(म्हणे) ‘माझ्या जिवाला धोका असल्याने मी मायदेशी परतण्यास असमर्थ !’ – नीरव मोदी

देशाच्या अर्थव्यवस्थेला हादरे देऊन विदेशात पसार झालेल्या चोराच्या उलट्या बोंबा !

मुंबई – माझ्याविषयीच्या प्रकरणाचा राजकारणासाठी उपयोग केला जात आहे. माझ्या प्रतिमा जाळल्या जात आहेत. माझ्याविरुद्ध लोकांना चिथावणी दिली जात आहे. यामुळे माझ्या जिवाला धोका असल्याने मी मायदेशी परतण्यास असमर्थ आहे, असा युक्तीवाद पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी यांनी प्रतिज्ञापत्रावर उत्तर मांडतांना विशेष पीएम्एलए न्यायालयात केला.

याप्रकरणी गुन्हा नोंद होण्याच्या पुष्कळ कालावधीआधीच मी भारताबाहेर गेलो होतो, तसेच सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) पाठवलेल्या समन्सला मी वेळोवेळी उत्तरे दिली आहेत. त्यामुळे मी न्यायालयीन प्रक्रिया टाळत असल्याचे म्हणता येणार नसल्याचा दावाही त्यांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे, तर ‘मोदी यांना ३ वेळा समन्स पाठवूनही उत्तर दिले नाही’, असा दावा करत सक्तवसुली संचालनालयाने त्यांच्या विरोधात नव्या कायद्याचा बडगा उगारण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. विजय मल्ल्यांप्रमाणेच नीरव मोदीही न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी मायदेशी परतत नसल्याने त्यांनाही नव्या कायद्याप्रमाणे पसार (परागंदा) आर्थिक गुन्हेगार ठरवण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने विशेष पीएम्एलए न्यायालयात अर्ज केलेला आहे.


Multi Language |Offline reading | PDF