कोलवाळ (गोवा) कारागृहात कैद्यांचा मनमानी कारभार !

  • कारागृहात वारंवार अपप्रकार होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या असतांनाही आतापर्यंत प्रशासन आणि सरकार यांनी याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे एखादा अनर्थ घडल्यास त्याला केवळ सरकार आणि प्रशासन हेच उत्तरदांयी असतील !
  • कारागृहातील गैरकारभारावर नियंत्रण न मिळवू शकणारे प्रशासन शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमध्ये अंतर्गत पालट काय घडवणार ?
  • कारागृहात चालू असणार्‍या गैरकारभाराविषयी एका वृत्तपत्राला जेवढी माहिती आहे, तेवढी प्रशासनाला असू नये, हे प्रशासनाला अत्यंत लज्जास्पद ! यासाठी उत्तरदायी असणार्‍या प्रत्येकावर कठोरातील कठोर कारवाई होणे अपेक्षित !

पणजी – कोलवाळ कारागृहात कैद्यांचा मनमानी कारभार चालू असल्याचे सातत्याने पुढे येत असले, तरी तेथील गैरप्रकार अद्यापही थांबलेले नाहीत. कारागृहात कैदी मनमानी कारभार करत आहेत. सहकैद्यांना मारहाण करण्याचे प्रकारही सातत्याने घडत असतात. गेल्या काही दिवसांत कारागृहातील ३ कैद्यांना मारहाण झाल्याची घटना घडली, तरी त्यासंदर्भात अद्याप कारवाईची कोणतीच हालचाल झालेली नाही. त्यामुळे कारागृहाची सुरक्षा व्यवस्था डळमळीत झाल्याचे वृत्त ‘तरुण भारत’ वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे.

या वृत्तात म्हटले आहे की, कारागृहात प्रमुख कारागृहरक्षक आणि साहाय्यक कारागृहरक्षक यांच्या साहाय्याने अनेक गैरप्रकार चालू आहेत. (कैद्यांना गुन्हे करण्यासाठी साहाय्य करणार्‍या कारागृहरक्षकांवर कारवाई व्हायला हवी ! – संपादक) तसेच कैद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी कारागृहरक्षकांची संख्या अपुरी आहे. त्याचप्रमाणे कारागृहात मद्य, अमली पदार्थ आणि भ्रमणभाष उपलब्ध होत आहेत. त्यामुळे कारागृहात असून कैद्यांचे बाहेरचे व्यवहारही सुरळीत चालू आहेत. कारागृहात आतापर्यंत अनेकदा कैद्यांची झडती घेतली असता कैद्यांकडे भ्रमणभाष सापडले आहेत. कारागृहाची खिळखिळी सुरक्षाव्यवस्था आणि कैद्यांचा मनमानी कारभार यांमुळे तेथे कोणताही अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now