उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची पुणे येथील कु. अमेया आंबोकर (वय ११ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. अमेया आंबोकर ही एक आहे !

कु. अमेया आंबोकर

१. जन्मापूर्वी

‘मी गर्भारपणात नामजप करायचे.’ – सौ. सुरेखा आंबोकर (आई), पुणे

२. जन्म ते ३ वर्षे

२ अ. शांत आणि समंजस :

‘कु. अमेयाचा जन्म झाल्यावर काही घंटे तिला काचेच्या पेटीत (इन्क्युबेटरमध्ये) ठेवले होते. तेव्हापासूनच तिचा तोंडवळा शांत वाटतो. जन्मापासूनच ती फारच अल्प रडायची. लहानपणीच्या इंजेक्शन आवश्यक लसी दिल्यावर ती कधीही रडली नाही. प्रसुतीसाठी अमेयाची आई अमरावतीला आली होती आणि त्या वेळी अमेयाच्या बाबांची नोकरी आसाम राज्यात होती. ती तीन मासांची असतांना आगगाडीने सलग तीन दिवसांचा प्रवास करत तिला आसाम येेथे नेले. प्रवासात तिने कोणताही त्रास दिला नाही.

३. वय ३ ते ८ वर्षे

३ अ. सात्त्विकतेची आवड

१. तिला बालपणापासूनच केस वाढवणे (आता तिचे केस कमरेपेक्षा खाली आहेत.), वेणी घालणे, कुंकू लावणे, या गोष्टींची आवड आहे.

२. तिला परकर-पोलके घालायला आवडते.

३. तिला केक कापायला आवडत नाही. इतरांनी केक दिला, तरीही तिला तो खाण्याचा मोह कधीच होत नाही. ती केक परत देऊन टाकते.

४. तिला कृष्णाचे चित्र, पुस्तके, कथा आणि मालिका आवडतात.

५. तिला नवरात्रात देवीच्या देवळात जाण्याची आवड आहे.

४. वय ९ ते ११ वर्षे

४ अ. प्रेमभाव : अमेया लहान मुलांना प्रेमाने खेळवते. माझी मुलगी गिरिजा तिच्यापेक्षा लहान आहे. अमेया तिला अगदी प्रेमाने तिच्या वस्तू देते. एकदा तिच्या घरी गेल्यावर भरतनाट्यमचा पोशाख घालून गिरिजाचे छायाचित्र काढायचे होते. त्या वेळी ‘शृंगाराचे (मेक-अपचे) साहित्य तिच्या त्वचेला लावू नकोस. ती लहान आहे. तिची त्वचा खराब होईल’, असे अमेयाने तिच्या आईला सांगितले. गिरिजाची सगळी सिद्धता तिने स्वतः हळूवारपणे केली. सगळ्याच लहान मुलांना अमेया पुष्कळ आवडते. ती रहात असलेल्या संकुलातील मुले तिला हाक मारून खेळायला बोलावतात.

४ आ. प्राण्यांवर प्रेम करणे : अमेयाला मांजर, कुत्रा, पक्षी आणि मासे यांच्याविषयी प्रेम वाटते. तिच्या घरी काचेच्या पेटीत मासे आहेत. ती त्यांना जेवण देणे, त्यांचे पाणी पालटणे, या गोष्टी वेळच्या वेळी करते. ते मासे अगदी लहान असूनही अमेया फिशपॉटच्या जवळून गेल्यावर जोरजोरात हालचाल करतात. ती शाळेतून घरी आल्यावर ते मासे आनंदाने जणू नाचतात, एवढी हालचाल करतात. ही हालचाल ते मासे घरातील इतर सदस्य तेथून गेल्यावर करत नाहीत.

४ इ. विविध कलागुणांची आवड

१. अमेयाला २ वर्षांची असल्यापासून नृत्याची आवड आहे. ती इतरांचे बघून-बघून उत्तम नृत्य करत असे. ती वयाच्या ७ व्या वर्षापासून भरतनाट्यम् शिकत आहे. ती शास्त्रीय संगीतही शिकत आहे. तिच्या तोंडवळ्यावर भावमुद्रा असतात. ‘तिला नृत्य आणि संगीत या दोन्हींची ईश्‍वरी देणगी लाभली आहे’, असे तिचे शिक्षक नेहमीच म्हणतात.

२. ती चित्रेसुद्धा उत्तम काढते. तिची चित्रे बोलकी वाटतात.

३. ती कानातले, गळ्यातले इत्यादी प्रकारच्या कलाकृतीही कागदाने सुंदर बनवते.

४ ई. या सर्व कलांच्या समवेत ती अभ्यासामध्येही वर्गात नेहमी पुढे असते.

५. आलेली अनुभूती

तिने नवरात्रीमध्ये देवळात दुर्गादेवी दिसल्याचे आणि त्यानंतर देवी चित्रातून बाहेर आली असल्याचे तिथे असलेल्या स्त्रियांना सांगणे : नवरात्रीमध्ये देवळात दुर्गादेवी दिसल्याचे ती सांगते. ती देवळात तिच्या मैत्रिणींच्या समवेत बसलेली होती आणि अकस्मात धावत बाहेर आली. त्या वेळी ‘चित्रातून देवी बाहेर आली आहे’, असे तेथे उभ्या असलेल्या स्त्रियांना ती सांगत होती; परंतु  तिचे कुणीही ऐकले नाही. त्या वेळी तिचे वय ८ वर्षे होते.

६. स्वभावदोष

मनमोकळेपणाने न बोलणे आणि आत्मविश्‍वासाचा अभाव’

– सौ. अनुभूती टवलारे (कु. अमेयाची मावशी), अमरावती

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/०6MJck मार्गिकेवरही पाहू शकता.


Multi Language |Offline reading | PDF