील सौ. शिल्पा कुडतरकर यांनी संतपद गाठल्याचे, तसेच श्री. विन्सेंट मलहेर्बे (सिंगापूर), श्री. गियोेम ऑलिव्हिए (फ्रान्स), श्री. अ‍ॅलन हार्डी (कॅनडा), श्री. फ्रान्सिस्कस बुडाआजी (इंडोनेशिया) आणि ऑस्ट्रिया येथील सौ. लवनिता डूर् अन् चि. नारायण डूर् (वय २ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

डावीकडून बसलेले सद्गुरु सिरियाक वाले, पू. (सौ.) योया वाले, पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर, पू. (सौ.) भावना शिंदे आणि पू. रेन्डी इकारांतियो. डावीकडून उभे असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले श्री. अ‍ॅलन हार्डि, श्री. फ्रान्सिकस बुडाआजी, सौ. लवनिता डूर्, त्यांच्या कडेवर असलेला चि. नारायण डूर्, श्री. गियोम ऑलिव्हिए आणि श्री. व्हिन्सेंट मलहेर्बे

१. पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर

१ अ. प्रेमभाव : ‘पू. (सौ.) शिल्पा यांच्यामध्ये साधकांप्रती पुष्कळ प्रेमभाव आहे. साधकांचा आढावा घेतांना किंवा त्यांना त्यांच्या चुका सांगतांना पू. ताई स्थिर असतात. त्यांच्या वाणीतून आनंद आणि प्रीती जाणवते.

१ आ. सहनशीलता : त्यांना अनेक वर्षांपासून शारीरिक त्रास होत आहेत. त्यांची सहनशीलता माझ्यासाठी अनुकरणीय आहे.

१ इ. त्यांच्यामध्ये अल्प कालावधीत आमूलाग्र पालट झाले आहेत.’

– सौ. द्रगाना किस्लोव्हस्की, युरोप

२. श्री. गियोेम ऑलिव्हिए

२ अ. ‘ते मनमोकळेपणाने बोलतात.

२ आ. दादांमध्ये कर्तेपणा आणि अहं अल्प आहे.’

– सौ. बबिता सभरवाल

२ इ. कोणत्याही प्रसंगात स्थिर असणे : ‘एकदा आम्ही सेवा करतो, त्या ठिकाणची स्वच्छता होती. त्या वेळी ‘मला लादी पुसण्याची सेवा करायची आहे’, हे समजल्यावर मी थोडी अस्थिर झाले; कारण त्याच वेळी अन्य साधकांना भोजनकक्षाचीही स्वच्छता करायची असल्याने साधकांना लवकर महाप्रसाद ग्रहण करण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे मी ‘सेवा करू कि महाप्रसाद घेऊ ?’, या विवंचनेत होते. त्या वेळी गियोेमदादांनी मला शांतपणे समजावले. त्यामुळे मी स्थिर राहू शकले अन् सेवाही करू शकले.

३. श्री. अ‍ॅलन हार्डि

अ. अ‍ॅलनदादांचे वागणे सहज असून त्यात दिखाऊपणा मुळीच नसतो.

आ. ते सर्व साधकांशी मनमोकळेपणाने अन् प्रेमाने बोलतात.

इ. ‘इतरांचा विचार करणे’ हा त्यांच्यातील गुण मला शिकायचा आहे.

४. श्री. फ्रान्सिस्कस बुडाआजी

अ. दादा नेहमी हसतमुख असतात.

आ. त्यांच्यामध्ये प्रेमभाव आणि सहनशीलता पुष्कळ आहे. सदनिकेतील सर्व साधकांचे आवरून होईपर्यंत ते शांतपणे वाट पहातात. त्यांच्यातील ‘सहनशीलता’ हा गुण मला शिकायचा आहे.’

– सौ. द्रगाना किस्लोव्हस्की

५. सौ. लवनिता डूर्

अ. ‘सौ. लवनिता यांच्यातील प्रतिकारक्षमता शिकण्यासारखी आहे.

आ. त्यांचा मुलगा चि. नारायण याला सांभाळत गुरुकृपा संपादन करण्यासाठी त्या करत असलेले प्रयत्न प्रेरणादायी आहेत.

इ. त्या चि. नारायणवर चांगले संस्कार करण्याचाही प्रयत्न करत आहेत.

६. चि. नारायण डूर्

अ. चि. नारायण जणू बालकृष्णच वाटतो. आम्हा सर्वांना त्याच्याशी खेळायला आवडते.

आ. एवढ्या लहान वयातच त्याच्यामध्ये सूक्ष्मातून जाणण्याची क्षमता आहे.

इ. तो सूक्ष्मातून श्रीकृष्णाशी बोलतो.’

– सौ. बबिता सभरवाल (७.१.२०१९)

७. श्री. विन्सेंट मलहेर्बे

अ. ‘श्री. विन्सेंटदादांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा आहे.

आ. त्यांच्यामध्ये जिज्ञासा आणि पुष्कळ भाव आहे.’

– सौ. बबिता सभरवाल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

इ. ‘दादा प्रसंगात न अडकता अलिप्त असतात. ते भावनाप्रधान नाहीत. त्यामुळे ते सर्व प्रसंगांमध्ये स्थिर असतात.’

– सौ. द्रगाना किस्लोव्हस्की

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now