लोकसेवक आणि सेवालय !

मंत्रालयात पुणे येथील एका युवकाने आपल्या काही मागण्यांसाठी मंत्रालयाच्या मुख्य वास्तूतील दुसर्‍या मजल्यावर लावलेल्या संरक्षक जाळीवर उडी मारली. कोणी म्हणत आहे की, तो दुसर्‍या मजल्यावरील या जाळीवर चालतच गेला आणि मध्यभागी जाऊन बसला. त्यानंतर पोलीस त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असतांना त्या युवकाने सर्कशीतील जाळीप्रमाणे दुसरीकडे सरकण्याचा प्रयत्न केला. हा सर्व माहितीजन्य भाग झाला. या वेळी त्याने काही मागण्या केल्या. ‘शेतकर्‍यांच्या आत्महत्या’, ‘कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू’, ‘मातेचा मृत्यू जोपर्यंत थांबत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री, मंत्री आणि आमदार यांनी शासकीय निवासस्थाने अथवा अन्य अतिमहनीय व्यक्तींसाठीच्या सुविधांचा त्याग करावा’, ‘पुरोगामी महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री झालीच पाहिजे’, ‘लोकसभा आणि विधानसभेत महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असावे’, ‘आमदारांचे निवृत्तीवेतन रहित करावे’, ‘पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यासाठी अनुक्रमे ‘प्रधानसेवक’ आणि ‘मुख्यसेवक’ या शब्दांसाठी स्वतंत्र कायदा करावा’, ‘मंत्रालयाचे नाव ‘सेवालय’ व्हावे’, आदी १७ मागण्यांसाठी,  सदर युवकाने हे आंदोलन केले. यातील ‘सेवक’ या शब्दाविषयीची मागणी लक्षवेधी आहे.

प्रचलित लोकशाहीमध्ये महापालिका स्तरावर लोकनियुक्त लोकप्रतिनिधीची ‘नगरसेवक’ म्हणून ओळख होते. ‘सेवक’ हा शब्द उपयोगात आणले जाणारे लोकप्रतिनिधी स्तरावर असलेले ते एकमेव पद आहे. त्यातील ‘सेवक’ या पदाकडे लक्ष वेधले जाते. सेवक म्हटले की, हनुमंतासारखी दास्यभक्ती आठवते. सेवक कसा असावा, हे शिकायचे असेल, तर हनुमंताच्या गुणांचा अभ्यास करून त्याप्रमाणे आचरण करता येईल. सेवक भावाची आध्यात्मिक भूमी असलेल्या या भारतामध्ये आणि संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रामध्ये अनेक उदाहरणे आहेत. त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही. त्यामुळे ‘सेवक’ या शब्दाकडे केवळ एक शब्द म्हणूनच पाहिले जाते. ‘मी लोकनियुक्त लोकप्रतिनिधी आहे’ म्हणजे मी कुणीतरी विशेष आहे, असा अहंकार अनेक लोकप्रतिनिधींच्या कृतीतून दिसतो.

राजकारणामध्ये दादा, साहेब, भाऊ हे शब्द अधिक प्रमाणात उपयोगात आणले जातात; किंबहुना कोणा लोकप्रतिनिधीचे नाव घ्यायचे असेल, तर त्या व्यक्तीचे नाव आणि पुढे ते विशेष शब्द, अशी वाक्यरचनाच लोकशाहीमध्ये रूळली आहे. त्या शब्दांचा उपयोग केला नाही, तर जमणारच नाही, अशी स्थिती आहे. त्या व्यक्तीच्या पुढ्यात बोलतांना तिच्याविषयी विशेष शब्दांचा उपयोग करायचा आणि मागून तिची निंदा करायची, असेच बहुतेक वेळा चालू असते. ‘अधिक गोड बोलणारे धोकादायक असतात’, असा एक विचार समाजात रूढ आहे. तो येथे सत्य ठरतो, असे का म्हणू नये ? एकूणच काय, तर सर्वच लोकप्रतिनिधींसाठी ‘लोकसेवक’ हा शब्द उपयोगात आणला जाणे सयुक्तिक वाटते. यासह जी लोकसभागृहे आहेत, त्यांनाही ‘सेवालय’ हा शब्द देता येईल. यासाठी केंद्र सरकारने आवश्यक ती सुधारणा केली पाहिजे !

– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.


Multi Language |Offline reading | PDF