संगीत अभ्यासक प्रदीप चिटणीस यांनी गायलेल्या भारतीय शास्त्रीय संगीतातील विविध रागांचा शरिरातील कुंडलिनीचक्रांवर झालेला परिणाम

एका संतांनी त्यांच्या ग्रंथात विविध कुंडलिनीचक्रे आणि त्याच्याशी संबधित शास्त्रीय संगीतातील राग यासंदर्भात मार्गदर्शन केलेले आहे. श्री. प्रदीप चिटणीस यांच्या शास्त्रीय गायनाच्या माध्यमातून चक्र आणि त्याला अनुसरून सांगितलेल्या राग गायनाच्या परिणामांचा अभ्यास ३.१२.२०१८ ते ५.१२.२०१८ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या माध्यमातून आध्यात्मिक त्रास असलेल्या आणि नसलेल्या साधकांवर करण्यात आला. या प्रयोगाचा (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सूक्ष्म स्तरावर केलेल्या अभ्यासाचा काही भाग आपण गुरुवार, ३ जानेवारी २०१९ च्या अंकामध्ये पाहिला. यात ‘मिया मल्हार’, ‘पुरिया’ आणि ‘मुलतानी’ या रागांचा कुंडलिनीचक्रांवर होणारा परिणाम आपण पाहिला. आज अन्य काही रागांचा परिणाम कुंडलिनीचक्रांवर कसा होतो, या संदर्भात जाणून घेऊया.

४. छायानट

अ. आरंभी माझी चंद्रनाडी कार्यरत होती.

आ. रागाचा आरंभ झाल्यावर माझ्या अनाहतचक्रावर शक्ती जाणवू लागली.

इ. त्यानंतर माझ्या आज्ञाचक्रावरही शक्ती जाणवू लागली. या रागामध्ये शक्तीचे प्रमाण पुष्कळ आहे. अनाहत आणि आज्ञा या चक्रांवरील जडत्वामुळे माझी मान खाली झुकू लागली आणि मला गुंगी येऊ लागली.

ई. त्यानंतर माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.

उ. या रागाला पूरक अशी हाताच्या बोटांची मुद्रा शोधली असता ती ‘मधल्या बोटाचे टोक हाताच्या तळव्याला लावणे’, ही तेजतत्त्वाची निर्गुण-सगुण स्तराची मुद्रा आली. दोन्ही हातांनी ही मुद्रा केल्यावर रागाची स्पंदने अनाहत आणि आज्ञा चक्रांवर अधिक तीव्रतेने जाणवू लागली.

ऊ. मुद्रेमुळे रागातील शक्तीच्या स्पंदनांचे रूपांतर थंडाव्यात, म्हणजे चैतन्यात होऊ लागले.

ए. पुढे रागाची स्पंदने आज्ञाचक्रावरून सहस्रार या सर्वोच्च चक्राकडे गेली.

ऐ. मुद्रा न करता केवळ श्‍वासावर लक्ष केंद्रित केल्यावर मुद्रा केल्याने जाणवलेलाच परिणाम होऊ लागला. तेव्हा चंद्रनाडी पालटून सुषुम्ना नाडी कार्यरत झाली, तसेच अनाहत आणि आज्ञा येथे जाणवत असलेला रागाचा परिणाम सहस्रारचक्रावर जाणवू लागला. अशा प्रकारे श्‍वासाच्या अनुसंधानात रहाण्याचे महत्त्व लक्षात आले.

ओ. या रागाचा आरंभ होण्यापूर्वी माझ्या नाडीचे ठोके ६५ होते. राग ऐकून झाल्यावर ते तेवढेच राहिले. याप्रमाणेच रक्तदाबही मोजला. आरंभी तो १२४/६७ (mm Hg) होता. राग ऐकून झाल्यावर वरचा न्यून होऊन ११३/७० (mm Hg) झाला. या रागाची स्पंदने अनाहतचक्रावर शक्तीच्या स्वरूपात जाणवली असली, तरी त्या शक्तीमुळे गुंगी आली, म्हणजे मन शांत झाले. त्यामुळे या रागामुळे वरचा रक्तदाब अल्प झाला.

सारांश : छायानट राग अनाहत आणि आज्ञा चक्रांवर परिणाम करतो. या रागाची स्पंदने शक्तीच्या स्वरूपात असली, तरी तिच्यामुळे मन शांत होते.

पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ

 

५. कामोद

अ. आरंभी माझी चंद्रनाडी कार्यरत होती.

आ. रागाचा आरंभ झाल्यावर माझ्या विशुद्धचक्रावर स्पंदने जाणवू लागली. ही स्पंदने शक्तीच्या स्वरूपातील होती.

इ. माझी सूर्यनाडीही कार्यरत होऊ लागली.

ई. माझ्या आज्ञाचक्रावरही शक्तीची स्पंदने जाणवू लागली.

उ. या रागाला पूरक अशी हाताच्या बोटांची मुद्रा शोधली असता ती ‘मधल्या बोटाचे टोक हाताच्या तळव्याला लावणे’, ही तेजतत्त्वाची निर्गुण-सगुण स्तराची मुद्रा आली. दोन्ही हातांनी ही मुद्रा केल्यावर रागाची स्पंदने आज्ञाचक्रावरून सहस्रारचक्राकडे गेली, तसेच माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.

ऊ. या रागाचा आरंभ होण्यापूर्वी माझ्या नाडीचे ठोके ६२ होते. राग ऐकून झाल्यावर ते तेवढेच राहिले.

सारांश : राग कामोद हा मुख्यत्वे विशुद्ध आणि थोड्या प्रमाणात आज्ञा या चक्रांवर परिणाम करतो. या रागाची स्पंदने शक्तीच्या स्वरूपात जाणवली.

श्री. प्रदीप चिटणीस

६. मारू बिहाग

अ. आरंभी माझी सूर्यनाडी कार्यरत होती.

आ. रागाचा आरंभ झाल्यावर लगेचच माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली, तसेच माझ्या आज्ञाचक्रावर स्पंदने जाणवू लागली. ही स्पंदने चैतन्य-शक्ती या स्वरूपाची होती.

इ. या रागाच्या स्पंदनांचा परिणाम थोड्या प्रमाणात विशुद्धचक्रावरही जाणवू लागला.

ई. हा राग संथ लयीतील आहे. त्यामुळे या रागामुळे ध्यान लागल्यासारखे होत होते.

उ. या रागाला पूरक अशी हाताच्या बोटांची मुद्रा शोधली असता ती ‘तर्जनीच्या मुळाशी अंगठ्याचे टोक लावणे’, ही वायुतत्त्वाची सगुण-निर्गुण स्तराची मुद्रा आली. दोन्ही हातांनी ही मुद्रा केल्यावर रागाची स्पंदने आज्ञाचक्रावरून सहस्रारचक्राकडे गेली.

ऊ. या रागाचा आरंभ होण्यापूर्वी माझ्या नाडीचे ठोके ६४ होते. राग ऐकून झाल्यावर ते तेवढेच राहिले.

सारांश : मारू बिहाग हा राग मुख्यत्वे आज्ञा आणि थोड्या प्रमाणात विशुद्ध या चक्रांवर परिणाम करतो. या रागाची स्पंदने चैतन्य-शक्ती या स्वरूपात जाणवली. या रागामुळे लगेचच सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.

७. भैरवी

अ. आरंभी माझी चंद्रनाडी कार्यरत होती.

आ. रागाचा आरंभ झाल्यावर माझ्या सहस्रारचक्रावर स्पंदने जाणवू लागली. ही स्पंदने चैतन्याची होती.

इ. हा राग ऐकतांना माझे ध्यान लागत होते.

ई. सहस्रारचक्रावर स्पंदने जाणवली, तरी माझी चंद्रनाडीच कार्यरत राहिली.

उ. या रागाला पूरक अशी हाताच्या बोटांची मुद्रा शोधली असता ती ‘मधल्या बोटाच्या मुळाशी अंगठ्याचे टोक लावणे’, ही तेजतत्त्वाची सगुण-निर्गुण स्तराची मुद्रा आली. दोन्ही हातांनी ही मुद्रा केल्यावर रागाची स्पंदने सहस्रारचक्राच्या बाहेर जाऊ लागली, तसेच माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.

ऊ. वरील मुद्रा केल्यावर माझ्या अनाहतचक्रावरही थंडावा जाणवू लागला. पुढे ती स्पंदने मूलाधारचक्रापर्यंत पोहोचली. मुद्रा केल्यामुळे सर्व चक्रांपर्यंत रागाची स्पंदने पोहोचली.

ए. या रागाचा आरंभ होण्यापूर्वी माझ्या नाडीचे ठोके ५५ होते. राग ऐकून झाल्यावर ते तेवढेच राहिले. याप्रमाणेच रक्तदाबही मोजला. आरंभी तो १०७/६५ (mm Hg) होता. राग ऐकून झाल्यावर तो न्यून होऊन ९९/६३ (mm Hg) झाला. या रागामुळे चैतन्यरूपी थंडावा मिळाल्याने आणि तो अनाहतचक्रालाही मिळाल्याने रक्तदाब अल्प झाला.

सारांश : भैरवी हा राग सहस्रारचक्रावर परिणाम करणारा आहे. या रागाची स्पंदने चैतन्याच्या स्वरूपात जाणवली. या रागाच्या वेळी हाताच्या बोटांनी तेजतत्त्वाची मुद्रा केल्यामुळे ‘रागाची स्पंदने सर्व चक्रांना मिळाली, तसेच ती सहस्रारचक्रातून वातावरणातही गेली’, असे जाणवले.’

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (४ आणि ५ डिसेंबर २०१८)

‘संगीत आकाशतत्त्वाशी संबंधित आहे; म्हणून पृथ्वी, आप, तेज आणि वायू या तत्त्वांशी संबंधित असलेल्या कलांपेक्षा संगीताशी संबंधित अनुभूती वरच्या स्तराच्या असतात !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सूक्ष्म स्तरावरील घडामोडींचे आकलन होण्यासाठी व्यक्तीने स्वतःची साधना वाढवणे आवश्यक !

‘संगीतातील विविध रागांचा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अनुभवण्यासाठी स्वतःची साधना असणे आवश्यक आहे. हा अभ्यास सूक्ष्म स्तरावरील असल्याने सूक्ष्मातील घडामोडी अनुभवण्यासाठी साधनेत प्रगती करणे महत्त्वाचे आहे.

समाजातील साधारण ८० टक्के लोकांना आध्यात्मिक स्वरूपाचा, उदा. वाईट शक्ती, अतृप्त पूर्वज यांचा त्रास असतो. या त्रासामुळे व्यक्तीला सूक्ष्मातील गोष्टी अचूक कळण्यात वाईट शक्तींचा अडथळा येऊ शकतो. त्यामुळे सूक्ष्म स्तरावरील अनुभव येण्यासाठी वाईट शक्तींच्या त्रासाचे प्रमाण न्यून करण्यासह साधनेत प्रगती करणेही महत्त्वाचे आहे.

यासाठी साधनेच्या आरंभीच्या टप्प्याला आपल्या कुलदेवतेचा नामजप, उदा. श्री रेणुकादेवी कुलदेवी असल्यास ‘श्री रेणुकादेव्यै नमः ।’ किंवा कुलदेवता ठाऊक नसल्यास ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ असा नामजप अधिकाधिक करावा. यासमवेत पूर्वजांच्या त्रासापासून रक्षण होण्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप दिवसभरात ४५ मिनिटे करावा. याप्रमाणे नामजप केल्याने साधना वाढल्यावर व्यक्तीला सूक्ष्मातील घडामोडींविषयी थोडे थोडे कळायला लागते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले


Multi Language |Offline reading | PDF