साहित्य संमेलन कि राजकीय संमेलन ?

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरणच बनले आहे. बहुतांश वेळा संमेलनाच्या आधी वाद निर्माण होऊन या संमेलनाला चांगली प्रसिद्धी मिळते. यंदाच्या संमेलनालाही तशी मिळत आहे. भारतीय संस्कृतीनुसार साहित्यिक म्हणजे सरस्वतीचे पुजारी; पण हल्लीच्या पुरोगामी साहित्यिकांचा सरस्वतीवर विश्‍वास असणे कठीणच ! त्यामुळे त्यांच्यावर सरस्वतीची कृपा तरी कशी असणार ? तसेच जेथे सरस्वतीचे पुजारी असतील, तेथे वाद तरी कसे निर्माण होतील ? यंदाचे मराठी साहित्य संमेलनही पुरोगामी साहित्यिका नयनतारा सहगल यांना दिलेले उद्घाटनाचे निमंत्रण रहित केल्यावरूनच्या वादामुळे प्रसिद्धीझोतात आहेत.

हिंदुद्वेषाने पछाडलेल्या सहगलबाई !

नयनतारा सहगल या इंग्रजी साहित्यिका ! त्यांना नेहरू घराण्याचा वारसा आहे. भारताचे पहिले पंतप्रधान नेहरू यांची एक बहीण विजयालक्ष्मी पंडित यांची कन्या म्हणजे नयनतारा सहगल. हिंदुत्वविरोधी, तथाकथित पुरोगामी, तथाकथित धर्मनिरपेक्ष अशी यांची सर्वांना ओळख आहे. मोदी शासन सत्तेवर आल्यावर एका वर्षातच त्यांना देशात असुरक्षितता जाणवू लागली आणि त्यांनी काँग्रेस शासनकाळात मिळालेला साहित्य अकादमी पुरस्कार परत केला आणि येथूनच पुरस्कार वापसीचे नाटक देशभरात चालू झाले. नाटक यासाठी म्हणायचे; कारण पुरस्कार परत करणार्‍यांनी त्यासमवेत मिळालेली रक्कम परत केली नाही. अशा या इंग्रजी विचारसरणीच्या सहगलबाई अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात काय बोलणार होत्या, ते काही संकेतस्थळांनी प्रसिद्ध केले आहे. ते वाचल्यास कोणताही सुबुद्ध हिंदु सहगलबाईंना दिलेले निमंत्रण रहित केले म्हणून दुःखी होणार नाही.

सोयीस्कर स्वातंत्र्याचा पुरस्कार !

सहगल यांचे निमंत्रण रहित केल्यावरून काँग्रेस, तथाकथित पुरोगामी साहित्यिक, भाजपविरोधक यांनी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणे चालू केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘या प्रकरणाशी सरकारचा काहीही संबंध नाही’, असे स्पष्ट करूनदेखील एकजात सर्व भाजपविरोधक सरकारच्या मागे हात धुऊन लागले आहेत. अनेक निमंत्रितांनी तर संमेलनावर बहिष्कार घालण्याची धमकीच दिली आहे. अर्थात् पुरोगामी साहित्यिकांची वृत्तीच बंडखोरीची असते. त्यामुळे पुरस्कार परत करणे, बहिष्कार घालणे हा त्यांच्या कार्याचा एक अजेंडाच बनलेला असतो. तशी परिस्थिती कुठे निर्माण होते का, याच्याच शोधात ते असतात, असे म्हणणेही अतिशयोक्तीचे ठरणार नाही. यांच्याप्रमाणे काँग्रेसवालेही भाजप सरकारला कोंडीत पकडण्यासाठी अशा घटनांच्या शोधात असतात. साहित्य संमेलनात नेहरूंच्या भाचीचेच निमंत्रण रहित केल्यानंतर गांधी-नेहरू घराण्याशी निष्ठा वाहिलेले महाराष्ट्रातील काँग्रेसचे राजकारणी गप्प कसे बसतील ? या सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सहिष्णुता आदी गोष्टी सोयीस्कररित्या आठवतात.

पुरोगामी आतंकवाद !

या हिंदुद्वेष्ट्यांच्या दुर्दैवाने म्हणा किंवा भाजपच्या सुदैवाने म्हणा देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (जेएन्यूत) साम्यवादी विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेने आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांना विद्यापिठात निमंत्रित केल्यावरून ८ आणि ९ जानेवारी या दिवशी संप पुकारला. तथाकथित पुरोगामी साहित्यिक, याच पठडीतील वृत्तवाहिन्या आणि राजकारणी हे सर्व वैचारिक अतिरेक्यांचे गट जेएन्यूतील या घटनेविषयी ‘अळी मिळी गुपचिळी’ आहेत. यापूर्वी या विद्यार्थी संघटनेने योगऋषी रामदेवबाबा यांच्या कार्यक्रमाला विरोध केला होता. कर्नाटकमध्ये अनेक ठिकाणी आणि गोव्यात प्रमोद मुतालिक यांना प्रवेशबंदी आहे. तोगाडिया यांच्या सभेला अनेक वेळा विरोध होऊन त्यांच्या सभा रहित करण्यात आल्या. बंगालमध्ये भाजपच्या रथयात्रेला अनुमती नाकारली, जी नंतर न्यायालयाने दिली. सहगल यांचे निमंत्रण हा जर कोणी आतंकवाद ठरवत असेल, तर हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधातील या घटना हा पुरोगामी आतंकवाद नाही का ?

साहित्य संमेलनच निरर्थक !

देशातील वाढत्या असहिष्णुतेमुळे मुसलमान बांधव अस्वस्थ आहेत, असे विधान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी नुकतेच केले होते. ‘मासिक पाळी असतांनाही महिलांना मंदिरातील गर्भागृहात प्रवेश द्यायला हवा’, अशी धार्मिक क्षेत्रात हस्तक्षेप करणारी अतीशहाणपणाची मागणी करणार्‍या विद्या बाळ यांचाही याच संमेलनात सन्मान करण्याचे नियोजन आहे. हे संमेलन एकूणच पुरोगाम्यांसाठी होते; पण कुठेतरी माशी शिंकली आणि सहगल यांना विरोध झाला. त्यामुळे हिंदुद्वेष्टे बिथरले. साहित्य संमेलनात देशातील राजकीय स्थितीविषयी अधिक आणि साहित्याविषयी अल्प बोलण्याची एक कुप्रथा आहे. साहित्याचा आणि शिक्षणाचा जवळचा संबंध आहे; पण हे तथाकथित साहित्यिक आणि निमंत्रित शिक्षणाच्या दुःस्थितीवर, ढासळत्या नैतिकतेवर, विद्यापिठे-शाळा यांमधूनच भावी पिढीला लागत असलेल्या व्यसनांवर कधीच बोलत नाहीत. अशी संमेलने भरवून ना साहित्याचा विकास होणार आहे ना भाषेचा ! साहित्य संमेलनांमुळे समाजाचे आजपर्यंत तरी काही चांगले झालेले नाही आणि यापुढेही होण्याची शक्यता नाही. जिथे सकारात्मकताच नाही, तेथे समाजाचे कल्याण तरी कसे होणार? ही स्थिती हिंदु राष्ट्रातच पालटू शकते !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now