लवकरच गोव्यातील प्रत्येक समुद्रकिनार्‍यावर शौचालय, कपडे पालटण्यासाठी खोली आणि लॉकरची सुविधा ! – आजगावकर, पर्यटनमंत्री

गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असूनही आणि लाखोंच्या संख्येने पर्यटक समुद्रकिनार्‍यांना भेटी देत असतांना आतापर्यंत समुद्रकिनार्‍यांवर शौचालयासारखी मूलभूत सुविधा उपलब्ध करू न शकणारी सर्वपक्षीय सरकारे !

पणजी, ५ जानेवारी (वार्ता.) – लवकरच गोव्यातील प्रत्येक समुद्रकिनार्‍यावर शौचालय, कपडे पालटण्यासाठी खोली आणि लॉकरची सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी दिली आहे.

पर्यटनमंत्री आजगावकर पुढे म्हणाले, गोव्याचा पर्यटनस्थळ या दृष्टीने दर्जा उंचावण्यासाठी समुद्रकिनारपट्टीचा विकास झाला पाहिजे. केंद्राने यासाठी ३० कोटी रुपये संमत केले आहेत. हा प्रकल्प गोवा पर्यटन विकास महामंडळ राबवणार आहे. सद्यःस्थितीत समुद्रकिनार्‍यावर शौचालय करण्यासाठी जागा नाही. गोव्याला दर्जात्मक पर्यटकांची आवश्यकता आहे. गोव्यात समुद्रकिनार्‍यावर मद्याच्या बाटल्या फोडणारे, अमली पदार्थ व्यवसायात गुंतणारे आणि उघड्यावर जेवण करणारे पर्यटन नको. गोव्याची संस्कृती आपणास टिकवायची आहे. गोव्याच्या संस्कृतीला डावलून पर्यटनाचा विकास करू नये. (संस्कृतीप्रेमी हिंदूंचा विरोध झुगारून पर्यटनमंत्र्यांनी पेडणेसारख्या सांस्कृतिक शहरात पोर्तुगिजांचा विद्रूप कार्निव्हाल कार्यक्रम आयोजित करून कोणती गोमंतकीय संस्कृती जोपासली ? जनतेने असे प्रश्‍न विचारले तर नवल नाही. – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF