मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी सापळे लावणार्‍या ५ आरोपींना अटक

देशात वन्यप्राण्यांच्या हत्यांच्या संदर्भात तत्परतेने कारवाई होते मात्र मनुष्याचे पालनपोषण करणार्‍या गायींच्या हत्या करणार्‍यांवर जुजबी कारवाई होते, हे दुर्दैव !

मुंबई – गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये (फिल्मसिटीमध्ये) ३१ डिसेंबर या दिवशी बिबट्या आणि सांबर हे वन्यप्राणी मृतावस्थेत आढळल्याच्या प्रकरणी वन विभागाने चित्रनगरी, तसेच आरे वसाहतीतील ५ जणांना अटक केली आहे. त्यांनी सापळे लावल्याचे मान्य केले आहे. त्यांना वन विभागाच्या कोठडीत ठेवण्याचा न्यायालयाने आदेश दिला आहे. संरक्षण अधिनियम आणि जैव विविधता अधिनियम यानुसार त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल. २ जानेवारी, ३ जानेवारी या दिवशी केलेल्या तपासात चित्रनगरी येथून एकूण ३० सापळे कह्यात घेण्यात आले.

या भागामध्ये कचर्‍याचा प्रादुर्भाव हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. सेटवरील कचर्‍याची विल्हेवाट न लावल्याने येथे कचरा खाण्यासाठी कुत्रे, डुक्कर यांसारखे प्राणी येतात. त्यांना खाण्यासाठी वन्यप्राणी येतात. हे लक्षात घेऊनच सेटच्या जवळच्या परिसरात सापळे लावण्यात आले होते. येथे रहाणार्‍या आदिवासींनी या परिस्थितीचा लाभ उचलला असल्याची खंत या मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या एका अधिकार्‍याने व्यक्त केली. सर्वसाधारणपणे ससे, डुक्कर, हरीण यांसारखे प्राणी त्यांचे मांस खाण्यासाठी मारले जातात. हे मांस विकण्यात येते, असेही सांगण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF