शासन ऐतिहासिक महत्त्व असलेल्या आग्वाद येथील केंद्रीय कारागृहाचे पर्यटनस्थळात रूपांतर करणार

या ठिकाणी गोवा मुक्ती लढ्याविषयी माहिती देणार

गोवा मुक्तीलढ्याची आणि कुंकळ्ळीतील उठावाची माहिती सरकार अजूनही शैक्षणिक अभ्यासक्रमात अंतर्भूत करू शकलेले नाही. पर्यटकांना गोवा मुक्तीलढ्याची माहिती देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणारे सरकार गोव्यातील विद्यार्थ्यांना या इतिहासापासून वंचित का ठेवत आहे ?

पणजी, ५ जानेवारी (वार्ता.) – गोवा पर्यटन विकास महामंडळ आग्वाद येथील केंद्रीय कारागृहाचे पर्यटनस्थळात रूपांतर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रकल्पाद्वारे पर्यटकांना गोवा मुक्तीलढ्याविषयी माहिती दिली जाणार आहे. स्वदेश दर्शन योजनेच्या अंतर्गत ३० कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई यांनी दिली.

निखिल देसाई पुढे म्हणाले, हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा असेल. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची अनुज्ञप्ती मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे. पर्यटकांनी या ठिकाणी किमान ४ ते ६ घंटे घालवून गोवा मुक्तीलढ्याची माहिती घ्यावी, हा यामागील उद्देश आहे. या ठिकाणी संग्रहालय उभारण्याचा विचार आहे. गोवा मुक्तीलढ्यात सहभाग घेतलेल्या नेत्यांचे अर्धपुतळे उभारणे, ऐतिहासिक कलाकृती, आवाज आणि प्रकाश योजना आदींचा या प्रकल्पात समावेश करण्यात येणार आहे. पर्यटकांना गोवा मुक्तीलढ्याची माहिती देणारी एक ऑडिओ-व्हिज्युअल खोलीही या ठिकाणी उभारली जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागेल.

आग्वाद येथील केंद्रीय कारागृह हा आग्वाद किल्ल्याचा एक भाग आहे. किल्ल्यातील कारागृह जुलै २०१५ मध्ये कोलवाळ येथे स्थलांतरित करण्यात आले होते. १८ व्या शतकातील काब-द-राम किल्ल्याची दुरुस्ती आणि विकास केला जाणार, असेही निखिल देसाई यांनी सांगितले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now