सनातन पंचांगामुळे सनातन धर्माविषयी आस्था वाढून विश्‍वात सुख-शांती नांदेल ! – श्रीमत् जगद्गुरु रामानंदाचार्य श्री हंसदेवाचार्यजी महाराज

गुजराती भाषेतील ‘सनातन पंचांग २०१९’च्या ‘आयओएस अ‍ॅप’चे जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी श्री हंसदेवाचार्य महाराज यांच्या हस्ते प्रकाशन !

डावीकडून महंत श्री कृष्णदासजी महाराज, जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी हंसदेवाचार्यजी महाराज, स्वामी माधववाचार्य महाराज आणि सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

प्रयागराज (कुंभनगरी), ७ जानेवारी (वार्ता.) – सनातन पंचांगामुळे संपूर्ण विश्‍वात आपल्या महान संस्कृतीचा प्रचार-प्रसार होईल. आपली संस्कृती सर्वांपर्यंत पोहोचेल. त्याची माहिती सर्वांना होईल. सनातन धर्माविषयी आस्था निर्माण होऊन संपूर्ण विश्‍वात सुख-शांतीचे वातावरण निर्माण होईल, असे आशीर्वादपर वचन श्रीमत् जगद्गुरु रामानंदाचार्य श्री हंसदेवाचार्यजी महाराज यांनी गुजराती भाषेतील ‘सनातन पंचांग २०१९’ च्या ‘आयओएस् अ‍ॅप’चे (अ‍ॅपल प्रणाली) प्रकाशन करतांना कुंभमेळ्यात काढले.

प्रयागराज येथील काली प्रसाद इंटर कॉलेजच्या मैदानात वैष्णव आखाड्यांची पेशवाई शोभायात्रा निघण्यापूर्वी झालेल्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी श्री पंच दिगंबर अनी आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत श्री कृष्णदासजी महाराज, महंत श्री रामकिशोरदास महाराज, श्री पंचायती महानिर्वाणी अनी आखाड्याचे महंत धर्मदासजी महाराज, डाकोर इंदूर खालसाचे प्रमुख स्वामी माधववाचार्य महाराज तसेच अन्य आखाड्यांचे प्रमुख महंत आणि अनेक संत-महात्मे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश अन् बिहार राज्यांचे समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.

सनातन पंचांगामुळे पूर्ण विश्‍वात हिंदु संस्कृतीचा प्रसार होईल !

श्रीमत् जगद्गुरु रामानंदाचार्य श्री हंसदेवाचार्यजी महाराज पुढे म्हणाले, ‘‘तीर्थराज प्रयागमधील भव्य-दिव्य कुंभच्या निमित्ताने श्री पंच दिगंबर अनी आखाडा, श्री पंच महानिर्वाणी अनी आखाडा आणि श्री पंच निर्मोही अनी आखाडा, चतु:संप्रदाय आदींचे प्रमुख महंत, सर्व प्रमुख खालसे आणि सर्व साधू-महंत यांच्या उपस्थितीत ‘सनातन पंचांग’चे लोकार्पण या कुंभपर्वात होत आहे. त्यामुळे पूर्ण विश्‍वात एक संदेश जाईल. संपूर्ण विश्‍वात आपल्या महान संस्कृतीचा प्रचार प्रसार होईल. आपली संस्कृती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि त्याची माहिती मिळेल. युवा पिढीला सनातन धर्माविषयी माहिती मिळेल. सनातन पंचांगामुळे सनातन धर्माविषयी आस्था वाढेल. संपूर्ण विश्‍वात सुख-शांतीचे वातावरण निर्माण होईल. या शुभेच्छा देऊन मी सनातन पंचांगाचा शुभारंभ करत आहे.’’

सनातन पंचांग अ‍ॅपचा शुभारंभ झाल्यावर सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी श्रीमत् जगद्गुरु रामानंदाचार्य श्री हंसदेवाचार्यजी महाराज यांचा सन्मान केला.


Multi Language |Offline reading | PDF