झगा झुगारला, आता शिक्षण कधी ?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाने अखेर यंदाच्या वर्षीपासून पदवीदान सोहळ्यात ‘काळा झगा आणि टोपी’ हा ब्रिटीशकालीन पोशाख झुगारून कुडता, पायजमा, उपरणे आणि पगडी या ‘भारतीय’ पोशाखात पदवीप्रदानाचा कार्यक्रम पार पाडण्याचे निश्‍चित केले आहे. ७१ वर्षांपूर्वी इंग्रज भारतातून हाकलले गेले असले, तरी इंग्रज अन् पाश्‍चात्त्य यांचा म्हणजेच गुलामीचा पगडा आजही अनेक संदर्भाने दिसून येतो. पदवीप्रदान सोहळ्यात प्रचलित झालेला काळा झगा आणि टोपी हा त्यातीलच एक प्रकार ! खरे तर या झग्याला ना आकार असतो ना उकार ! त्यावर घातली जाणारी चौकोनी टोपीही त्याच पठडीतील ! गेल्या वर्षी उत्तराखंड सरकारने हा पाश्‍चात्त्य पोशाख नाकारून उत्तराखंडची संस्कृती दर्शवणारा पोशाख अशा कार्यक्रमांमध्ये वापरण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या १-२ वर्षांत काही नेत्यांनीही असा पोशाख पालटण्याच्या संदर्भाने वक्तव्य केले होते. गेल्या वर्षी केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याच्या वतीनेही देशस्तरावरच पालट लागू करण्याचा विचार केला होता. असा आसुरी आणि असात्त्विक पोशाख पालटण्याचा निर्णय स्तुत्य असला, तरी पोशाखाचे भारतियीकरण करण्याचा छोटासा निर्णय घ्यायला ७० वर्षे का लागली, याचाही विचार व्हायला हवा. या गतीने जर स्वदेशीकरणाचे कार्य होत असेल, तर अन्य अभारतीय सवयी सोडण्यासाठी किती कालावधी लागेल ?

झग्यापेक्षाही अंतरंग आणि टोपीपेक्षाही डोक्यात असणारे विचार महत्त्वाचे असतात. ते जोपर्यंत निर्मळ आणि देश अन् धर्म प्रेमाने भारलेले होत नाहीत, तोपर्यंत वरवरच्या पालटांनी फारसे काही साध्य होत नाही. जर घरंच पडके असेल, तर त्याला केवळ बाहेरून रंग देऊन काय उपयोग ? पाश्‍चात्त्य पोशाख पालटण्याचा निर्णय जरी चांगला असला, तरी त्याच जोडीला जुनाट शिक्षणपद्धत पालटून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारी शिक्षणपद्धत रुजवण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे. नाही तर, ‘पोशाख भारतीय आणि विचार पाश्‍चात्त्य’, असे तिरपांगडे व्यक्तीमत्त्व समोर येईल. स्वामी विवेकानंद जेव्हा विदेशामध्ये गेले होते, तेव्हा तेही त्यांच्या नेहमीच्या भगव्या वस्त्रांमध्ये गेले होते. विदेशात जायचे म्हणून त्यांनी कोट, पॅन्ट आणि टाय घातला नाही. उलट विदेशामध्ये त्यांच्या विचारांचा प्रभाव पडून असे अनुयायी निर्माण झाले की, जे केवळ वेशभूषेने नाही, तर आचार-विचाराने भारतियत्वाचे म्हणजेच सनातन हिंदु धर्माचे आचरण करणारे झाले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचेही जेव्हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून नाव काढून स्थानिक शाळेत घातले गेले, तेव्हा तेथील शिक्षकांचा धोतर आणि कुडता अशी वेशभूषा पाहून कोणत्याही प्रकारची लाज न बाळगता त्यांनी तशीच वेशभूषा करण्यास प्रारंभ केला होता. असे विवेकानंद आणि सुभाषचंद्र बोस पुन्हा निर्माण होण्यासाठी कारकून बनवणारी मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धत झुगारून विद्यार्थ्यांचे अन् पर्यायाने देशाचे भले करणारी गुरुकुल शिक्षणपद्धत कधी चालू होणार ?, हा खरा प्रश्‍न आहे.

– प्रा. (कु.) शलाका सहस्रबुद्धे, पुणे


Multi Language |Offline reading | PDF