रूढी आणि परंपरा यांविषयीचा अभ्यास न करता त्याला विरोध करणे पूर्णतः अयोग्य आहे ! – अश्‍विनी कुलकर्णी, प्रवक्त्या, सनातन संस्था

‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात सनातन संस्थेचा सहभाग !

अश्‍विनी कुलकर्णी

मुंबई – एखाद्या घरामध्ये मूल जन्माला येते, तेव्हा त्या संपूर्ण कुटुंबाला सोयर लागते. या वेळीही धर्मशास्त्रामध्ये सांगितल्यानुसार शुद्धी केली जाते. यामध्ये महिला किंवा पुरुष असा भेदभाव नसतो. तेव्हा सर्वांसाठी शुद्धी केली जाते. धर्मग्रंथांमध्ये प्रत्येक गोष्टीचे शास्त्र सांगितले आहे; पण हिंदूंंना धर्मशिक्षण नसल्यामुळे महिलांचा मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर विटाळ कसा होतो, हे लक्षात येत नाही. जगाच्या पाठीवरील कोणत्याही हिंदु मंदिरामध्ये शास्त्रानुसार कृती केलेली नसेल, तर तेथे शुद्धीकरण केले जातेच. (कथित) सर्वधर्म समानतेचा पुरस्कार करणार्‍या तृप्ती देसाई आणि प्रसिद्धीमाध्यमे यांनी ‘अन्य पंथियांच्या प्रार्थनास्थळांमध्ये, चर्चमध्ये, मशिदींमध्ये महिलांना प्रवेश आहे का ?’, याचा अभ्यास करावा. हिंदूंंच्या केवळ काही मंदिरांमध्येच महिलांना प्रवेश नाही. असे असतांना त्या मागील रुढी आणि परंपरा यांविषयीचा अभ्यास न करता त्याला विरोध करणे पूर्णतः अयोग्य आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या अश्‍विनी कुलकर्णी यांनी केले. शबरीमला मंदिरात काही महिलांनी प्रवेश केल्याच्या पार्श्‍वभूमीवर ‘जय महाराष्ट्र’ या मराठी वृत्तवाहिनीवर आयोजित केलेल्या चर्चासत्रात त्या बोलत होत्या. या वेळी अश्‍विनी कुलकर्णी यांच्यासह भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई याही सहभागी झाल्या होत्या. देसाई यांनी नेहमीप्रमाणे महिलांच्या मंदिरप्रवेशाचे समर्थन करत स्वत:चे धर्माविषयीचे अज्ञान दाखवून दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विशाल पाटील यांनी केले.

हिंदुद्रोही तृप्ती देसाई यांनी मांडलेली अज्ञानमूलक सूत्रे

१. कोणत्याही देवाचा जन्म महिलेच्या उदरातूनच होतो. अशा महिलांनी मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर मंदिर अपवित्र कसे होते ? मासिक पाळी नैसर्गिक प्रक्रिया असूनही ती अपवित्र कशी काय ? (देवाचा जन्म ही दैवी प्रक्रिया असून मानवी जन्मापेक्षा ती निराळी आहे. धर्मशास्त्राचा काडीचाही अभ्यास नसतांना काहीही बरळणार्‍या तृप्ती देसाई यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच ! – संपादक)

२. शुद्धीकरण करणार्‍या पुजार्‍यांच्या मानसिकतेचे शुद्धीकरण करण्याची वेळ आलेली आहे आणि महिलांनी पुढाकार घेऊन हे करायला हवे. परिवर्तन होत आहे. राष्ट्रपतीपदापासून ते ऑलिंपिकच्या सामन्यामध्ये महिला जात आहेत. असे असूनही महिलांनी प्रवेश केल्यानंतर मंदिर अपवित्र होत आहे, असे म्हणणे अयोग्य आहे. (परिवर्तनाची हौस असणार्‍या तृप्ती देसाई हलाला, तिहेरी तलाक यांसारख्या कुप्रथांमध्ये परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करतील का ? – संपादक)

३. देवतांनी स्त्री पुरुष असा भेदभाव केलेला नाही, तर हे भेदभाव करणारे लोक कोण ? (धर्माविषयी अज्ञान असतांना त्यात ढवळाढवळ करण्याचा काही अधिकार नाही, हे तृप्ती देसाई यांनी लक्षात घ्यावे ! – संपादक) शुद्धीकरण म्हणजे महिलांचा अपमान आहे. सर्वोच्च न्यायालयाचाही अपमान आहे. (शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पालटण्यात आला. आज वेगळ्या शरीयत न्यायालयाची मागणी होते, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान झाला, असे तृप्ती देसाई यांना वाटत नाही का ? – संपादक)

(म्हणे) ‘हिंदु धर्मामध्ये काही चुकीचे होत असेल, तर सुधारणा करणे माझे कर्तव्य आहे !’ – तृप्ती देसाई

हिंदु धर्माचे काडीचेही ज्ञान नसतांना त्यात सुधारणा करण्यासाठी निघालेल्या हिंदुद्वेषी तृप्ती देसाई स्वतःला धर्माचार्य, शंकराचार्य यांच्यापेक्षा विद्वान समजतात का ? अशी विधाने करून तृप्ती देसाई स्वतःचे हसेच करून घेत आहेत !

मी एक हिंदु आहे आणि हिंदु धर्मामध्ये काही चुकीचे होत असेल, तर त्यामध्ये सुधारणा करणे माझे कर्तव्य आहे अन् ते मी करत आहे. घटनेने दिलेला समानतेचा अधिकार तुम्ही हिरावून घेत आहात. सर्वत्रच्या महिलांना समान वागणून दिली पाहिजे यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. आमच्या आंदोलनांना पाठींबा मिळत आहे, तो तुम्हाला सहन होत नाही, असे तृप्ती देसाई यांनी सांगितले. (‘महिलांना समान न्याय’ म्हणायचे आणि केवळ हिंदूंच्या धर्मपरंपरा मोडायच्या, ही तृप्ती देसाई यांची स्टंटबाजी हिंदू ओळखून आहेत. त्यामुळेच शनिशिंगणापूरसारख्या मंदिरांच्या प्रथा महिला भाविक आजही श्रद्धेने पाळतात. हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच महिला ‘स्टंटबाजी’त सहभागी होतात. ही वस्तूस्थितीही तृप्ती देसाई यांनी लक्षात घ्यावी ! – संपादक)

अन्य पंथांतील महिलांवरील अत्याचारांविषयी काहीही न करणार्‍या तृप्ती देसाई यांचा हिंदुद्वेषी चेहरा अश्‍विनी कुलकर्णी यांनी केला उघड !

अन्य पंथांतील महिलांवरील अत्याचारांविषयी काहीही न करता केवळ मंदिर प्रवेशाच्या सूत्राआडून चाललेला तृप्ती देसाई यांचा हिंदुद्रोही चेहरा अश्‍विनी कुलकर्णी यांनी पुढील सूत्रे मांडून उघड केला.

१. महिलांना समानता मिळण्याच्या नावाखाली तृप्ती देसाई हिंदु धर्मातील परंपरांच्या विरोधात कार्य करत आहेत. भगवान अय्यप्पांच्या महिला भक्त ज्योती घेऊन मानवी साखळी करून उभ्या होत्या, त्या वेळी त्यांच्यावर केरळ सरकारच्या सांगण्यावरून पोलिसांनी लाठीहल्ला केला. तेव्हा तृप्ती देसाई कोठे होत्या ?

२. एखाद्या फादरने ननवर बलात्कार केल्यानंतर तृप्ती देसाई त्यावर काहीच बोलत नाहीत.

३. केरळमधील चर्चमध्ये आणि जामा मशिदीमध्ये महिलांना घेऊन जाऊन दाखवले, तर तृप्ती देसाई महिलांसाठी लढतात, असे आम्ही समजू. देसाई यांनी हिंदु धर्म भ्रष्ट करण्याचे षड्यंत्र रचले आहे. त्यावर मिळवत असलेली प्रसिद्धी, हिंदूंच्या भावनांशी खेळणे बंद करा.

४. तृप्ती देसाई यांनी कोणाचे शुद्धीकरण करावे हे सांगण्याऐवजी त्यांचेच मानसिक शुद्धिकरण करण्याची आवश्यकता आहे.

वृत्तवाहिनी आणि सूत्रसंचालक यांचा हिंदुद्वेष !

१. ‘हिंदु धर्मामध्ये हाताच्या बोटांबर मोजता येणार्‍या मंदिरांमध्येच महिलांना प्रवेश नाही; परंतु अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांमध्ये महिलांना प्रवेशच नाही’, हे सूत्र अश्‍विनी कुलकर्णी यांनी मांडल्यानंतर हे ऐकण्याऐवजी सूत्रसंचालकाने ‘अन्य धर्मीय चुकीचे वागतात; म्हणनू आपणही महिलांना दुय्यम स्थान द्यायचे का’, असा निरर्थक प्रश्‍न विचारून हिंदुद्वेष प्रकट केला.

२. अश्‍विनी कुलकर्णी यांना बोलतांना मध्येच तोडले जात होते. तृप्ती देसाई यांना मात्र बोलू दिले जात होते.

३. अश्‍विनी कुलकर्णी यांनी ‘माझी सर्व सूत्रे पूर्ण झाल्यानंतरच तृप्ती देसाई यांना बोलण्याची संधी द्यावी’, असे सांगितले होते. तरीही सूत्रसंचालकांनी पहिले दोन प्रश्‍न झाल्यावरच तृप्ती देसाई यांना बोलण्यास सांगितले. अश्‍विनी कुलकर्णी यांनी विनंती करूनही तृप्ती देसाई यांनी आपले म्हणणे मांडणे चालू केले. या वेळी तृप्ती देसाई यांचा आवाज मोठा ठेवण्यात आला होता. त्यामुळे अश्‍विनी कुलकर्णी बोलत असूनही त्यांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत नव्हता.

धादांत खोटे बोलणार्‍या तृप्ती देसाई यांना अश्‍विनी कुलकर्णी यांनी दिलेले सडेतोड उत्तर !

‘आम्ही ख्रिस्ती धर्म स्वीकारून धर्मांतर केले आहे, याची अफवा यांनीच पसरवली आहे. मी आजही सांगते की मी हिंदु आहे’, असा धादांत खोटा आरोप तृप्ती देसाई यांनी केल्यावर अश्‍विनी कुलकर्णी यांनी ‘आमचे तुमच्याशी काही देणेघेणे नाही. आरोप केल्याचे पुरावे द्या’, असे सांगितले. तेव्हा तृप्ती देसाई याविषयी काही बोलल्या नाहीत.


Multi Language |Offline reading | PDF