छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रतापसिंह यांचे विचार तरुण पिढीला प्रेरणादायी ठरतील ! – युवराज कुवर लक्ष्यराज सिंह, महाराणा प्रतापसिंह यांचे वंशज

वैभववाडी येथे महाराष्ट्रातील पहिल्या महाराणा प्रतापसिंह कलादालनाचे उद्घाटन

वैभववाडी – सध्याची पिढी सोशल मीडियाची असूनही येथील इतिहास सुरक्षित आणि चांगला दिसून येतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रतापसिंह यांचे विचार तरुण पिढीला महाराणा प्रतापसिंह कलादालनाच्या माध्यमातून प्रेरणादायी ठरतील, असे प्रतिपादन महाराणा प्रतापसिंह यांचे वंशज मेवाड येथील युवराज कुवर लक्ष्यराज सिंह यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे देशातील दुसरे आणि महाराष्ट्र राज्यातील पहिले महाराणा प्रतापसिंह कलादालन आणि सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन मेवाड, राजस्थान येथील महाराणा प्रतापसिंह यांचे वंशज युवराज कुवर लक्ष्यराज सिंह मेवाड यांच्या हस्ते झाले. या वेळी कोल्हापूरचे श्रीमंत संभाजी राजे छत्रपती, खासदार नारायण राणे, आमदार नीतेश राणे यांसह स्थानिक पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

कलादालनाचे उद्घाटन आणि मान्यवरांचे स्वागत यांसाठी सर्वत्र झेंडे, पताका आणि शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले होते. युवराज कुवर लक्ष्यराज सिंह मेवाड, श्रीमंत संभाजीराजे छत्रपती आणि मान्यवर यांची बाजारपेठेतून घोड्यांच्या रथातून मिरवणूक काढण्यात आली.

या वेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

कलादालनामुळे महाराष्ट्र आणि राजस्थानच्या इतिहासावर प्रकाश टाकला जाईल !  – पर्यटनमंत्री जयकुमार रावल

देशाच्या इतिहासामध्ये अनेक शूर व्यक्तिमत्त्वे होऊन गेली; पण त्यातील लक्षात रहाण्यासारखे कार्य छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रतापसिंह यांनीच केले. भविष्यात यशस्वी होण्यासाठी इतिहासाची आठवण असणे आवश्यक आहे. या दालनाच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांतील इतिहासावर प्रकाश टाकण्याचे कार्य केले आहे. या केंद्राच्या उभारणीमुळे मेवाड आणि कोल्हापूर येथील युवराजांना एकत्र आणण्याचा एक नवा इतिहास रचला गेला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे पर्यटन आणि रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

आमदार नीतेश राणे यांनी या स्मारकाच्या उभारणीचा उद्देश स्पष्ट करतांना सांगितले की, पर्यटनाच्या माध्यमातून इतिहासाचे जतन करणे आणि आपला इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या स्मारकाचा उद्देश आहे.

देशाच्या विकासामध्ये आपण दिलेले योगदान हे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या कार्याचाच एक भाग असेल, असे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे या वेळी म्हणाले.


Multi Language |Offline reading | PDF