दुटप्पी काँग्रेस !

मंदिर बांधण्याला आक्षेप घेणार्‍या एका वनाधिकार्‍याला कर्नाटकमधील भद्रावती भागातील वनक्षेत्रात काँग्रेसचे आमदार बी.के. संगमेश्‍वरा यांनी हात आणि पाय तोडून टाकण्याची धमकी दिली आहे. एक मंदिर उभारण्यासाठी काँग्रेसवाल्यांनी इतकी टोकाची भूमिका घेणे, ही गोष्ट हिंदूंनाही न पचणारी आहे. याला कारण आहे काँग्रेसचा हिंदुविरोधी इतिहास ! सध्या राममंदिर उभारण्याच्या सूत्रावरून वातावरण बरेच तापलेले आहे; मात्र याविषयी काँग्रेसने अजूनही ‘ब्र’ काढलेला नाही. याविषयी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना विचारले असता त्यांनी ‘हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे निवडणुकीतही हा विषय हाताळणार नाही’, असे वक्तव्य केले होते. अयोध्येत राममंदिर उभारले जाऊ नये, अशी काँग्रेसची छुपी भूमिका आहे आणि हे सर्वज्ञात आहे. राममंदिर उभारण्याच्या विरोधात जे पक्षकार सर्वोच्च न्यायालयात खटला लढत आहेत, त्यांचे वकीलपत्र काँग्रेसच्या नेत्यांनीच घेतले आहे. राममंदिराचा निकाल विलंबाने लागेल, त्यासाठी हे काँग्रेसी वकील प्रयत्नरत आहेत. थोडक्यात काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी आणि वरिष्ठ नेते राममंदिराला विरोध करतात, तर कर्नाटकसारख्या राज्यातील त्याच पक्षाचा एक नेता एका मंदिराच्या उभारणीला विरोध करणार्‍या वनाधिकार्‍याला धमकी देतो आणि थेट कायदा हातात घेण्याची भाषा करतो. वास्तविक अशी कायदा हातात घेण्याची भाषा चुकीचीच म्हणावी लागेल. तरीही ‘मंदिराच्या सूत्रावर एकाच पक्षाच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता का नाही ?’ , असा प्रश्‍न हिंदूंना पडला आहे. एका मंदिरासाठी काँग्रेसचा आमदार कायदा हातात घेण्याची भाषा करतो, तर राममंदिरासाठी काँग्रेसवाले कायद्याचे पालन करण्याची भाषा करतात !

हिंदुत्वाविषयी काँग्रेसवाले सोयीप्रमाणे त्यांच्या धोरणात पालट करतात, हे अलीकडच्या काही उदाहरणांवरून लक्षात आले आहे. कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीच्या काळातही काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे अनेक देवळांमध्ये जाऊन दर्शन घेत होते. कर्नाटकमध्ये येणार्‍या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला हिंदूंच्या मतांची आवश्यकता आहे. ‘आमचा पक्ष हिंदूंसोबत आहे’, हे काँग्रेसवाल्यांना दाखवायचे आहे. त्यामुळे ‘हिंदूंसाठी प्रसंगी कायदाही हातात घेऊ’, असे चित्र काँग्रेसवाले उभे करत आहेत. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे युतीचे सरकार आहे. सदर मंदिर उभारायचेच असते, तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून काँग्रेसच्या आमदाराने ते उभारूनही घेतले असते; मात्र अशा प्रकारे धमक्या देऊन ‘हिंदूंसाठी आमच्या भावना किती तीव्र आहेत’, हे दाखवण्यासाठी असले प्रकार घडत आहेत. असे असले, तरी काँग्रेसचे हिंदुविरोधी स्वरूप हिंदू जाणून आहेत. स्वातंत्र्यानंतर ७१ वर्षे काँग्रेसने सातत्याने हिंदुविरोधी भूमिका घेऊन हिंदूंवर अत्याचार केले. हिंदूंना काँग्रेसचे हे पाप ठाऊक आहे. त्यामुळे भविष्यात काँग्रेसवाल्यांच्या कुठल्याही नाटकाला हिंदू भुलणार नाहीत. येणार्‍या लोकसभा निवडणुकीत हिंदू हे काँग्रेसवाल्यांना त्यांची जागा दाखवून देतील, हे निश्‍चित !


Multi Language |Offline reading | PDF