अयोध्येतील राममंदिराच्या भव्य निर्माणासाठी महाराष्ट्रातील रामभक्तांचे भव्य संघटन !

पनवेल

पनवेल येथील दिंडीत सहभागी रामभक्त

पनवेल, १० जानेवारी (वार्ता.) – राममंदिर उभारण्यात येणारे अडथळे दूर व्हावेत, सरकारला राममंदिर उभारण्यासाठी बळ मिळावे यांसाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या पुढाकाराने, तसेच समस्त हिंदु संघटनांच्या वतीने ९ जानेवारी या दिवशी पनवेल शहरात सायंकाळी ५ वाजता श्रीरामनामदिंडी काढण्यात आली. जाखमाता मंदिर, पनवेेल येथून दिंडीचा आरंभ झाला. श्री हनुमान मंदिर, लाईन आळी येथे दिंडीची सांगता झाली. दिंडीतील धर्मप्रेमींना हिंदु जनजागृती समितीचे श्री. बळवंत पाठक यांनी संबोधित केले. सनातन संस्थेच्या सौ. मोहिनी मांढरे म्हणाल्या, ‘‘श्रीराम कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. आता आपण श्रद्धेने आणि भावपूर्णरित्या श्रीरामाला आळवूया. श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करूया, तरच राममंदिर बनेल.’’ यानंतर मंदिरात भावपूर्ण आरती करून दिंडीची सांगता करण्यात आली. दिंडीला सनातनच्या पू. (सौ.) संगीता जाधव यांची वंदनीय उपस्थिती लाभली होती.

दिंडीत पंतप्रधानांना देेण्यात येणार्‍या निवेदनावर स्वाक्षर्‍या घेऊन स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. हे निवेदन तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी श्री. दीपक आकडे यांना देण्यात आले.

क्षणचित्रे

१. अनेक लोक स्वत:हून दिंडीतील श्रीरामाच्या प्रमिमेला भावपूर्ण नमस्कार करून नामजप करत होते.

२. दिंडीच्या बाजूने जाणारी लहान मुलेही रामनामाचा जप करत होती.

३. दिंडीत ६ जानेवारीला झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेतील धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग होता.

४. टाळांचा नाद आणि नामजप यांमुळे लोक दिंडीकडे आकर्षित होत होते.

रोहा (रायगड) – येथील तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर श्रीरामाचा नामजप आणि जयघोष करत आंदोलन करण्यात आले, तसेच स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. आंदोलनानंतर सर्व धर्मप्रेमींनी नायब तहसीलदार, रोहा तालुका श्री. एस्. ए. आर् तुळवे यांना निवेदन देण्यात आले. पेण आणि रामनाथ (अलिबाग) या ठिकाणी रामभक्तांनी रामाला साकडे घालून भावपूर्ण नामजप केला.

कल्याण

कल्याण, १० जानेवारी (वार्ता.) – येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी नामदिंडी काढून रामनामाचा जागर केला. कल्याण पश्‍चिम येथे असलेल्या दत्तमंदिराकडून नामदिंडीस प्रारंभ होऊन पारनाका येथे श्रीराम मंदिराजवळ आरती करून दिंडीची सांगता करण्यात आली. या दिंडीत २०० हून अधिक धर्माभिमानी हिंदू सहभागी झाले होते.

लक्ष्मी नारायण मंदिराचे व्यवस्थापक आणि पुजारी श्री. सुधीर सानोरकर, अनंत हलवाई या दुकानाचे मालक श्री. अनंत गवळी, तसेच श्री. प्रतीक ठक्कर आणि हितेन गाला, श्री. राजू कांबळे, श्री. योगेश मोकाशी या धर्मप्रेमी व्यापार्‍यांनी, तर ‘खिडकी वडा’चे मालक श्री. शैलेश वझे, कल्याण येथील श्री. बी. आर. शंक्लेशा यांनी श्रीरामाच्या पालखीला विविध ठिकाणी पुष्पहार अर्पण करून पूजन केले.

सहभागी संघटना : श्रीराम हिंदू संघटना, योग वेदांत सेवा समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती

क्षणचित्रे

१. पारंपरिक वेष परिधान केलेली नामदिंडी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती.

२. कार्यकर्त्यांनी हातात झेंडे धरले होते.

३. सभेच्या आरंभी असलेला श्रीरामाचा चित्ररथ सर्वांचे विशेष आकर्षण ठरला.

४. फलकप्रसिद्धी करून लोकांना दिंडीला येण्याचे आवाहन करण्यात आले होते.

आज श्रीरामाला साकडे घालणार !

स्थळ : श्रीराम मंदिर, पद्मानगर, भिवंडी

वेळ : सायंकाळी ७.३०

आयोजक : हिंदू शक्ती वाहिनी, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

कल्याण येथे झालेल्या रामनामदिंडीतील मान्यवरांची भाषणे

रामसेतूप्रमाणे राममंदिरही रामनामानेच निर्माण होईल ! – वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे, सनातन संस्था

७० वर्षे झाली, तरी राम तंबूतच आहे. मंदिर हा आमच्या आस्थेचा विषय आहे. शासनाने निवडणुकीचा मुद्दा बनवू नये. जोपर्यंत मंदिर उभारले जात नाही, तोपर्यंत आम्ही अखंड रामाचा नामजप करू. रामसेतू हा रामनामाने निर्माण झाला आहे आणि मंदिरही राम नामानेच उभे राहील.

राममंदिर उभारण्यासाठी वेळीच संघटित व्हायला हवे ! – विजय ठाकरे, पत्रकार

हा देश प्रभु श्रीरामचंद्रांचा आहेे; मात्र आजही श्रीराम एका तंबूत आहेत, हे हिंदूंचे दुर्दैव आहे. श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी जायचे असेल, तरी तिथे आडकाठी केली जाते. दोन मिनिटांचे दर्शनही घेऊ दिले जात नाही, ही आपली शोकांतिका आहे. शनिशिंगणापूर किंवा शबरीमला प्रकरणात न्यायालय तत्परतेने निर्णय देते. एवढेच नव्हे, तर एका अतिरेक्यासाठी न्यायालय रात्री ३ वाजता उघडले जाते; पण हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले प्रभु श्रीरामचंद्रांचे मंदिर उभारण्यासाठी विलंब केला जात आहे. आपणच आता संघटित व्हायला हवे. राममंदिर उभारण्यासाठी संघटित झालो नाही, तर पुन्हा कधीच राममंदिर उभारले जाणार नाही. आता नाही तर कधीच नाही !

सरकारने हिंदूंच्या मर्यादेचा अंत पाहू नये ! – गणेश पवार, हिंदुत्वनिष्ठ

अयोध्येत राममंदिर निर्माणाचे सकारात्मक कार्य पूर्ण करण्यासाठी राज्यकर्त्यांमध्ये तशी सकारात्मक मानसिकता निर्माण होणे आवश्यक आहे. येणार्‍या निवडणुकीत हिंदू केवळ पेट्रोल आणि भाज्या यांचे भाव न्यून करण्याची मागणी करणार नाहीत, तर सर्वप्रथम राममंदिर निर्माणाचीच मागणी करणार. सरकारने हिंदूंच्या मर्यादेचा अंत पाहू नये. हिंदू संविधानाचा आदर बाळगून आहे; म्हणून सनदशीर मार्गाने राममंदिर निर्माणाची मागणी करत आहेत.

संसदेतून लवकरच अध्यादेश काढावा ! – सौ. वेदिका पालन, हिंदु जनजागृती समिती

हे हिंदूंचे मंदिर आहे. ते उभारण्याचे दायित्व प्रत्येक हिंदूचे आहे. आज आपण विभागलो गेलो आहोत. त्यामुळे मंदिराचा प्रश्‍न सुटत नाही. संसदेतून लवकरच अध्यादेश काढावा आणि मंदिर उभारावे. निकाल येईपर्यंत तेथे पूजा व्यवस्था करावी.

नालासोपारा

नालासोपारा, १० जानेवारी (वार्ता.) – हातात भगवे ध्वज घेऊन आणि मुखाने रामनामाचा गजर करत नालासोपारा येथील हिंदू धर्मप्रेमी एकवटले. येथील पंचमुखी हनुमान मंदिराच्या येथून फेरीला प्रारंभ झाला. पुरोहित श्री. विजय जोशी यांनी प्रारंभी धर्मध्वजाचे पूजन केले. फेरीच्या अग्रस्थानी धर्मध्वजानंतर प्रभु श्रीराम यांचे लावण्यात आलेले चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. परशुराम सेना, हिंदू युवा वहिनी, राष्ट्रीय बजरंग दल, योग वेदांत सेवा समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था आदी संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांसह बहुसंख्य धर्मप्रेमी, रामभक्त यात सहभागी झाले होते.

अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी अंधेरी आणि भाईंदर (जिल्हा ठाणे) येथे श्रीरामाचा गजर !

मुंबई, १० जानेवारी (वार्ता.) – अयोध्येत प्रभु श्रीरामाचे भव्य मंदिर निर्माण करण्यासाठी सरकारने अध्यादेश काढावा आणि ही पवित्र भूमी हिंदूंना पूजा करण्यासाठी कायमस्वरूपी द्यावी, या मागण्यांसाठी भाईंदरच्या मुर्धा गावातील श्रीराम मंदिर येथे आणि अंधेरी मालपा डोंगरी  क्र. ३ येथील मारुति मंदिर येथे सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, अन्य समविचारी संघटना आणि श्रीराम भक्तांनी श्रीरामाचा सामूहिक गजर केला. प्रारंभी आरती म्हणून नंतर श्रीरामाचा जप केला गेला. भाईंदर येथे समितीचे श्री. प्रथमेश कुडव यांनी आणि मालपा डोंगरी क्र. ३  येथे श्री. संदीप गवंडी यांनी उपस्थितांसमोर विषय मांडला. याविषयी सरकारला देण्यात येणार्‍या निवेदनाच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.

क्षणचित्रे

१. भाईंदर येथे स्थानिक श्री गणेश मंदिराचे पुजारी श्री. दत्तात्रय भट गुरुजी यांनी श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण करवून घेतले.

२. श्री. योगेश पुरंदरे गुरुजी यांनी त्यांच्या मंदिराच्या माध्यमातून अधूनमधून ‘राम मंदिर उभारणी’ हा विषय घेत राहू आणि ‘रामनाम गजर करत राहू’, असे सांगितले.

पुणे

तुळशीबाग राममंदिरात नामजप करतांना भाविक

पुणे, १० जानेवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने येथे रामनामाच्या माध्यमातून श्रीरामाला साकडे घालण्यात आले. हिंदुत्वनिष्ठ, भाविक यांसह ‘सनातन प्रभात’चे वाचक या उपक्रमात सहभागी झाले होते. तुळशीबागेतील प्रसिद्ध प्रभु श्रीराममंदिर, नर्‍हे येथील श्रीराममंदिर, हडपसर येथील श्रीराममंदिर, गावठाण येथील श्री काळाराम मंदिर, पिंपरी-चिंचवड, तळेगाव, जुन्नर, सांगवी, सातारा रस्ता, भोर, कोथरूड, विश्रांतवाडी, चंदननगर आदी एकूण ३५ हून अधिक ठिकाणी ‘श्रीराम जय राम जय जय राम’ असा नामजप करत प्रभु श्रीरामाला साकडे घालण्यात आले. तुळशीबाग येथील मंदिरात १५० हून अधिक रामभक्त उपस्थित होते. सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या आवाजातील नामजपाचे ध्वनीमुद्रण लावण्यात आले होते. श्रीरामाची आरती करून उपक्रमाची सांगता करण्यात आली.

प्रतिक्रिया

  • श्री. अभिजीत लोढा या हितचिंतकांना येणे शक्य न झाल्याने त्यांनी कार्यालयात १ घंटा नामजप केला आणि तसे समितीच्या कार्यकर्त्यांना कळवले.
  • ‘रामनामाचा उपक्रम आवडला. आजच्या काळात लोकांना एकत्र करणे अवघड आहे’, अशी प्रतिक्रिया दै. ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. श्रीकांत घोडके यांनी, तर ‘प्रभु श्रीरामांपर्यंत नामजप पोहोचला आहे. लवकरच राममंदिर निर्माण होईल, अशी आम्हाला निश्‍चिती वाटते’, अशी प्रतिक्रिया तुळशीबाग राममंदिराचे विश्‍वस्त श्री. भरत तुळशीबागवाले यांनी व्यक्त केली.
  • मंदिराचे विश्‍वस्त श्रीराम अभ्यंकर यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. हिंगणे येथील २ धर्मप्रेमी, आंबेगाव येथील ‘सनातन प्रभात’चे २ वाचक आणि २ धर्मप्रेमी रिक्शाचालक आवर्जून थांबून या उपक्रमात सहभागी झाले होते.
  • जुन्नर येथे नगराध्यक्ष श्री. श्याम पांडे, संघचालक श्री. रमेश खत्री, नगरसेवक श्री. समीर भगत हेही सहभागी झाले होते.
  • ‘समितीच्या  कार्यकर्त्यांनी मंदिरात आवाहन करून नामजपासाठी वेळ दिल्याविषयी आभार व्यक्त केल्यावर ‘धन्यवाद कशाला ? हे तर आमचे कर्तव्यच आहे’, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया एकाने व्यक्त केली.

कोल्हापूर

गिजवणे येथे श्रीरामाच्या चित्रासमोर बसून नामजप करणारे धर्मप्रेमी

कोल्हापूर, १० जानेवारी (वार्ता.) – रेंदाळ (तालुका हातकणंगले) येथे श्रीराम मंदिरात उपक्रम घेण्यात आला. श्रीरामाला प्रार्थना करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. सर्व धर्मप्रेमींनी श्रीरामनामाचा ३० मिनिटे जप केला. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. प्रवीण पाटील आणि श्री. माणिक पाटील, शिवसेनेचे श्री. नितीन काकडे, श्री. सुशांत शिंदे, मंदिराचे पुजारी आणि अध्यक्ष श्री. भिवराज शर्मा यांसह अन्य धर्मप्रेमी उपस्थित होते.

अभिप्राय

१. श्रीराम मंदिराचे अध्यक्ष श्री. शर्मा – सरकारच्या इच्छाशक्तीमुळे श्रीराम मंदिर होत नाही, हे दुर्दैव आहे. ‘श्रीराम मंदिरासाठी आता हिंदु जनजागृती समिती काहीतरी करू शकेल’, अशी आशा निर्माण झाली आहे.

२. श्री. राजू लोहार, धर्मप्रेमी – अशाच प्रकारे हिंदूंचे व्यापक संघटन उभे राहिल्यास श्रीराम मंदिर निश्‍चित उभे राहील.

गडहिंग्लज येथील गिजवणे येथील विठ्ठल मंदिरात उपक्रम घेण्यात आला. यात सनातन प्रभातचे वाचक आणि धर्मप्रेमी उपस्थित होते. आजरा येथे प्रार्थना आणि नामजप करण्यात आला. जत्राट (तालुका निपाणी) येथील मारुति मंदिरात झालेल्या उपक्रमात श्रीराम सेनेचे युवकही सहभागी झाले होते.

सांगली

मिरज शहरात नदीवेस येथील विठ्ठल मंदिर येथे, मंगळवारपेठ येथील अंबामाता मंदिरात, गणेश तलावाजवळ गोपाळकृष्ण मंदिरात श्रीराम मंदिर उभारणीसाठी प्रार्थना आणि नामजप करण्यात आला.


Multi Language |Offline reading | PDF