‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांची आज जयंती

६ जानेवारी या दिवशी असलेल्या पत्रकारदिनाच्या निमित्ताने…

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचा दिवस ‘मराठी पत्रकारदिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. आचार्य जांभेकर यांना विनम्र अभिवादन !

‘राष्ट्र-धर्मासंदर्भात इतरांना ‘काहीतरी करा’, असे शिकवणारे; पण स्वतः काही न करणारे पत्रकार ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान । आपण कोरडे पाषाण ॥’ या गटात येतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेची दुःस्थिती !

१. अभ्यासपूर्ण सामाजिक दृष्टीकोन असलेल्या मनुष्यबळाची आजच्या पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठी उणीव असून संपादकवर्गालाही स्वतःची कोणतीही वेगळी भूमिका नसणे, त्यामुळे काही अपवाद वगळता अग्रलेखांचे वैशिष्ट्य संपत चालले असणे

‘अभ्यासपूर्ण सामाजिक दृष्टीकोन असलेल्या मनुष्यबळाची आजच्या पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठी उणीव आहे. याचा परिणाम संपादकवर्गालाही स्वतःची कोणतीही वेगळी भूमिका नसण्यात झाला आहे. त्यामुळे काही अपवाद वगळता अग्रलेखांचे वैशिष्ट्य संपत चालले असून अनेक संपादकीयही फिरवून लिहिलेल्या वृत्तांच्या स्वरूपाची असतात. या संदर्भात मराठीपेक्षा इंग्रजीची अवस्था अगदी वाईट आहे. त्यामुळे अग्रलेखाचे पान असावे कि नसावे, यावर तेथे चर्चा चालली असून ‘डी.एन्.ए.’ या इंग्रजी वृत्तपत्राने ते पान रहितच केले आहे. वैचारिक चर्चा करणारे स्तंभही त्यांनी वेेगवेगळ्या पानांवर विखरून टाकले आहेत. त्यामुळे त्यातून ‘आपली भूमिका प्रस्थापित करायची असते’, हा वृत्तपत्रांचा विचार कालातीत झाला आहे आणि त्यांचे स्वरूप एकतर लोकानुरंजनाचे साधन किंवा विज्ञापनदात्यांच्या पुरस्काराचे माध्यम इतकेच मर्यादित उरले आहे.

२. वृत्तपत्रे लोकमानस घडवण्यापेक्षा आपली वृत्ते आणि ज्ञान विकण्यात गर्क असल्यामुळे लोकमताला वळण देण्याचे त्यांचे सामर्थ्य त्यांनी गमावले असणे

जागतिकीकरणासह जो बाजारपेठीय सामाजिक दृष्टीकोन निर्माण झाला आहे, त्याचाही या संदर्भात विचार करणे आवश्यक आहे. येणारा प्रत्येक क्षण, येणारी प्रत्येक संधी, करण्याची प्रत्येक कृती जर रुपयापैशांत मोजता येत नसेल, तर तिचे मोल शून्य आहे, असे ही संस्कृती गृहित धरते. ‘रिच डॅड, पुअर डॅड’ या सारख्या पुस्तकांची लोकप्रियता या संस्कृतीचा वाढता प्रभाव स्पष्ट करते. अशा अवस्थेत एक पत्रकारिताच वेगळी कशी राहू शकेल ? वृत्तपत्रे लोकमानस घडवण्यापेक्षा आपली वृत्ते आणि ज्ञान विकण्यात गर्क आहेत अन् त्यामुळे लोकमताला वळण देण्याचे त्यांचेे सामर्थ्य त्यांनी गमावले आहे.

३. एका प्रतिष्ठित इंग्रजी वर्तमानपत्राने आणलेली ‘पाहुणे संपादका’ची कल्पना पत्रकारितेचे दुसरे अवमूल्यनच !

आणीबाणीतील पत्रकारितेसंबंधी बोलतांना लालकृष्ण अडवाणी म्हणाले होते, ‘जेथे शासनाने वाकायला सांगितले, तेथे त्यांनी गुडघे टेकले.’ आजच्या संपादकीय विभागाची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. काहीतरी नवे करायच्या नादात एका प्रतिष्ठित इंग्रजी वर्तमानपत्राने पाहुण्या संपादकांची कल्पना आणली. या कल्पनेइतके पत्रकारितेचे दुसरे अवमूल्यन कोणते नाही. एखादा राजकीय नेता ‘नायक’ या चित्रपटाप्रमाणे एखाद्या पत्रकाराला आपल्या आसंदीत प्रत्यक्षात बसवेल काय ? किंवा एखादा उद्योगपती आपल्या उद्योगाची सूत्रे एक दिवस तरी दुसर्‍याच्या हाती ठेवेल काय ? परंतु पत्रकारिता म्हणजे आपण जीवनभर बाळगलेल्या भूमिकेची प्रस्तापना नसून ती केवळ वृत्ते आणि ज्ञानाचे व्यवस्थापन आहे, अशी भूमिका घेतली की, या क्षेत्राकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटतो.

४. भारताच्या स्वातंत्र्यानंतर परिवर्तनाचे सांस्कृतिक अधिष्ठान नष्ट होणे आणि नेहरूंच्या युरोपियन उदारमतवाद आणि साम्यवादी विचारविश्‍व यांनी सांस्कृतिक विचारप्रवाहाशी युद्ध पुकारले असणे

श्रीकृष्ण, चाणक्य, छत्रपती शिवाजी महाराज ही मोठी नावे झाली, तरी त्यांचे वैशिष्ट्य हे की, आपल्या यशासाठी त्यांनी अनेक मूल्यात्मक तडजोडी केल्या; परंतु त्या कशासाठी करायच्या, याचे भान सोडले नाही. त्यामुळे ते नवयुगाचे निर्माते ठरले.

स्वातंत्र्यपूर्व काळात न्या. रानडे, लो. टिळक, डॉ. आंबेडकर यांनी समाजपरिवर्तनाचा दृष्टीकोन मांडतांना परिवर्तनाच्या आवश्यकतेला येथील संस्कृतीची जोड दिली. न्या. रानडे यांनी संतपरंपरेच्या सांस्कृतिक गाभ्यावर आधारित परिवर्तनाचा विचार मांडला.

लोकमान्य टिळकांनी गीतेच्या आधाराने निष्काम कर्मयोगाचा सिद्धांत मांडला.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर परिवर्तनाचे हे सांस्कृतिक अधिष्ठान नष्ट झाले. पं. नेहरूंच्या युरापीय उदारमतवाद आणि साम्यवादी विचारविश्‍व यांनी येथील सांस्कृतिक विचारप्रवाहाशी युद्ध पुकारले.’

– श्री. दिलीप करंबळेकर (साप्ताहिक वज्रधारी, २४.३.२०११)

सत्तेच्या बाजारात विकली गेलेली मृत पत्रकारिता !

१. सत्तेच्या बाजारात आपली लेखणी विकणार्‍या स्वार्थी माणसांकडून राष्ट्राविषयी चिंतन होणे अशक्य !

‘ज्या राष्ट्रातील बुद्धीवादी स्वार्थ आणि स्वतःच्या सोयी-सुविधा यांचाच विचार करत असतील, तर त्याच्याकडून राष्ट्राविषयी चिंतन कधीही होऊ शकत नाही. ज्याने आपली लेखणी सत्तेच्या बाजारात विकली आहे, अशी व्यक्ती चिंतन करणारा विचारवंत होऊच शकत नाही.

२. आजचा लेखक, साहित्यिक आणि पत्रकार स्वार्थी अन् भित्रा झाल्याने विकला गेला असून तो समाजाच्या ध्येयांना समर्पित आहे कि नाही, हीच पत्रकारितेची परीक्षा असणे

सत्य हेच आहे की, आजचा लेखक, साहित्यिक आणि पत्रकार स्वार्थी अन् भित्रा झाल्याने विकला गेला आहेे. या देशातील सामान्य माणूस हा आजच्या तथाकथित लेखक, साहित्यिक आणि पत्रकार यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू राहिलेला नाही. लेखक आणि पत्रकार यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे, ‘ते जिवंत असल्याची जाणीव समाजाला नसेल, तर ते सर्व मृत असल्यासारखे आहेत.’ वास्तविक पत्रकारितेची हीच परीक्षा असते की, तो स्वतःच्या सुख आणि सुविधा मिळवण्यात मग्न आहे कि समाजाच्या ध्येयांना समर्पित आहे.’

(मासिक ‘ठेंगेपर सब मार दिया’, सप्टेंबर २०१०)


Multi Language |Offline reading | PDF