युद्धसज्जता आणि अन्वयार्थ !

पाकिस्तानच्या सैन्याने भारतीय सैनिकांना लक्ष्य करण्यासाठी अनुमाने ६०० ‘स्नायपर’ बंदुका विकत घेतल्या आहेत. त्यामुळे गुप्तचर विभागाने सैन्यदलाला सतर्कतेची चेतावणी दिली आहे. दिवसेंदिवस पाकच्या कुरापती वाढू लागल्या आहेत. या ‘स्नायपर’ बंदुकांचा सामना करण्यासाठी भारतीय सैनिक सिद्ध असल्याचे सुरक्षादलाने जरी सांगितले असले, तरी गतवर्षी म्हणजेच वर्ष २०१८ मध्ये १४ सैनिकांचा याच ‘स्नायपर’ बंदुकांच्या मार्‍यात मृत्यूही झाला आहे, ही गोष्टही दुर्लक्षून चालणार नाही. आता तर पाक स्टीलच्या एक लाख राऊंड स्नायपर गोळ्याही आतंकवाद्यांना सोपवणार आहे. हेच अल्प म्हणून कि काय चीननेही डोकलाम वादानंतर तिबेटमधील सैन्याला ‘मोबाईल हॉवित्झर तोफा’ पुरवल्या आहेत. या तोफांमध्ये ५० किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता आहे, तसेच या तोफा वाहनांमधून कुठेही वाहून नेता येऊ शकतात. एकूणच काय पाक आणि चीन यांमुळे भारताची डोकेदुखी वाढतच चालली आहे. बंदुका आणि तोफा यांच्या जोडीला आतंकवाद अन् घुसखोरी या समस्या तर भारताच्या पाचवीला पुजलेल्या आहेतच. शत्रूराष्ट्रे सर्वच बाजूंनी करत असलेली भारतीय सैन्याची कोंडी पहाता ‘ऑपरेशन ऑल आऊट’ किंवा ‘सर्जिकल स्ट्राईक’ अशा मोहिमांवर केवळ समाधान बाळगून आता उपयोग नाही. भारतीय सैन्यापुढे पाक आणि चीन यांचे मोठे आव्हानच उभे ठाकले आहे. शत्रूराष्ट्रांच्या दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या शस्त्रसामर्थ्यापुढे भारत ताठ मानेने कसा उभा रहाणार ? हा प्रश्‍नच आहे.

राष्ट्रासाठी बलीदान देणे हे जरी अभिमानास्पद असले, तरी शत्रूंकडून वारंवार आपले सैनिक मारले जात आहेत, या वस्तूस्थितीचाही तितक्याच गांभीर्याने विचार करून त्या दृष्टीने सर्वच स्तरांवर ठोस पावले उचलली जाणे आवश्यक आहे. वारंवार सैनिकांना बलीदान द्यावे लागत असल्याने सैन्यभरतीसाठीही भारतीय युवक आज उत्सुक नाही. त्यामुळे ‘सैन्यात भरती व्हा’ अशी विज्ञापनेही सैन्याला प्रसिद्धीसाठी द्यावी लागतात. हे दुर्दैव नव्हे का ? अर्थात् ‘आतापर्यंत सर्वत्र अहिंसेचेच ढोल बडवले गेल्याने त्याचेच पडसाद अशा प्रकारे उमटत आहेत’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. देश संकटात असल्याने याचाही सरकारने विचार करावा. महत्त्वाचे म्हणजे नुसती विज्ञापने देऊन आजचा तरुण युवक सैन्यात भरती होणार नाही, त्यासाठी तशी शिक्षणप्रणाली सरकारने कार्यान्वित करायला हवी. मुलांना लहानपणापासूनच राष्ट्रप्रेमाचे बाळकडू देणारे धडे अभ्यासक्रमात समाविष्ट केल्यास ही समस्या नक्कीच सुटेल.

भारतावरील तिहेरी संकट !

अमेरिकेने भारतासमवेत आतापर्यंत काही करार केले, भारतासमवेतचे मैत्री संबंध जगाला दाखवण्याचाही प्रयत्न केला, तरी अमेरिकेकडून शस्त्रास्त्रांच्या संदर्भात पाकला मात्र वेळोवेळी साहाय्यच केले जाते. चीनची घुसखोरी, पाकचा आतंकवाद आणि अमेरिकेने पाठीमागून खंजीर खुपसणे असे तिहेरी संकट भारतासमोर ‘आ’ वासून उभे आहेच ! चीनने गेल्या १० वर्षांत ४०० लढाऊ विमाने ताफ्यात दाखल केली, तर पाकच्या ताफ्यातील लढाऊ विमानांची संख्याही दुप्पट झाली आहे. अमेरिकेतील ‘कार्नेगी एन्डॉमेंट फॉर इंटरनॅशनल पीस अँड स्टिमसन सेंटर’ या संस्थेच्या मतानुसार येत्या १० वर्षांत पाकिस्तानकडे भारतापेक्षा दुप्पट अण्वस्त्रे असणार आहेत. पाकिस्तान प्रतिवर्षी १४ ते २७ अण्वस्त्रांची निर्मिती करतो; मात्र भारत प्रतिवर्षी केवळ २ ते ५ अण्वस्त्रांची निर्मिती करतो. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यातच भारताला प्रौढीही वाटावी, हे लज्जास्पद नव्हे का ? आणखी एक खेदाची गोष्ट म्हणजे शांतीचा बुरखा ओढून अहिंसेचा जप करणारे, ‘राफेल’ विषयावरून आरोपांची विमाने उडवणारे, साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला बोलावण्याचे रहित केल्याने नयनतारा सहगल यांच्या तथाकथित अवमाननाट्यात गुंतलेले यांना मात्र शत्रूराष्ट्रांच्या हालचालींचा थांगपत्ताही नसेल !

युद्धसज्ज भारतच बलवान राष्ट्र होईल !

शत्रूराष्ट्रांच्या युद्धसज्जतेपुढे भारताची युद्धसज्जता खरोखरच सक्षम आणि वरचढ आहे का ? शत्रूचा सामना करतांना स्वतः वरचढ ठरण्यासाठी मुत्सद्देगिरीच हवी; पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आजच्या शासनकर्त्यांमध्ये ती दिसून येत नाही. पाक, चीन तर युद्धाची ठिणगी पडण्याची वाटच पहात आहेत आणि भारत विकासाच्या मागे धावण्यातच मग्न राहून एकप्रकारे राष्ट्रघातच करत आहे. हे उद्वेगजनकच आहे. आता लोकसभा निवडणुकीचा काळ जवळ आला आहे. निवडणूक आणि विकास दोन्ही गोष्टी राष्ट्रासाठी महत्त्वाच्या आहेतच; परंतु देशाच्या सीमांची नाजूक स्थिती पहाता संरक्षणक्षेत्रात भारताने स्वतःचा दबदबा निर्माण करणे, सुरक्षेला प्राधान्य देणे, हे सध्याच्या स्थितीला अग्रक्रमाचे आहे. शत्रूला आपली युद्धसज्जता पाहून घाम फुटायला हवा.

‘ठाऊक असलेली शस्त्रे, अस्त्रे नव्हेत, तर त्याहून भीषणतर नवनवीन शस्त्रास्त्रे शोधून काढण्यासाठी आणि घडवण्यासाठी शतावधी रणरसायनशाळा खटपटत राहिल्या पाहिजेत. सहस्रावधी शस्त्रास्त्रांचे कारखाने सार्‍या देशभर खणखणत राहिले पाहिजेत’, हे द्रष्ट्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार देशाच्या युद्धसज्जतेसाठी आदर्श आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर नेहमी म्हणत, ‘भारताला संरक्षणमंत्री नको, तर आक्रमणमंत्री हवेत !’ आज भारताच्या चहूबाजूला असलेल्या शत्रूराष्ट्रांच्या कारवाया पहाता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे महत्त्व आपल्या लक्षात येते. राष्ट्रप्रेम, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि निष्णात अशी युद्धसज्जता असल्यासच संपूर्ण जगात भारत हे बलवान राष्ट्र म्हणून उदयास येईल, हे शासनकर्त्यांनी लक्षात घ्यावे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now