दलाल ख्रिश्‍चिअन मिशेलशी असलेले संबंध काँग्रेसने स्पष्ट करावेत ! – पंतप्रधान

केवळ अशी विधाने करून काय साध्य होणार आहे ? ख्रिश्‍चिअन मिशेलच्या काँग्रेसशी असलेल्या संबंधांचे अन्वेषण नरेंद्र मोदी यांचे सरकार करू शकत नाही का ?

सोलापूर – लढाऊ विमान करारात ख्रिश्‍चिअन मिशेलची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. मिशेल आणि काँग्रेस यांचे काय नाते आहे, हे काँग्रेसने स्पष्ट करावे, असा प्रश्‍न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील कार्यक्रमात केला. ते येथील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमीपूजन या कार्यक्रमांसाठी आले होते. या वेळी मोदी यांनी सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी विविध योजनांचे लोकार्पण आणि भूमीपूजन यांसह सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या १ सहस्र कोटी रुपयांच्या रेल्वेमार्गास संमती दिल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली, तसेच ‘राज्यातील ४ विमानतळांचा विकास करण्याचे काम चालू असून लवकरच ‘उडाण योजने’तून सोलापूरहूनही विमानसेवा चालू होईल’, असेही मोदी यांनी सांगितले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

या वेळी मोदी यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद चौपदरी राष्ट्रीय महामार्ग, स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत भूमीगत मलनि:सारण यंत्रणा आणि सांडपाणी प्रक्रिया करणार्‍या तीन यंत्रणा यांचे लोकार्पण झाले. सोलापूर स्मार्ट सिटीमध्ये विभागवार आधारित पाणीपुरवठा आणि स्वच्छता यंत्रणा सुधारणा विषयक संयुक्त प्रकल्प, उजनी धरणातून सोलापूर शहराला होणारी पेयजल पुरवठा व्यवस्था मजबूत करण्यासाठीच्या योजनेची, तसेच अमृत योजनेच्या अंतर्गत भूमीत मलनि:स्सारण योजनेची पायाभरणी झाली. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत ३० सहस्र घरांचे भूमीपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

या वेळी पंतप्रधान राममंदिराविषयी काही बोलतील, अशी सोलापूरवासियांची अपेक्षा होती; पण त्यांचा भ्रमनिरास झाला.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की,

१. आरक्षणाच्या सूत्रावरून देशात खोटा प्रचार करणार्‍यांना आम्ही गरीब सवर्णांना १० टक्के आरक्षण देऊन चपराक दिली आहे. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १० वर्षे आरक्षण घोषित केले होते; मात्र त्यानंतरच्या शासनकर्त्यांनी ते वाढवत नेले. डॉ. आंबेडकर यांच्या भूमिकेतून आरक्षण संपवायला हवे ! – संपादक)

२. भाजपचे राज्य येण्यापूर्वी देहलीत १० वर्षे ‘रिमोट कंट्रोल’चे सरकार होते.

३. केवळ सोलापूर शहरात ३० सहस्र घरांची निर्मिती होत आहे. साडेचार वर्षांत आम्ही ७० लाख शहरी गरिबांच्या घरांना संमती दिली. ४ वर्षांत १४ लाख घरे बनवली आणि लवकरच ३७ लाख आणखी घरे बांधण्यात येतील.

४. भाजप सरकार आल्यापासून दलालांना पैसे खाता येत नाहीत. त्यामुळे विकासाचा वेग वाढला आहे.

सोलापूर येथे नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

सोलापूर – येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने शिवाजी चौकात हवेत पाण्याचे फुगे फेकून निदर्शने केली. (हास्यास्पद आंदोलने करून स्वतःचा वेळ आणि पैसा वाया घालवून राष्ट्रवादी काँग्रेस काय साध्य करू पहात आहे ? – संपादक) नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्‍वासनांमध्ये २ कोटी युवकांना रोजगार, सोलापूरला टेक्स्टाईल हब करण्याचे आश्‍वासन, धनगर आणि मुसलमान आरक्षण, यांसह अनेक आश्‍वासनांची पूर्तता न केल्याने आंदोलन करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. (काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकार सत्तेत होते, त्या वेळी त्यांनी जनतेला दिलेली किती आश्‍वासने पूर्ण केलीत, हे आधी राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेला सांगावे ! – संपादक) हे आंदोलन करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले.


Multi Language |Offline reading | PDF