रामजन्मभूमीवरच मंदिर उभारण्यास न्यायालयाने अनुज्ञप्ती न दिल्यास केंद्रशासनाने अध्यादेश काढावा ! – दीपकराव गायकवाड, विहिंप

विश्‍व हिंदु परिषद गोमंतकच्या वतीने फोंडा येथे विराट सभा

फोंडा, ९ जानेवारी (वार्ता.) – अयोध्या येथे राममंदिरासंबंधीच्या सुनावणीला न्यायालय प्रत्येक वेळी हुलकावणी देत असली, तरीही हिंदूंच्या हृदयातच श्रीराम कायम वास करून आहे. अयोध्येतील रामजन्मभूमीवरच मंदिर उभारणे ही १०० कोटी जनतेची भावना आहे. समलिंगी, शबरीमला, नक्षलवादी आदी विषयांच्या याचिकेवर तत्परतेने निवाडा होत असतांना अयोध्या निवाड्याला विलंब का होत आहे ? अयोध्या ही हिंदूंच्या संस्कृतीची लढाई आहे. अयोध्येतील रामजन्मभूमीवरच मंदिर उभारण्यास न्यायालयाने अनुज्ञप्ती द्यावी, अन्यथा केंद्रशासनाने तसा अध्यादेश काढावा, असे आवाहन विश्‍व हिंदु परिषदेच्या मुंबई विभागाचे अधिवक्ता दीपकराव गायकवाड यांनी विश्‍व हिंदु परिषदेच्या विराट सभेला संबोधित करतांना केले. (विहिंपने समलिंगी, शबरीमला यांवरील निकालाच्या विरोधात कधी सभा आणि आंदोलने केली का ? तसेच ४ वर्षांत राममंदिराच्या उभारणीविषयी मौन का पाळले ? केंद्रातील भाजप शासनाने राममंदिर उभारले नाही, तर विहिंप भाजपची साथ सोडण्यास सिद्ध आहे का ? – संपादक)

श्रीरामजन्मभूमीवर मंदिर उभारण्याच्या पाठिंब्यासाठी ६ जानेवारी या दिवशी सायंकाळी फोंडा जुने बसस्थानक येथे विराट धर्मसभेत ते प्रमुख वक्ते या नात्याने बोलत होते. विश्‍व हिंदु परिषद गोमंतकच्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्यासपिठावर पद्मनाभ संप्रदायाचे प.पू. हंसराज स्वामी, बंजारा समाजप्रमुख गोव्याचे स्वामी सेवालाल महाराज, मडगाव येथील जीवनमुक्त मठाचे ह.भ.प. मुंकदराज महाराज, विश्‍व हिंदु परिषद गोमंतकचे अध्यक्ष संतोष महानंदू नाईक, मधुकर दिक्षित, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाना बेहरे, शिरीश आमोणकर, एकनाथ नाईक, अधिवक्ता महेश बांदेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अधिवक्ता गायकवाड पुढे म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाने राममंदिरासंबंधीची सुनावणी जर प्रतिदिन घेतली, तर केवळ २२ दिवसांत याविषयी निर्णय येऊ शकतो. राममंदिरासंबंधीची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार खंडपिठातील ३ न्यायाधिशांपैकी १ न्यायाधीश हा मुसलमान असतो, तसेच मंदिराचे उत्खनन करतांना ३ मजुरांपैकी १ मजूर मुसलमान पाहिजे, असा निर्देश आहे. असे नियम असूनही न्यायालयाच्या निर्णयाला विलंब का होत आहे? उत्खननामध्ये आतापर्यंत शंख, गदा, त्रिशुळ, गणपतीची मूर्ती आणि इतर अशा हिंदूंसाठी पूरक वस्तू सापडल्या आहेत. तसेच अलाहाबाद न्यायालयानेही रामजन्मभूमीवर मंदिर होते हे मान्य केले आहे, तरीही न्यायालयाच्या निर्णयाला विलंब का? आता तर त्याठिकाणी रामलला विराजमान आहेत. अयोध्या येथे राममंदिराच्या जागी आम्ही मशीद बांधायला देणार नाही. अयोध्येचा विषय मार्गी लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता लाभणे ही गौरवास्पद गोष्ट आहे. (साडेचार वर्षांत राममंदिर न बांधणे हे गौरवास्पद कसे काय ? आता ३ मासात अयोध्येचा विषय मोदी मार्गी लावणार नाहीत; कारण ते म्हणतात की, न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहा ! – संपादक) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात आम्हाला आता बळकट करायचे आहेत. (राममंदिर, ३७० कलम रहित करणे, आतंकवाद संपवणे, पाकवर कारवाई करणे, काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करणे, घुसखोरी रोखणे, गोहत्याबंदी कायदा करणे आदींसाठी हिंदूंनी साडेचार वर्षांपूर्वी बहुमत देऊन मोंदी यांचे हात बळकट केले होते; पण वरील सर्व समस्या जशासतशा आहेत. मोदी यांचे हात पुन्हा बळकट करायचे आहेत, हे सांगण्यासाठी ही राममंदिरावरील सभा होती का ? – संपादक)

राममंदिर श्रीरामाच्या जन्मभूमीवर बांधायचे नाही, तर कुठे परदेशात बांधायचे का? – प.पू. हंसराज स्वामी, पद्मनाभ संप्रदाय

राममंदिर श्रीरामाच्या जन्मभूमीवर बांधायचे नाही, तर कुठे परदेशात बांधायचे का ? आज हिंदु राष्ट्रामध्येच राममंदिरासंबंधी दाखले किंवा पुरावे मागितले जातात आणि ही एक खेदजनक गोष्ट आहे.

आता राममंदिर उभारणीसाठी अनुकूल काळ ! – स्वामी सेवालाल महाराज, बंजारा समाज

आता राममंदिर उभारणीसाठी अनुकूल काळ आहे. वर्ष २०२० पर्यंत राममंदिर उभारले जाईल, असे ठामपणे सांगू इच्छितो. मोदी शासनाने यासाठी प्रयत्नरत रहावे.

ख्रिस्त्यांसाठी जेरूसेलम, मुसलमानांसाठी मक्का, तर हिंदूंसाठी अयोध्या का नाही ? – संतोष महानंदू नाईक, अध्यक्ष, विश्‍व हिंदु परिषद, गोवा विभाग

प्रसारमाध्यमे दूरचित्रवाणीवर परिसंवादाद्वारे अयोध्या विषय भडकावत आहेत. ख्रिस्त्यांसाठी जेरूसेलम आणि मुसलमानांसाठी मक्का ही पवित्र स्थळे आरक्षित आहेत, तर हिंदूंना परमपूज्य असलेल्या अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी विलंब का ?

फोंडा येथील विराट सभेत अयोध्या येथे राममंदिर उभारणीचा संकल्प झाला, असे शिवोली येथील जीवनमुक्त मठाचे ह.भ.प. मुंकदराज महाराज म्हणाले.

क्षणचित्रे

१. सभेला ‘कायदा करा संसदेत, भव्य मंदिर अयोध्येत’ या जयघोषाने प्रारंभ झाला. विराट सभेत हिंदु युवा सेनेच्या सदस्यांनी जोशपूर्ण घोषणा दिल्या. ‘लाठी गोली खायेंगे, मंदिर वही बनाएंगे’, आदी घोषणा या वेळी देण्यात आल्या.

२. सभेला भाजपच्या अनेक आजीमाजी नेत्यांनी उपस्थिती लावली. यामध्ये खासदार अधिवक्ता नरेंद्र सावईकर, भाजपचे पक्षाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर, गोवा विधानसभेचे सभापती डॉ. प्रमोद सावंत आदींचा सहभाग होता.


Multi Language |Offline reading | PDF