(म्हणे) ‘विचारवंतांच्या हत्या करणार्‍या गटाला सनातन प्रभातचे माजी संपादक कै. शशिकांत राणे यांनी पैसे पुरवले !’

 • अन्वेषणात काहीही हाती न लागल्याने राष्ट्र आणि धर्म यांसाठी आयुष्य समर्पित करणार्‍या सनातन प्रभातच्या माजी संपादकांची मानहानी करणारे कर्नाटकातील विशेष अन्वेषण पथक !

 • राष्ट्र आणि धर्म यांसाठी समर्पित असलेल्या एका संपादकांची अपकीर्ती करणार्‍या वृत्तास ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून प्रसारित करणारी प्रसारमाध्यमे महिला पत्रकारावर बलात्कार करणार्‍या, पैसे घेऊन बातम्या छापणार्‍या गुन्हेगारी वृत्तीच्या संपादकांच्या वृत्तांना प्रसिद्धी देत नाहीत, हे लक्षात घ्या !

मुंबई – पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणी अटक केलेल्या १२ आरोपींपैकी श्री. अमित डेगवेकर यांनी त्यांच्या जबाबात सनातन प्रभातचे माजी समूह संपादक कै. शशिकांत राणे यांनी डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या ४ हत्या करण्यासाठी पैसे पुरवल्याचे म्हटले आहे, असे वृत्त ‘न्यूज १८ लोकमत’ ही वृत्तवाहिनी, तसेच ‘द हिंदु’, ‘पुढारी’ आदी वृत्तपत्रांनी प्रसारित केले आहे. ‘कर्नाटक एस्आयटीने बेंगळूरू न्यायालयात प्रविष्ट केलेल्या दोषारोपपत्रात हे नाव आहे’, असेही वृत्तात म्हटले आहे. या वृत्तानुसार श्री. डेगवेकर यांनी त्यांच्या जबाबात ‘वीरेंद्र तावडे यांनी माझी आणि कै. शशिकांत राणे यांची भेट घडवून दिली’, असेही म्हटल्याचे सांगण्यात आले. कै. राणे यांचे एप्रिल २०१८ मध्ये हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले.

हे वृत्त प्रसारित केल्यानंतर हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची मुलाखत घेण्यात आली. त्यात त्यांनी पुढीलप्रमाणे सूत्रे मांडली.

एका मृत व्यक्तीवर चिखलफेक करणे, हा अत्यंत वाईट प्रकार ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद

अधिवक्ता संजीव पुनाळेकर

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणातील आरोपपत्र कन्नड भाषेत आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना प्रचंड मारहाण करून आरोपपत्रावर त्यांच्या स्वाक्षर्‍या घेतल्या आहेत. आरोपींना मारहाण केल्याची आम्ही केलेली तक्रारही अद्याप प्रलंबित आहे. ‘न कळणार्‍या भाषेतील कागदपत्रांवर स्वाक्षरी घ्यायची आणि ती कागदपत्रे ‘लीक’ करायची’, हे खूप भयानक आहे. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातही सीबीआयचे अधिकारी नंदकुमार नायर यांनी एका वाहिनीला कागदपत्रे विकल्याची तक्रार झाल्यावर पंतप्रधान कार्यालयाने त्यांची चौकशी करण्याचा आदेश दिला होता, याची बातमी होत नाही; मात्र कर्नाटक पोलीस कन्नड भाषेत काहीतरी लिहून त्यावर बळजोरीने आरोपींकडून स्वाक्षरी घेतात आणि त्याचा आधार घेत एका मृत व्यक्तीवर चिखलफेक केली जाते, हे अत्यंत वाईट आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने आरोपींना प्रचंड मारहाण केल्याच्या तक्रारीची नोंद न घेतल्याने सुनावणी करणार्‍या न्यायाधिशांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. खरे तर यावरून न्याययंत्रणेतील भ्रष्टाचार आणि न्यायालयाने केलेल्या तक्रारीची नोंद न घेतल्याची ‘ब्रेकींग न्यूज’ व्हायला हवी होती; मात्र तसे होत नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे.

विशेष संपादकीय

… हा तर मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार !

काँग्रेसच्या राज्यात टिपू सुलतानचा ‘सन्मान’, तर सत्यनिष्ठ संपादकांचा अपमान !

डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या कथित विचारवंतांची हत्या करण्यासाठी म्हणे सनातन प्रभात नियतकालिकाचे माजी समूह संपादक कै. शशिकांत राणे यांनी निधी पुरवल्याचा जावईशोध कर्नाटकच्या विशेष अन्वेषण पथकाने लावला आहे. ‘भारतात असुरक्षितता वाढली आहे’, असे तुणतुणे वाजवून हिंदुत्वनिष्ठांना हिणवण्याचा प्रकार सध्या चालू आहे; मात्र परिस्थिती अगदी उलट आहे. हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ संपादकांना अशा प्रकारे खोट्या प्रकरणांमध्ये गोवून हिंदुत्वनिष्ठांमध्ये दहशतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यात येत आहे. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांनी वृत्तपत्रस्वातंत्र्याची गळचेपी केली होती. तोच कित्ता आज गिरवला जात आहे. सनातन प्रभातच्या माजी संपादकांना लक्ष्य करून आमच्या वृत्तपत्रस्वातंत्र्याची मुस्कटदाबी करण्याचे काँग्रेस सरकारचे हे षड्यंत्र आहे. काँग्रेस सरकारला सहस्रावधी हिंदूंना ठार मारणारा टिपू सुल्तान ‘आपला’ वाटतो; मात्र कै. राणेकाका यांच्यासारखे सत्शील आणि त्यागी संपादक ‘गुन्हेगार’ वाटतात, यातच काँग्रेस सरकार आणि अन्वेषण यंत्रणा यांची पात्रता लक्षात येते.

होय, सनातन प्रभातच्या संपादकांनी ‘हिंदु राष्ट्रा’च्या विचारांचे ‘फंडींग’ केले आहे !

‘धर्मविरोधी लोकांना ‘फंडीग’ हे केवळ पैशांचे असते’, हेच ठाऊक आहे; मात्र सनातन प्रभातच्या दृष्टीने धर्म, हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्र यांचे विचार हेच धन आहे. त्यामुळे कै. राणेकाका यांनी ‘सनातन प्रभात’साठी, हिंदु राष्ट्राचा विचार घेऊन जाणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी हिंदुत्व विचारांचे वैचारिक ‘फंडींग’ नक्कीच केले आहे. हिंदुत्वाच्या विचारांचे ‘फंडींग’ करणे, हा जर गुन्हा असेल, तर तो केवळ संपादक कै. राणेकाका यांनीच नव्हे, तर आजवर सनातन प्रभातच्या वार्ताहरांपासून ते संपादकांपर्यंत ज्यांनी ज्यांनी सेवा केली आहे, त्या सर्वांनी हा गुन्हा केला आहे, करत आहेत आणि यापुढेही ते करत रहातील ! धर्मविरोधकांनी आणि पोलिसांनी इतिहास चाळून पहावा, धर्मावर चालून आलेल्यांची गत काय होते ते ! धर्मावर आघात करून तुम्ही किती काळ कार्य कराल ? पांडवांना त्रास देणार्‍या शिशुपालाच्या पापाचेही घडे १०० अपराधांनंतर भरलेच होते. त्यामुळे धर्मविरोधकांच्याही पापाचे घडे भरतील आणि भगवान श्रीकृष्ण त्यांना त्याचे फळ अवश्य देईल, यात तीळमात्र शंका नाही. धर्मपरायण साधकवृत्तीचे निःस्वार्थी संपादक म्हणून ज्यांनी हयात घालवली, त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणार्‍यांना भगवंतही त्याच्या पिंजर्‍यात नक्कीच उभा करेल, हे त्यांनी लक्षात ठेवावे !

माजी संपादकांना आरोपी ठरवून सनातन प्रभातला धमकावू पहाणार्‍यांनो, सनातन प्रभातला संपवण्याचे कितीही प्रयत्न करून पहा. पांडवांना संपवण्याचे हरेक प्रयत्न कौरवांनी केले; पण प्रत्येक प्रयत्न श्रीकृष्णाने हाणून पाडला. तोच भगवान श्रीकृष्ण सनातन प्रभातचा पाठीराखा आहे. सनातन प्रभात हे प्रचलित वृत्तपत्रांसम पैशांच्या तालावर नाचणारे ‘प्रेस्टीट्युट’ (पैसे घेऊन वृत्ते छापणारी वृत्तपत्रे) श्रेणीतले वृत्तपत्र नाही, तर भगवंताच्या आशीर्वादावर चालणारी एक चळवळ आहे. या चळवळीने आता हिंदु राष्ट्राचे रूप धारण करायला आरंभ केला आहे आणि ती २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र स्वरूप होऊनच थांबेल ! तेव्हा राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही यांना त्यांच्या पापाचे फळ भोगावेच लागेल.’

राष्ट्र आणि धर्म यांसाठी समर्पित असणारे कै. शशिकांत राणे यांची त्यांच्या मृत्यूनंतर अपकीर्ती करणे संतापजनक  !

कै. राणे हे एका अधिकोषात (बँकेत) व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. राष्ट्र आणि धर्म यांसाठी स्वतःचे आयुष्य समर्पित करण्याच्या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी नोकरीचे त्यागपत्र दिले आणि ते सनातन प्रभातमध्ये रुजू झाले. ते मागील २० वर्षे अविरतपणे सनातन प्रभातमध्ये सेवारत होते. एप्रिल २०१८ मध्ये त्यांचे निधन झाले. शेवटच्या श्‍वासापर्यंत राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्यरत रहाण्याची त्यांनी दाखवलेली तळमळ ही प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे. अन्वेषण यंत्रणांनी अशा ध्येयासक्त आणि व्रतस्थ जीवन जगलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिच्या नावावर काहीही खपवणे म्हणजे मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा अश्‍लाघ्य प्रकार आहे !

धर्मशास्त्रात सांगितलेल्या कर्मफलन्यायानुसार संबंधितांना शिक्षा होईल !

४ विचारवंतांच्या हत्येच्या प्रकरणात अन्वेषण यंत्रणांकडून प्रतिदिन नवनवीन सुरस कथा रचल्या जात असून त्यांतील ‘म्होरके’, ‘सूत्रधार’, ‘मास्टरमाईंड’ हेही पालटत आहेत. सध्या ‘आरोपी’ समजले गेलेल्या निष्पाप हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधात काही पुरावे न मिळाल्याने मृत व्यक्तीला आरोपी करणे, यातूनच अन्वेषणाचा फोलपणा दिसून येतो. ‘आम्ही फार मोठा कट उघडकीस आणला’, हे जगाला दाखवण्यासाठी एका मृत व्यक्तीचे नाव दोषारोपपत्रात घुसडण्याचे पाप अन्वेषण यंत्रणेने केले आहे. आमचा न्यायालयीन प्रक्रियेवर पूर्ण विश्‍वास आहे. याविषयी न्यायालयात सत्य समोर येईलच. त्याही पुढे जाऊन एक सत्शील आणि त्यागी व्यक्तीला अशा प्रकारे गोवण्याचा गुन्हा करणार्‍या संबंधितांना धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार शिक्षा होणार, हे निश्‍चित !

सनातन प्रभातचा वैचारिक लढा चालूच राहील !

‘हिंदु राष्ट्र येण्यासाठी समाजात वैचारिक परिवर्तन घडवणे आवश्यक असून त्यासाठी सनातन प्रभातचे योगदान मोठे असेल’, यावर कै. राणे यांचा दृढ विश्‍वास होता. त्या दृष्टीने त्यांनी सातत्याने समाजातील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात वैचारिक लढा दिला. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत असलेले सनातन प्रभात अनेकांच्या डोळ्यांत खुपत असून त्यावर बंदी आणण्यासाठी समाजातील काही घटक कार्यरत आहेत. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार पोलिसांना हाताशी धरून सनातन संस्था आणि सनातन प्रभात यांची अपकीर्ती करत आहेत, तसेच त्यांचा छळ करण्यासाठी नवनवीन कट रचत आहेत. असे असले, तरी असा कितीही छळ झाला, तरी सनातन प्रभात त्याला बधणार नाही ! राष्ट्र आणि धर्म यांसाठी त्याग करण्याची उज्ज्वल परंपरा सनातन प्रभातला लाभली आहे. ती यापुढेही चालू राहील, हे विरोधकांनी लक्षात ठेवावे !’


Multi Language |Offline reading | PDF