साधकांवर पितृवत प्रेम करणारे आणि त्यांच्या साधनेचे दायित्व घेऊन त्यांच्याकडून साधना करवून घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले ! – पू. (सौ.) शिल्पा राजीव कुडतरकर

३ जानेवारी २०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात चालू झालेल्या ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या शिबिराच्या निमित्ताने…

पू .(सौ.) शिल्पा कुडतरकर

१. साधनेच्या आरंभी गांभीर्याने साधना करत नसूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी भरभरून प्रेम आणि प्रोत्साहन देणे अन् अडचणींवर उपाययोजना सांगण्यासाठी बराच वेळ देणे

‘वर्ष १९९५ मध्ये मी साधनेला आरंभ केला. त्या काळात मला काही अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे मी गांभीर्याने साधना करत नव्हते, तरीही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला भरभरून प्रेम आणि प्रोत्साहन दिले. त्यांनी मला सांगितले होते, ‘‘जेव्हा जेव्हा तुझी मनःस्थिती चांगली नसेल किंवा तुला ‘माझ्याशी बोलावे’, असे वाटत असेल, तेव्हा तेव्हा तू मला दूरभाष करू शकतेस.’’ तसेच मुंबई येथील सेवाकेंद्रातील साधकांनाही त्यांनी ‘शिल्पाचा दूरभाष आल्यावर लगेच मला सांगावे’, असे सांगून ठेवले होते. मी काही साधना करत नसले, तरीही माझ्या सर्व अडचणी जाणून घेण्यास अन् त्यांवरील उपाययोजना सांगण्यास परात्पर गुरु डॉक्टर त्यांचा बराच वेळ मला देत होते.

२. ‘साधकांचा वेळ वाया जाऊ नये’, याची काळजी घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

एकदा आम्ही काही साधक परात्पर गुरु डॉक्टरांच्या समवेत मुंबई सेवाकेंद्रात जात होतो. वाटेत चालक साधकाला औषधे हवी असल्याने ती घेण्यासाठी तो जवळच्या औषधालयात गेला. त्याला हवी असलेली औषधे मिळायला आणखी वेळ लागणार असल्याचे समजल्यावर ‘गाडीतील इतर साधकांचा वेळ वाया जाऊ नये’, यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतः गाडी चालवली अन् आम्हाला सेवाकेंद्रापर्यंत आणले.

३. काही लोकांनी गाडी अडवून चालक-साधकाला मारण्यासाठी येणे आणि साधकाला वाचवण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकाला दोन्ही हातांनी कवेत धरणे

एकदा परात्पर गुरु डॉक्टरांच्या समवेत आम्ही काही साधक मुंबईहून गोव्याला येत होतो. (‘वर्ष १९८७ ते १९९४ या कालावधीत परात्पर गुरु डॉक्टर प्रवचन वा अभ्यासवर्ग घेण्यासाठी मुंबईहून गोव्याला चारचाकीने येत असत.’ – संकलक) वाटेत काही लोकांनी आमची गाडी अडवली आणि ते चालक-साधक श्री. दिनेश शिंदे यांना मारण्यासाठी आले. त्या वेळी क्षणार्धात परात्पर गुरु डॉक्टर पुढे झुकले अन् दिनेशदादांना वाचवण्यासाठी त्यांनी दादांना दोन्ही हातांनी कवेत धरले.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांचे स्वागत करण्यासाठी ३ मजले खाली उतरून येणे आणि साधकांचे सामान तिसर्‍या मजल्यावर असलेल्या सेवाकेंद्रापर्यंत उचलून नेणे

फेब्रुवारी १९९५ मध्ये आम्ही काही साधक प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यासाठी इंदूरला जाणार होतो. त्यासाठी आम्ही प्रथम मुंबईला जाऊन एक रात्र मुंबई सेवाकेंद्रात राहून दुसर्‍या दिवशी आगगाडीने इंदूरला जाणार होतो. आम्ही मुंबई येथे रात्री विलंबाने पोहोचलो. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर आमचे स्वागत करण्यासाठी ३ मजले खाली उतरून आले होते. त्यांनी स्वतः आमचे सामान तिसर्‍या मजल्यावर असलेल्या त्यांच्या सदनिकेपर्यंत उचलून नेले.

५. कांदळी येथे प.पू. भक्तराज महाराज यांच्या अंत्यविधीच्या वेळी गर्दीत प.पू. पत्की महाराज यांच्या चपला न सापडल्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःच्या चपला त्यांना देणे आणि स्वतः नाशिकपर्यंत अनवाणी जाणे

नोव्हेंबर १९९५ मध्ये प.पू. बाबांनी (प.पू. भक्तराज महाराज यांनी) देह ठेवला. तेव्हा अंत्यविधीसाठी त्यांना पुण्याजवळील कांदळी या ठिकाणी असलेल्या त्यांच्या आश्रमात आणले होते. आम्हीही तेथे गेलो होतो. तेथे प.पू. बाबांचे भक्त आणि अनेक संत आले होते. प.पू. पत्की महाराज परत जायला निघाले, तेव्हा त्या गर्दीमध्ये त्यांच्या चपला सापडत नव्हत्या. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना स्वतःच्या चपला दिल्या आणि ते नाशिकपर्यंत गाडीने अनवाणी गेले. वाटेत चहा-पाण्यासाठी आम्हाला एका ढाब्याजवळ थांबावे लागले. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर अनवाणीच चालत गेले.

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली प्रीती !

अ. माझ्या विवाहापूर्वी काही दिवस मी सेवाकेंद्रात रहायला गेले होते. तेव्हा पहिल्याच रात्री परात्पर गुरु डॉक्टरांनी मला झोपण्याची जागा दाखवून माझे अंथरूण आणून दिले.

आ. वर्ष १९९६ मध्ये माझा विवाह झाला. त्यानंतर मी माझ्या पतीसमवेत अमेरिकेला जाणार होते. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर अमेरिकेतील माझ्या घरासाठी लागणार्‍या आणि त्या काळात अमेरिकेत न मिळणार्‍या काही वस्तूंची, उदा. ‘प्रेशर कूकर’, गाळण्या, पोळपाट-लाटणे इत्यादींची सूची बनवण्यासाठी माझ्या समवेत बसले. ‘माझ्या अमेरिकेतील घराला भारतीय शोभा यावी’, यासाठी ‘इंटिरियर डेकोरेटर’ असणार्‍या एका साधकाला भारतीय हस्तकलेच्या सजावटीच्या वस्तू आणायला सांगितले. माझे स्वतःचे आई-वडील किंवा अन्य कुटुंबीय यांनीसुद्धा केले नाही, ते परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्यासाठी केले.

इ. माझे सासरचे लोक साधना करत नाहीत, तरीही ते जेव्हा जेव्हा आश्रमात येत असत, तेव्हा तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर त्यांना भेटण्यासाठी वेळ देत असत अन् त्यांच्याशी प्रेमाने बोलत असत.

७. ‘साधिकेला संतांचा आशीर्वाद मिळावा’, यासाठीची परात्पर गुरु डॉ. आठवले यांची तळमळ !

अ. मी अमेरिकेहून गोव्याला आल्यावर गोव्यात एखादे संत आलेले असतांना परात्पर गुरु डॉक्टर त्यांच्याशी आवर्जून माझी ओळख करून देत असत, तसेच त्या संतांना विदेशी चलनात अर्पण देण्यास मला सुचवत असत. त्यानुसार मी केल्यानंतर ते माझे कौतुक करत असत. यावरून ‘मला त्या संतांचा आशीर्वाद मिळावा’, यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांची किती तळमळ होती !’, हे माझ्या लक्षात आले.

आ. आम्ही साधक अमेरिकेहून जेव्हा सनातन संस्थेच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात येत असू, तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरच आम्हाला इतर साधक आणि संत यांना देण्यासाठी चॉकलेट्स देत असत. ‘संत आणि साधक यांना ती चॉकलेट्स मिळाली ना ?’, हे ते जातीने पहात असत. त्यानंतर ते संतांना आणि इतरांना सांगत असत, ‘‘तुमचे कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी विदेशी साधकांनी तुमच्यासाठी चॉकलेट्स आणली आहेत.’

८. पतीशी पुष्कळ वाद घालणे, ते पराकोटीला जाणे, त्याच कालावधीत रामनाथी आश्रमात आल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हा पती-पत्नींना बोलावून प्रेमाने समजावणे, तेव्हापासून त्यांच्यातील अडचणी अन् वादविवाद संपून त्यांना साधना करता येणे आणि त्यांची आध्यात्मिक प्रगतीही होणे

एकदा मला होणारा आध्यात्मिक त्रास वाढला होता, तसेच माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांमुळे मी माझ्या पतीशी पुष्कळ वाद घालत असे. एकदा ते पराकोटीला गेले. त्याच कालावधीत माझे पती श्री. राजीव रामनाथी आश्रमात आले होते. एकदा मार्गिकेतून आम्ही दोघे जात असतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला पाहिले अन् त्यांनी आम्हाला येणार्‍या अडचणी विचारल्या. त्यानंतर त्यांनी आम्हाला पुष्कळ वेळ देऊन आम्हाला प्रेमाने समजावले आणि ‘दोघेही आपापल्या जागी कसे योग्य आहेत ?’, ते सांगितले. त्या वर्षापासून आमच्या अडचणी अन् वादविवाद संपले. तेव्हापासून आम्हा दोघांनाही साधना करता आली अन् परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने साधनेत आमची प्रगतीही होत आहे. (‘२३.१.२०१७ या दिवशी श्री. राजीव ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले आहेत आणि ३.१.२०१९ या दिवशी सौ. शिल्पा संतपदावर विराजमान झाल्या आहेत.’ – संकलक)

९. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आणि न्यू जर्सीमध्ये चालू असलेल्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्याला ते देत असलेला पाठिंबा, यांमुळे पतीची आध्यात्मिक प्रगती होत असणे

माझे पती श्री. राजीव रामनाथी आश्रमात आल्यावर प्रत्येक वेळी परात्पर गुरु डॉक्टर त्यांना आवर्जून भेटतात अन् पुष्कळ प्रेम देतात. श्री. राजीव ‘स्पिरिच्युअल सायन्स रीसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’च्या मार्गदर्शनानुसार सक्रीय साधना करत नाहीत. केवळ परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा आणि न्यू जर्सीमध्ये चालू असलेल्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्याला श्री. राजीव दर्शवत असलेला पाठिंबा, यांमुळे त्यांची आध्यात्मिक प्रगती होत आहे.

१०. प्रत्येक साधकाचा मार्ग, कल किंवा प्रवृत्ती आणि क्षमता यांनुसार त्याला मार्गदर्शन करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात श्री. राजीव (पती) यांनी त्यांना विचारलेले प्रश्‍न आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांची दिलेली उत्तरे पुढे दिली आहेत.

श्री. राजीव : मी एके ठिकाणी बसून नामजप करू शकत नाही. त्यासाठी काय करू ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : तुमची साधना चालू आहे. नामजप करून जी स्थिती प्राप्त होते, ती तुम्ही प्राप्त कराल. काळजी करू नका आणि बळजोरीने नामजप करायला बसण्याची आवश्यकता नाही.

श्री. राजीव : कुणीही माझ्याकडे साहाय्य मागितल्यास मला त्यांना नकार देता येत नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले : प्रारंभी ‘सर्वांना साहाय्य करणे’, ही चांगली गोष्ट आहे; मात्र नंतर आपण अशाच व्यक्तींना साहाय्य करावे, जे त्यास पात्र आहेत.

यावरून ‘परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येकाचा मार्ग, कल किंवा प्रवृत्ती आणि क्षमता यांनुसार त्याला मार्गदर्शन करतात’, हे मला शिकायला मिळाले.’

– सौ. शिल्पा कुडतरकर, न्यू जर्सी, अमेरिका.


Multi Language |Offline reading | PDF