मराठी साहित्य संमेलन चालू होण्याच्या तोंडावर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचे त्यागपत्र

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळामध्ये मानापमान नाट्य

यवतमाळ – ११ जानेवारीपासून चालू होणार्‍या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तोंडावर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी त्यागपत्र दिले आहे. साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून इंग्रजी लेखिका आणि ‘पुरस्कारवापसी’ साहित्यिकांमधील एक असलेल्या नयनतारा सहगल यांना मराठी संमेलनाचे उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण मागे घेतल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर श्रीपाद जोशी यांनी विदर्भ साहित्य संघाच्या माध्यमातून साहित्य महामंडळाच्या उपाध्यक्षा विद्या देवधर यांना संगणकीय पत्राद्वारे त्यागपत्र पाठवले. महामंडळाच्या १० जानेवारीला होणार्‍या बैठकीत श्रीपाद जोशी यांचे त्यागपत्र स्वीकारण्याच्या संदर्भात निर्णय होणार आहे. त्यांचा कार्यकाळ पुढील ३ मासांत संपणार होता.

मराठी साहित्य महामंडळाचा भोंगळ कारभार उघड !

नयनतारा सहगल यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून निमंत्रण देण्यात आले होते; मात्र त्यांच्या नावाला काही संघटनांकडून विरोध करण्यात आला होता. ‘मराठीच्या संमेलनाच्या उद्घाटनाला इंग्रजी लेखिका कशासाठी ?’, असे सूत्र उपस्थित करत काही संघटनांनी संमेलन उधळून लावण्याची चेतावणी दिली होती. त्यानंतर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्या सांगण्यावरून यवतमाळ साहित्य संमेलनाच्या आयोजन समितीने सहगल यांना पाठवलेले निमंत्रण रहित केले होते. त्यावरून श्रीपाद जोशी यांच्यावर टीका होत होती. (मराठीच्या संमेलनाला इंग्रजीच्या लेखकांना बोलावण्याला कुणी आक्षेप घेतला नसता, तर सहगल यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन झालेही असते ! असे साहित्यिक मराठीशी एकनिष्ठ आहेत, असे आपण म्हणू शकतो का ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF