विशाखापट्टणम् येथे ‘मनुष्याच्या जीवनात धर्माचे महत्त्व’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांचे मार्गदर्शन

हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत आंध्रप्रदेशमध्ये प्रचार

विशाखापट्टणम् – ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’च्या अंतर्गत आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम् शहरात गुजराती समाजासाठी नुकतेच ‘मनुष्याच्या जीवनात धर्माचे महत्त्व’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी १६ संस्कार, ४ ऋण, ४ पुरुषार्थ या सर्वांचे महत्त्व, धार्मिक विधीचा अर्थ आणि त्याचे महत्त्व, तसेच जीवनात साधनेचे महत्त्व, कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप केल्याने होणारे आध्यात्मिक लाभ आदींविषयी माहिती दिली. ‘भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील रासलीलेसारख्या प्रसंगाचा चुकीचा अर्थ काढून समाजात विकृत आचरण चालू आहे. भगवान श्रीकृष्णाने असुरांचा नाश करून धर्मरक्षणाचे कार्य केले आहे, हे आपण विसरतो. धर्म समजून घेऊन योग्य आचरण केल्यास त्यातून आपल्याला आध्यात्मिक लाभ होणार आहे’, असे श्री. शिंदे यांनी या वेळी सांगितले.

या कार्यक्रमाला गुजराती समाजातील अनुमाने १०० लोक उपस्थित होते. या वेळी श्री. शांतीभाई पटेल, श्री. तरुण गोस्वामी, श्री. अमृतभाई पटेल, श्री. मनिलालाभाई पटेल उपस्थित होते.

श्री. रमेश शिंदे यांचा श्री. अमृतभाई पटेल यांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. सनातनच्या साधिका हंसाबेन रविलाल पटेल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

क्षणचित्रे

  • व्याख्यानानंतर काही महिलांनी उत्स्फूर्तपणे शंकांचे निरसन करून घेतले.
  • उपस्थितांनी १५ दिवसांनी एकदा सत्संग चालू करण्याची मागणी केली.
  • व्याख्यान ऐकून प्रभावित झालेल्या सर्वांनी ‘पुढच्या वेळी आम्ही परिवारातील इतर सदस्यांसह उपस्थित रहाणार’, असे सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF