बोरीवली (मुंबई) येथे ११ ते १३ जानेवारी या कालावधीत हिंदु आध्यात्मिक आणि सेवा मेळाव्याचे आयोजन

११५ संघटना सहभागी होणार

मुंबई, ८ जानेवारी (वार्ता.) – ‘ग्लोबल फाऊन्डेशन फॉर सिविलायजेशन हार्मोनी’ या संघटनेच्या वतीने बोरीवली येथे ११ ते १३ जानेवारी या कालावधीत हिंदु आध्यात्मिक आणि सेवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये आध्यात्मिक, सामाजिक क्षेत्रातील विविध ११५ संघटना सहभागी होणार आहेत, अशी माहिती हिंदु आध्यात्मिक आणि सेवा मेळावा, मुंबईच्या अध्यक्षा डॉ. अलका मांडके यांनी पत्रकार परिषदेत दिली. या मेळाव्याची माहिती देण्यासाठी ८ जानेवारी या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. या वेळी संस्थेचे सचिव सुशील जाजू, विश्‍व हिंदू परिषदेचे प्रवक्ता श्री. श्रीराज नायर उपस्थित होते.

१. ११ जानेवारी या दिवशी सकाळी १० वाजता या मेळाव्याचे उद्घाटन होणार असून या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून प.पू. श्री. कुलचंद्र सुरिश्‍वरजी महाराज स्वामी आणि चिन्मय मिशनचे प.पू. आचार्य बोधात्मानन्दजी उपस्थित रहाणार आहेत.

२. मेळाव्यामध्ये हिंदु धर्माचे विविध घटक असलेल्या बौद्ध, जैन, शीख आदी धर्माच्या संघटनाही सहभागी होणार आहेत. वन आणि वन्यजीव यांचे संरक्षण, पर्यावरणाचे रक्षण, निसर्गाचे रक्षण, कौटुंबिक आणि मानवी मूल्यांना महत्त्व देणे, स्त्री सन्मान, नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करणे या विषयांवरील विविध प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे.

३. मेळाव्याचा समारोप १३ जानेवारी या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता होणार असून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प.पू. आचार्य गोविंददेवगिरीजी महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. इंद्रेश सहभागी होणार आहेत.

डॉ. अलका मांडके म्हणाल्या, ‘‘ख्रिस्ती मिशनर्‍या विविध सामाजिक कार्य करतात’, असे वाटते; मात्र हिंदु धर्मातील अनेक आध्यात्मिक संस्थांचे सामाजिक कार्य पुष्कळ मोठे आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून ते समाजापर्यंत पोहोचेल.’’

 


Multi Language |Offline reading | PDF