१०० कोटी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्या येथे राममंदिराची उभारणी करा !

आज १० जानेवारी २०१९ या दिवशी सर्वोच्च न्यायालयात अयोध्या येथील राममंदिराची सुनावणी होणार आहे. त्या निमित्ताने…

प्रभु श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर उभारण्यासंदर्भात शासनाला द्यावयाचे निवेदन !

राष्ट्र आणि हिंदु धर्म यांवर होणार्‍या आघातांच्या विरोधात आजचे सामान्य हिंदु नागरिक जागृत होत आहेत. राष्ट्रीय हिंदू आंदोलनांच्या माध्यमांतून असे धर्माभिमानी हिंदू, तसेच विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय, राजकीय पक्ष यांतील हिंदू आपले पद, पक्ष, संघटना, जात आदी बिरुदावल्या बाजूला सारून एक ‘हिंदू’ म्हणून एकत्र होत आहेत. राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होणार्‍या आघातांच्या विरोधात ते या आंदोलनांतून अन् निवेदने सादर करून आपला आवाज यशस्वीरित्या शासनदरबारी पोहोचवत आहेत.

कोट्यवधी हिंदूंच्या आस्थेचे प्रतीक असलेल्या अयोध्येतील राममंदिर उभारणीच्या विषयासंदर्भात सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी ‘राममंदिर उभारणी’चे गाजर दाखवण्यात येते; परंतु प्रत्यक्षात मंदिर उभारणी होत नाही. राजकीय लाभापोटीच त्याचा उपयोग करण्यात येतो. राममंदिर उभारणीसंदर्भात वेळोवेळी विविध शंकराचार्य, संत आणि हिंदुत्वनिष्ठ नेते यांनी त्यांची मागणी स्पष्टपणे मांडली आहे. आता प्रत्येक हिंदूने राममंदिर उभारणीची मागणी आणखी तीव्र करणे आवश्यक आहे. हिंदूंनी त्यांच्या न्याय्य मागण्या अधिक परिणामकारकरित्या सरकारदरबारी पोहोचवणे काळाची आवश्यकता आहे. या संदर्भात राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या अंतर्गत अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना जागोजागी स्थानिक लोकप्रतिनिधी अथवा जिल्हाधिकारी यांना या संदर्भातील मागण्यांचे निवेदन देत आहेत. सदर निवेदन येथे देत आहोत.

दिनांक : .०१.२०१९

प्रती,

————–

————–

विषय : केंद्रशासनाने कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीरामजन्मभूमी (अयोध्या) येथे राममंदिर बांधण्यासाठी संसदेत त्वरित कायदा करण्याविषयी….

महोदय,

भगवान श्रीराम हे कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. उत्तरप्रदेशमधील अयोध्यानगरी ही प्रभु श्रीरामाची जन्मभूमी असल्याचे पुराव्यानिशी सर्वदृष्ट्या सिद्ध झाले आहे. ३० सप्टेंबर २०१० या दिवशी अलाहाबाद उच्च न्यायालयानेही ‘सदर स्थळ श्रीरामजन्मभूमी आहे आणि इथे राममंदिर होते’, असा निर्णय देऊन ‘ती श्रीरामजन्मभूमीच आहे’, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. सध्या या संदर्भातील खटला सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असून तो प्रलंबित आहे; मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यात पुराव्यांच्या आधारे अयोध्येतील भूमी ही श्रीरामजन्मभूमी असल्याचे सिद्ध झाले आहे. राममंदिर हा देशातील कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा विषय असल्याने हिंदूंच्या भावना लक्षात घेता केंद्रशासनाने कोणत्याही प्रकारचा विलंब न करता संसदेत कायदा करून राममंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा करावा. त्याचप्रकारे या पवित्र भूमीवर अद्याप हिंदूंना पूजा करण्यास अनुमती नाही. हिंदूबहुल भारतात श्रीरामजन्मभूमीवर हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार नाकारला जाणेे, हिंदूंसाठी याहून मोठे दुर्दैव ते काय ! तरी हिंदूंना या ठिकाणी पूजा करण्यासाठी तात्काळ कायमस्वरूपी विशेष अनुमती देण्यात यावी.

या संदर्भात आम्ही काही सूत्रे निदर्शनास आणून देऊ इच्छितो की –

१. ३० सप्टेंबर २०१० या दिवशी अलाहाबाद उच्च न्यायालयानेे ‘सुन्नी वक्फ बोर्डा’चा दावा फेटाळून लावत त्या जागी ‘श्रीरामलला विराजमान आहेत’, असे सांगितले. ही भूमी श्रीरामजन्मभूमी आहे आणि मंदिर तोडून विवादास्पद वास्तू उभारण्यात आली होती, हेही मान्य केले.

२. राममंदिर निर्मितीच्या कार्यासाठी वर्ष १८५७ पासून ते आजपर्यंत अनेक हिंदूंनी बलीदान दिले आहे. यामध्ये वर्ष १९९२ मध्ये झालेल्या कारसेवकांच्या आंदोलनाचा विशेष उल्लेख करावा लागेल.

३. ‘अयोध्येत राममंदिर उभारणे’ ही घोषणा आजवर भाजपच्या जाहीरनाम्यात केंद्रस्थानी राहिली आहे. राममंदिर व्हावे, ही कोट्यवधी हिंदूंची केवळ मागणीच नाही, तर तो हिंदूंच्या श्रद्धेचा विषय आहे.

४. काँग्रेसच्या कार्यकाळात श्री सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार होऊ शकतो, तर विकास आणि हिंदुत्व या सूत्रांवर निवडून येणार्‍या भाजपला राममंदिर उभारणे निश्‍चितच शक्य आहे.

५. तमिळनाडूमध्ये ‘जल्लिकट्टू’ या पारंपरिक खेळावर जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली होती, तेव्हा तेथील तत्कालीन जयललिता सरकारने दबाव आणल्यानंतर केंद्राने त्यांना संबंधित कायदाच पालटायला सांगितला होता. ज्या कायद्याच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने ‘जल्लिकट्टू’वर बंदी घातली, त्यातच पालट झाल्यामुळे आपोआप निर्णय फिरला. भाजप शासनाने अ‍ॅट्रोसिटी कायद्याच्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा आदेश संसदेत कायदा करून बदलला, तसेच तीन तलाकच्या संदर्भात अध्यादेश काढून कायदा केला. इतके सगळे जर होऊ शकते, तर वर्ष २०१४ मध्ये ज्या भाजप शासनाला हिंदु जनतेने पूर्ण बहुमताचा जनादेश देऊन सत्ताप्राप्ती करून दिली, ते भाजप शासन राममंदिरासाठी अध्यादेश का काढत नाही ?

६. आजपर्यंतच्या भारतीय न्यायव्यवस्थेचा अनुभव पहाता सर्वोच्च न्यायालयात याविषयी सुनावणी चालू होणे, शीघ्रतेने या प्रकरणी निकाल येणे आदी गोष्टी होण्यासाठी किती काळ जाईल, हे सांगणे अनिश्‍चितच आहे. गेल्या ७० वर्षांत जे होऊ शकले नाही, ते आता भाजप शासन सत्तेत असतांना होईल, अशी भोळी आशा घेऊन हिंदु समाज भाजप शासनाकडे आस लावून बसला आहे. जर या शासनाकडूनही मंदिर निर्माणासाठी काही कृती झाली नाही, तर समाजाचा केंद्रशासन आणि न्यायव्यवस्था यांच्यावरील विश्‍वास उडून जाईल. आणखी किती काळ हिंदूंनी न्यायालयाच्या निकालाची वाट पहायची ? राज्यात आणि केंद्रात बहुमत असतांना शासनाने राममंदिराविषयी इच्छाशक्ती दाखवायला हवी.

७. गेल्या काही दिवसांपासून देशभरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संत समाज एकत्रित येऊन ‘राममंदिर लवकरात लवकर निर्माण व्हावे आणि त्यासाठी केंद्रशासनाने अध्यादेश काढावा’, या मागणीसाठी देशातील विविध राज्यांमध्ये जाहीर सभा घेत आहेत, आंदोलने करत आहेत, निवेदने देत आहेत.

तरी येणार्‍या लोकसभा निवडणुका पहाता हिंदूंच्या भावनांचा कडेलोट होण्याच्या अगोदर शासनाने राममंदिराचा अध्यादेश काढण्याचा निर्णय घ्यावा.

या संदर्भात आमच्या पुढील मागण्या आहेत –

१. संसदेत हिंदूंनी दिलेल्या बहुमताच्या आधारे राममंदिर उभारणी संदर्भातील कायदा बनवून त्याच्या आधारे अयोध्येत भव्य राममंदिर उभारण्यास प्रारंभ करावा.

२. सध्या श्रीरामजन्मभूमीवर श्रीरामाची मूर्ती एका कापडी तंबूत ठेवून तिची एकप्रकारे विटंबनाच केली जात आहे. या ठिकाणी भाविकांना कोणत्याही प्रकारे पूजा-अर्चा करता येत नाही. हे टाळण्यासाठी भव्य श्रीराममंदिर उभारण्यापूर्वी जवळच एक तात्पुरते लहान मंदिर बांधावे, तेथे श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी आणि हिंदूंना विधीवत पूर्जा-अर्चा, धार्मिक विधी करण्यासाठी सोय उपलब्ध करून द्यावी.

३. जोवर वरील मागण्या पूर्ण होत नाहीत, तोवर श्रीरामजन्मभूमीवर श्रीरामाची विधीवत् पूजा करण्यास हिंदूंना कायमस्वरूपी विशेष अनुमती द्यावी.

४. सध्या या ठिकाणी असलेल्या श्रीरामाच्या मूर्तीजवळ जाण्यासाठी अनेक ‘मेटल डिटेक्टर’ असून कोणतीही वस्तू तेथे नेण्यास बंदी आहे. तपासणी पूर्ण करून सर्व प्रकारचे पूजा आणि विधी यांसाठीचे साहित्य नेण्यासाठी अनुमती देण्यात यावी.

आपला विश्‍वासू,

हिंदु धर्माभिमान्यांना आवाहन !

या निवेदनाची प्रत हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्माभिमानी हिंदू आपल्या शहरातील लोकप्रतिनिधी अथवा प्रशासकीय अधिकारी यांना देऊ शकतात. या निवेदनाची प्रत हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावर पुढील मार्गिकेवर उपलब्ध आहे – https://www.hindujagruti.org/hindi/hjs-activities/rashtriya-hindu-andolan या मार्गिकेवर सदर निवेदन मराठी आणि हिंदी या भाषेत उपलब्ध आहे. सदर निवेदन शासनदरबारी दिल्यावर त्याची माहिती दैनिक सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला पाठवल्यास त्यास प्रसिद्धीही दिली जाईल.


Multi Language |Offline reading | PDF