मुंबईत बेस्टच्या संपामुळे नोकरदारांचे हाल !

नोकरदारांचा वेळ आणि पैसा यांची संपामुळे झालेली हानी कोण भरून काढणार ?

मुंबई – शिवसेनाप्रणित कामगार सेनेने संपातून माघार घेण्याची घोषणा केली असली, तरी कामगार सेनेच्या कर्मचार्‍यांनी शिवसेनेचा आदेश पाळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे संपाच्या दुसर्‍या दिवशी मुंबई सेंट्रल व्यतिरिक्त एकाही डेपोतून बस बाहेर पडलेली नाही. रिक्शा आणि टॅक्सी चालकांनी या परिस्थितीचा अपलाभ घेत ग्राहकांकडून पैसे उकळले. संपामुळे मेट्रोच्या घाटकोपर रेल्वे स्थानकात बरीच गर्दी झाली. नोकरदारांचे पुष्कळ हाल झाले.

विक्रोळी, मुलुंड, वांद्रे, आणिक आगर, शिवाजी नगर बस डेपोतील कामगार सेनेच्या सभासदांनी सामूहिक राजीनामे दिले असल्याचेही समजते. कामगार संघटना आणि प्रशासन यांच्यात झालेली बैठकही निष्फळ ठरली. अनुकंपा भरती, निवासस्थाने, सातवा वेतन आयोग मुंबई महानगरपालिका कर्मचार्‍यांप्रमाणे बोनस आदी कर्मचार्‍यांच्या मागण्या आहेत.

बेस्टच्या कर्मचार्‍यांना मेस्माअंतर्गत नोटीस

संपावर गेलेल्या बेस्टच्या कर्मचार्‍यांना मेस्माअंतर्गत नोटीस देण्यास आली असून बेस्ट वसाहतीतील खोल्या खाली करा, असा आदेशही बेस्ट प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे वाद निर्माण होऊन संप आणखीनच चिघळत आहे. बेस्टच्या संपात फूट पडली आहे. काही कर्मचारी कामावर रुजू होत आहेत, तर काही संपावर ठाम आहेत. सकाळी वडाळा डेपोबाहेर एका बसवर दगडफेक करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: दौर्‍यावरून आल्यावर बेस्ट संपाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी बैठक घेणार असल्याचे समजते.


Multi Language |Offline reading | PDF