पाकचा उद्दामपणा !

सध्या केरळमधील शबरीमला मंदिरामध्ये सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश दिल्याच्या सूत्रावरून राज्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. याची नोंद घेऊन ब्रिटन सरकारने भारतात पर्यटनासाठी आलेल्या त्याच्या नागरिकांना सतर्क केले आहे. केरळमध्ये पर्यटनासाठी जातांना काळजी घेण्याविषयी ब्रिटन सरकारने त्यांना काही सूचना केल्या आहेत. तसे पाहिले तर हे एक नित्याचे सूत्र आहे. बरीच राष्ट्रे अन्य राष्ट्रात काही आपत्कालीन घटना घडल्यास तेथे असलेल्या स्वतःच्या नागरिकांसाठी काही मार्गदर्शक सूचना लागू करते. इस्रायलसारखे राष्ट्र अशी मार्गदर्शक सूत्रे प्रसारित करतोच; पण त्याहून पुढे जाऊन एखाद्या अन्य राष्ट्रात अडचणीत सापडलेल्या स्वतःच्या नागरिकांच्या सुटकेसाठी कसोशीने प्रयत्नही करतो. या सूत्रांना उजाळा देण्याचे कारण म्हणजे पाकमधील भारतीय उच्चायुक्तालयातील भारतीय अधिकार्‍यांचा होत असलेला छळ ! मध्यंतरी तेथील भारतीय अधिकार्‍यांच्या निवासस्थानातील विद्युत् पुरवठा खंडित करण्यात आला, तसेच इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली. काही अधिकार्‍यांची तर भर रस्त्यात चौकशी करण्यात आली. स्वतःच्या देशात कार्यरत असलेल्या अन्य देशांतील उच्चायुक्तालयातील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांना कशी वागणूक द्यायची, याविषयी आंतरराष्ट्रीय स्तरावर काही निकष पाळले जातात; मात्र पाकला त्याविषयी काहीच देणे-घेणे नाही. भारताने नेहमीप्रमाणे पाकला ‘कडक’ शब्दांत यांविषयी फटकारले आहे. ‘या फटकारण्याचा पाकवर काहीही परिणाम होणार नाही’, हे वेगळे सांगायला नको. काहीही करून भारताला कसा त्रास द्यायचा, याचेच डावपेच पाक आखत असतो आणि भारताच्या दुर्दैवाने तो त्यात यशस्वीही होतो. ‘इस्रायलप्रमाणे भारतीय शासनकर्ते शत्रूराष्ट्रांच्या विरोधात बाणेदारपणा का दाखवत नाहीत ?’, असा प्रश्‍न भारतियांना सतत पडतो. भारतीय शासनकर्त्यांमध्ये जनतेप्रती संवेदनशीलता नसल्यामुळेच असे होत आहे, असे खेदाने म्हणावे लागेल.

भारतात सत्तांतर होते. वेगवेगळे पक्ष भारताचा कारभार हाकतात; मात्र पाकच्या संदर्भातील त्यांच्या भूमिकेत काहीच पालट होत नाही. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे एक परराष्ट्र धोरण ठरवण्यात आले होते. त्यात एक साचेबद्धपणा होता. स्वातंत्र्यानंतर सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी गांधीगिरीची अवलंब करत पाकच्या कारवाया खपवून घेतल्या. त्याचे वाईट परिणाम आता भारताला भोगावे लागत आहेत. ‘भाजप सत्तेवर आल्यावर तरी तो ही साचेबद्धता मोडून काढत पाकच्या विरोधात कठोर धोरण अवलंबेल’, असे भारतियांना वाटले होते; मात्र परराष्ट्रनीतीमध्ये फारसा पालट झाला नाही. तसे म्हणायला भाजप सरकारने पाकच्या विरोधात ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला; मात्र एका ‘सर्जिकल स्ट्राईक’ने सुधारला, तर तो पाक कसला ? हे सर्व लक्षात घेऊन भाजप सरकार आक्रमक धोरण का अवलंबत नाही ? भाजप सरकारला कणखर परराष्ट्र धोरण अवलंबण्याची बुद्धी होऊन ते काही कृती करील, तो सुदिन !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now