५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली गोवा येथील कु. ईश्‍वरी प्रदीप जोशी (वय ७ वर्षे) !

कु. ईश्‍वरी जोशी

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. ईश्‍वरी जोशी ही एक आहे !

(डिसेंबर २०१४ मध्ये कु. ईश्‍वरीची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती. – संकलक)

मार्गशीर्ष कृष्ण पक्ष चतुर्दशी (४.१.२०१९) या दिवशी पणजी (गोवा) येथील कु. ईश्‍वरी प्रदीप जोशी हिचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त ४ जानेवारी २०१९ या दिवशीच्या अंकात तिची काही गुणवैशिष्ट्ये आपण पाहिली. आज अन्य गुणवैशिष्ट्ये पाहू.

१. आयुर्वेदीय उपचार मनापासून करणे

१ अ. आयुर्वेदीय उपचार चालू केल्यावर केवळ ३ दिवसांत प्रकृती बरी होणे : मागील वर्षी ईश्‍वरी बर्‍याचदा रुग्णाईत होती. प्रारंभी आम्ही पणजीतील बालरोग तज्ञांकडून तिच्यावर उपचार करवून घेतले, तरीही १ मासात विशेष फरक पडला नाही. त्यानंतर आम्ही रामनाथी आश्रमात पू. वैद्य विनय भावेकाका यांच्या मार्गदर्शनानुसार आयुर्वेदीय उपचार चालू केले. त्या वेळी तिची प्रकृती केवळ ३ दिवसांत बरी झाली.

१ आ. पथ्याचे सहजपणे पालन करणे : त्यानंतर गेल्या दीड वर्षात तिने केवळ आयुर्वेदीय उपचारच घेतले आहेत. त्यात सांगितलेले पथ्यही ती सहजपणे स्वीकारते आणि सवलत न घेता पाळते. तिला साधे दूध पुष्कळ आवडते; परंतु तिला पडसे झाल्यावर ती स्वतःच मला हळद, आले, गवती चहा इत्यादी घालून सिद्ध केलेले दूध देण्यास सांगते.

मी आजवर तिला कधीही बोर्नव्हिटा, पीडियाशुअर इत्यादी दिलेले नाही. कधी प्रकृतीनुरूप, ऋतूनुसार मी तिला शतावरीची पूड, वेलचीची पूड इत्यादी दुधात घालून द्यायचे.

१ इ. आयुर्वेदीय उपचारांतर्गत आवडणारे पदार्थ बंद केल्यावरही ते कटकट न करता स्वीकारणे : या उन्हाळ्यापासून एका वैद्यांच्या समादेशानुसार आयुर्वेदीय उपचारांतर्गत तिला आवडणारे दूध, बिस्कीट इत्यादी कायमचे बंद करण्यात आले. हे पथ्य ती पाळणार नाही, असे आम्हाला वाटले होते; परंतु २ – ३ दिवसांत तिने फारशी कटकट न करता ते स्वीकारले. या गोष्टीला आता ४ मास झाले आहेत. तिने पुन्हा कधी ते पदार्थ खाण्यासाठी हट्ट केला नाही.

२. सात्त्विक गोष्टींची आवड

तिला सात्त्विक पोशाख, नक्षी आणि अलंकार यांची आवड आहे. मी आणि तिच्या बाबांनी सणाच्या दिवशी बाहेर जातांना सात्त्विक पोशाखच परिधान करावा, यावर तिचा कटाक्ष असतो.

३. कु. ईश्‍वरी सध्या करत असलेली साधना

ईश्‍वरी प्रतिदिन सायंकाळी शुभं करोती, रामरक्षा, मारुतिस्तोत्र, गणपतिस्तोत्र आणि चंडीकवच म्हणते. ती कधी कधी अर्धा घंटा श्रीकृष्णाचा नामजप करते. तिला आठवण करून दिल्यावर ती हातांनी अन् उदबत्तीने आवरण काढते, तसेच मीठ-पाण्याचे उपाय करते.

४. सेवा करायला आवडणे

माझ्या समवेत ग्रंथप्रदर्शनावर हस्तपत्रकांचे वितरण करणे, सात्त्विक उत्पादनांची माहिती सांगणे, आश्रमात आल्यावर धान्य निवडणे, या सेवा ती करते. तिने उत्तरदायी साधकांना आठवड्यातून तीन घंटे सेवा करणार असल्याचे सांगितले आहे.

५. दैवी सुगंधाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

५ अ. कु. ईश्‍वरीच्या हाताला सुगंध येत असल्याचे आणि तो बराच वेळ टिकल्याचे आश्रमातील साधिकेने सांगणे : एकदा आम्ही रामनाथी आश्रमात गेलो असतांना कु. वैष्णवी वेसणेकर आणि इतर साधिका झोपाळ्यावर बसल्या होत्या. कु. ईश्‍वरीही (त्या वेळचे वय अंदाजेे ४ वर्षे) त्यांच्या समवेत झोपाळ्यावर बसली असता वैष्णवीने बोलतांना तिचा हात हातात घेतला. काही वेळाने ती मला म्हणाली, ताई, ईश्‍वरीच्या हाताला किती सुगंध आहे ! तिचा हात हातात घेतल्यावर माझ्याही हाताला सुगंध येत आहे. तो सुगंध बराच वेळ माझ्या हाताला येत होता, असे ती नंतर म्हणाली.

५ आ. कु. ईश्‍वरीला कुशीत घेऊन झोपवतांना तिचे डोके आणि केस यांतून कधीही न अनुभवलेला वेगळाच सुगंध येणे : यावर्षी गुरुकृपेने मला तिच्यातील दैवी सुगंधाला अनुभवता आले. एकदा रात्री तिला कुशीत घेऊन झोपवतांना मला तिचे डोके आणि केस यांतून कधीही न अनुभवलेला वेगळाच सुगंध आला. त्या सुगंधाचे केश-तेल, शिकेकाई किंवा शाम्पू आमच्याकडे नव्हता. मी बराच वेळ तो दिव्य सुगंध अनुभवत होते. देवाने हे अनुभवायला दिल्याबद्दल मी त्याच्या चरणी कृतज्ञ आहे.

५ इ. शाळेतून किंवा खेळून आल्यावर ईश्‍वरीचे कपडे बाह्यतः कितीही मळलेले आणि घामट झाले असले, तरीही त्यांना दुर्गंध येत नाही, उलट एक मंद सुगंध येतो.

६. स्वभावदोष

हट्टीपणा, स्वतःच्या मनाप्रमाणे करणे, वाईट वाटणे आणि प्रतिक्रिया देणे.

देवा, या गुणी बाळाचा सर्वतोपरी सांभाळ तूच केला आहेस, नव्हे तिच्या माध्यमातून तूच माझाही सांभाळ करत आहेस. या गुणी बाळाला तूच तुला अपेक्षित असे घडवत आहेस. कोटी कोटी कृतज्ञता गुरुमाऊली !

– सौ. प्रांजली प्रदीप जोशी (आई), पणजी, गोवा. (१६.९.२०१८)         ॐ

तळमळीने साधनेचे प्रयत्न करणारी पणजी (गोवा) येथील कु. ईश्‍वरी प्रदीप जोशी (वय ७ वर्षे) !

कु. ईश्‍वरी जोशी काही दिवसांसाठी रामनाथी आश्रमात रहाण्यासाठी आली होती. तेव्हा तिची आणि माझी ओळख नसतांनाही ती सहजतेने माझ्याकडे आली आणि प्रतिदिन मला भेटत होती. तेव्हा ईश्‍वरी इतर मुलांपेक्षा वेगळीच असल्याचे मला जाणवले. तिला पाहूनच तिच्याशी बोलावेसे वाटते. तिच्यामध्ये पुष्कळ प्रेमभाव आहे. तिच्याशी बोलतांना भावजागृती होते. एकूणच मला तिच्यामध्ये पुष्कळ गुण जाणवले.

१. शांत

ईश्‍वरीकडे पाहून शांतीची अनुभूती येते. ती स्वतःही पुष्कळ शांत असल्याचे दिसून येते. तिच्याकडे पाहिल्यावर तिच्याकडे पहातच रहावे, असे वाटते.

२. इतरांशी मिळून-मिसळून वागणे

ती सर्वांशी सहजतेने मिसळते. मी आजपर्यंत अनेक मुलांना भेटले आहे किंवा त्यांच्याशी बोलले आहे; पण ती मुले सर्वांमध्ये एवढ्या सहजतेने मिसळत नाहीत. मी तिला प्रथमच भेटले आणि तेव्हापासूनच आम्हा दोघींची मैत्री झाली.

३. चिकाटी

एके दिवशी तिने तिच्या संपूर्ण दिवसभराचे नियोजन बनवले आणि ती ते मला दाखवायला घेऊन आली; परंतु मी सेवेमध्ये व्यस्त असल्यामुळे ते पाहू शकले नाही. ती दुसर्‍या दिवशी पुन्हा ते घेऊन माझ्याकडे आली.

४. साधनेची तळमळ

तिने मला विचारले तू कृष्णाशी कशी बोलतेेस ? मलापण सांग ना ! मलाही कृष्णाशी बोलायचे आहे. मी तिला एखादा भावजागृतीचा प्रयत्न सांगत असे. तेव्हा ती तो प्रयत्न करायची. दुसर्‍या दिवशी ती माझ्याकडे आली की, मी तिला भावजागृतीचे प्रयत्न केलेस का ?, असे विचारत असे. तेव्हा ती मला सांगत असे, हो, मी प्रयत्न केले. त्यानंतर मी तिला विचारले, तू अजून काय काय प्रयत्न केलेस ? तेव्हा तिने मला सांगितले, मी वस्तूंशीसुद्धा बोलले. मी सर्व साधकांमध्ये कृष्णाला पाहिले आणि मस्ती केली नाही.

५. आज्ञापालन करणे

तिला आपण एकदा जे काही सांगतो, ते पुन्हा सांगावे लागत नाही. तिच्यामध्ये आज्ञापालन करण्याचा गुण पुष्कळ चांगला आहे.

६. आढावा देणे

ती मला तिच्या सर्व प्रयत्नांचा आढावा देते आणि पुढे आणखी कसे प्रयत्न करायला पाहिजेत ?, असे विचारते.

७. इतरांना साधनेत साहाय्य करणे

मी तिला विचारले, तू कसे प्रयत्न करतेस ? तुझ्या मैत्रिणींनी कसे प्रयत्न करायला पाहिजेत ?, हे तू त्यांना सांगितलेस का ? त्यावर ती म्हणाली, हो, मी त्यांनाही सांगते.

– कु. मीरा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.११.२०१८)                                ॐ


Multi Language |Offline reading | PDF