कुंभमेळाक्षेत्र असलेल्या प्रयागराजचे आध्यात्मिक माहात्म्य !

१४ जानेवारी २०१९ पासून प्रयागराज येथे चालू होणार्‍या अर्धकुंभाच्या निमित्ताने…

प्रयाग हे उत्तरप्रदेशातील गंगा, यमुना आणि सरस्वती  (ही नदी अदृश्य आहे.) यांच्या पवित्र अशा ‘त्रिवेणी संगमा’वर वसलेले तीर्थस्थान आहे. या पवित्र संगमामुळेच याला ‘प्रयागराज’ किंवा ‘तीर्थराज’ असे म्हटले जाते.

जागतिक स्तरावर होत असलेल्या सर्वांत मोठ्या आध्यात्मिक यात्रेची म्हणजेच ‘कुंभमेळ्या’ची प्रातिनिधिक छायाचित्रे

१. व्युत्पत्ती अन् अर्थ

प्रयागराज हा शब्द ‘प्र’ उपसर्गपूर्वक ‘यज्’ या धातूपासून बनला आहे. त्याचा अर्थ ‘मोठा यज्ञ करणे’, असा आहे. ‘सर्व प्रकारच्या यज्ञांसाठी प्रयागराज हे सर्वोत्कृष्ट तीर्थ असल्याने त्याला प्रयागराज म्हणतात.’ (स्कंदपुराण)

‘प्रयाग’ हे नाव अर्थपूर्ण आणि अतीप्राचीन असल्याने भाविकांनी या क्षेत्राला परकीय आक्रमकांनी दिलेल्या ‘अलाहाबाद’ या नावापेक्षा ‘प्रयाग’ असे संबोधावे.

२. क्षेत्रमाहात्म्य

२ अ. प्रजापतिक्षेत्र : हरवलेले चारही वेद परत मिळाल्यावर प्रजापतीने या ठिकाणी एक महायज्ञ केला होता; म्हणून प्रयागला ‘प्रजापतिक्षेत्र’ असेही म्हणतात.

२ आ. पाच यज्ञवेदींतील मध्यवेदी : ब्रह्मदेवाच्या कुरुक्षेत्र, गया, विराज, पुष्कर आणि प्रयागराज या पाच यज्ञवेदींपैकी प्रयागराज ही मध्यवेदी आहे.

२ इ. त्रिस्थळी यात्रेपैकी एक : काशी, प्रयागराज आणि गया या त्रिस्थळी यात्रेपैकी एक असलेल्या प्रयागचे स्थान धार्मिकदृष्ट्या अद्वितीय आहे.

२ ई. प्रलयकाळी सुरक्षित रहाणारे क्षेत्र : प्रयागराज हे ‘अक्षय क्षेत्र’ आहे. महाप्रलय होऊन सर्व जग बुडाले, तरी प्रयागराज बुडणार नाही. प्रलयांती श्रीविष्णु येथील अक्षयवटावर शिशूरूपाने शयन करील, तसेच सर्व देव, ऋषि आणि सिद्ध येथे वास्तव्य करून या क्षेत्राचे रक्षण करतील, असे याचे क्षेत्रमाहात्म्य आहे.

२ उ. विविध धर्मग्रंथांत वर्णिलेले माहात्म्य

२ उ १. ऋग्वेद : ऋग्वेदातील खिलसूक्तात म्हटले आहे –

सितासिते सरिते यत्र सङ्गते तत्राप्लुतासो दिवमुत्पतन्ति ।

ये वै तन्वं विसृजन्ति धीरास्ते जनासो अमृतत्वं भजन्ते ॥ – ऋग्वेद, खिलसूक्त

अर्थ : गंगा-यमुना या दोन नद्या एकत्र मिळतात, तेथे स्नान करणार्‍यांना स्वर्ग मिळतो. त्या संगमात जे धीर पुरुष तनुत्याग करतात, त्यांना मोक्षप्राप्ती होते.

२ उ २. पद्मपुराण : प्रयागराज तीर्थक्षेत्राविषयी पद्मपुराणात म्हटले आहे –

ग्रहाणां च यथा सूर्यो नक्षत्राणां यथा शशी । तीर्थानामुत्तमं तीर्थं प्रयागाख्यमनुत्तमम् ॥

अर्थ : ज्याप्रमाणे ग्रहांमध्ये सूर्य आणि नक्षत्रांमध्ये चंद्रमा श्रेष्ठ आहे, त्याप्रमाणे सर्व तीर्थांमध्ये प्रयागराज सर्वोत्तम आहे.

२ उ ३. कूर्मपुराण : प्रयागराज हे तीनही लोकांतील सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे.

२ उ ४. महाभारत 

प्रयागः सर्वतीर्थेभ्यः प्रभवत्यधिकं विभो ॥ श्रवणात् तस्य तीर्थस्य नामसंकीर्तनादपि ।

मृत्तिकालम्भनाद्वापि नरः पापात् प्रमुच्यते ॥

अर्थ : हे राजन्, प्रयागराज हे सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ आहे. त्याचे माहात्म्य श्रवण केल्यास, नामसंकीर्तन केल्यास अथवा तेथील मातीचे अंगाला लेपन केल्यास मनुष्य पापापासून मुक्त होतो. (महाभारत, पर्व ३, अध्याय ८३, श्‍लोक ७४, ७५)

३. तीर्थयात्रेतील विधी

प्रयागराजची तीर्थयात्रा करतांना त्रिवेणीसंगमाचे पूजन, केशमुंडन, गंगास्नान, पितृश्राद्ध, सौभाग्यवती स्त्रियांचे वेणीदान आणि देवतांचे दर्शन घेणे एवढे आवश्यक विधी करायचे असतात.

४. स्थानदर्शन

प्रयागच्या स्थानदर्शनाविषयी एका श्‍लोकात म्हटले आहे –

त्रिवेणीं माधवं सोमं भरद्वाजं च वासुकिम् । वन्देऽक्षयवटं शेषं प्रयागं तीर्थनायकम् ॥

अर्थ : त्रिवेणी (संगम), वेणीमाधव, सोमेश्‍वर, भरद्वाज, वासुकि नाग, अक्षयवट, शेष अन् तीर्थराज प्रयागराज यांना मी वंदन करतो.

४ अ. त्रिवेणी संगम : गंगा-यमुना-सरस्वती या तीन नद्यांचे प्रवाह संगमस्थळी वेणीच्या पेडांसारखे एकमेकांत मिसळले आहेत.

४ आ. माधव : येथे माधवक्षेत्र असून त्यात वेणीमाधव (प्रमुख माधव), शंखमाधव, मनोहरमाधव आदी १२ माधव आहेत.

४ इ. सोमेश्‍वर : यमुनेच्या पार अरैल गावी बिंदूमाधव क्षेत्राजवळ हे शिवमंदिर आहे.

४ ई. भरद्वाज आणि शेष : येथे भरद्वाजमुनींचा आश्रम आहे. या आश्रमातील शिवलिंगाला ‘भरद्वाजेश्‍वर’ म्हणतात. या मंदिरात सहस्र फण्यांची शेषमूर्ती आहे.

४ उ. वासुकीश्‍वर : येथील गंगातिरावर (बक्षी पेठेत) वासुकीचे मंदिर आहे.

४ ऊ. अक्षयवट : हा प्राचीन अन् पवित्र वटवृक्ष प्रयागराज येथील यमुनेच्या काठावर आहे. समस्त देवतांचा निवास असलेल्या अक्षयवटाची मुळे पाताळापर्यंत आहेत. वायू, मत्स्य, कूर्म, पद्म, अग्नी अन् स्कंद या पुराणांमध्ये ‘अक्षयवटाजवळ देहत्याग केल्याने मोक्ष मिळतो’, असे सांगितले आहे.

४ ऊ १. हिंदूंना मोक्ष मिळू नये, यासाठी प्रयागराज येथील अक्षयवट उद्ध्वस्त करून तेथे किल्ला उभारणारा हिंदूद्वेषी अकबर अन् अकबरपुत्र जहांगीर ! : सतराव्या शतकाच्या आरंभी मोगल बादशहा अकबराने प्रयागक्षेत्री यमुनेच्या काठावर संरक्षणासाठी किल्ला बांधण्याचे कारण सांगून अक्षयवट आणि त्या परिसरातील मंदिरे यांचा विध्वंस केला. जेथे अक्षयवट होता, तेथे त्याने किल्ल्यातील ‘रानीमहल’ बांधला. काही कालावधीनंतर त्या किल्ल्यात पुन्हा अक्षयवट उगवला. तेव्हा अकबरपुत्र जहांगिराने अनेक वेळा तो जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. जहांगिराने उष्ण तवा ठेवून तो वृक्ष मुळापासून नष्ट करण्याचाही प्रयत्न केला; मात्र प्रत्येक वेळी या अक्षयवटाला नवे धुमारे फुटले आणि पुढे त्यांने वृक्षाचे रूप धारण केले. वर्ष १६९३ मधील ‘खुलासत उत्कारीख’ या ग्रंथात ‘जहांगिराने अक्षयवट कापूनही तो पुन्हा उगवला’, अशी साक्ष आहे.

आजही यमुना नदीच्या काठावरील या किल्ल्यात हा प्राचीन वृक्ष उभा आहे. हिंदूंना मोक्ष मिळू नये, यासाठी मोगल बादशहांनी त्याचे दर्शन घेण्यास बंदी घातली. पुढे इंग्रजांनी ती बंदी चालूच ठेवली. स्वातंत्र्यानंतर या किल्ल्यात भारतीय सेनादलाचे शस्त्रागार बनल्याने तेथील सुरक्षाव्यवस्थेत वाढ झाली. वर्षातून एकदा माघमेळ्याला आणि कुंभमेळ्याला तेथे अक्षयवटाचे दर्शन घेण्याची अनुमती मिळाली. अन्य कालावधीत भाविकांना किल्ल्यातील वृक्षाचे खोड दुरूनच दाखवले जात असे. वर्ष २०१३ च्या कुंभमेळ्याच्या वेळी भारतीय सेनादलाने पुढाकार घेऊन हिंदूंना वर्षभर अक्षयवटाचे दर्शन मिळण्यासंदर्भात संरक्षण विभागाशी यशस्वी पत्रव्यवहार केला. त्यामुळे आता प्रतिदिन हिंदूंना किल्ल्यात जाऊन पाताळपुरी मंदिर, सरस्वति कुप (विहीर) आणि अक्षयवट यांचे दर्शन घेणे शक्य होत आहे.

५. कुंभमेळा

प्रयागराज येथील गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर प्रत्येक १२ वर्षांनी कुंभमेळा भरतो. त्याला ‘महाकुंभमेळा’ असे म्हणतात.

या कुंभपर्वाच्या वेळी मकर संक्रांती, माघी (मौनी) अमावास्या आणि वसंतपंचमी ही तीन पर्वकाळ असतात. त्यांपैकी माघी (मौनी) अमावास्या हे प्रमुख पर्व असून त्याला ‘पूर्णकुंभ’ हे नाव आहे. माघी पौर्णिमा या दिवशीही पर्वकाळ मानला जातो. या चारही पर्वांच्या दिवशी गंगास्नानाला विशेष महत्त्व असते. १२ वर्षांनंतर येणार्‍या कुंभमेळ्यानंतर ६ वर्षांनी येणार्‍या कुंभमेळ्यास ‘अर्धकुंभमेळा’ असे म्हटले जाते.

५ अ. माघमेळा : या पवित्र त्रिवेणी संगमावर प्रतिवर्षी माघ मासात (महिन्यात) यात्रा भरते. हा ‘माघमेळा’ या नावाने ओळखला जातो. माघ मासातील अमावास्येला स्नान करण्यासाठी संन्यासी या ठिकाणी एकत्र येतात. पद्मपुराणानुसार माघमासात प्रयागराज येथे स्नान करण्याचे सौभाग्य लाभणे, हे अतिशय दुर्लभ आहे. प्रयागराज येथे माघमासात प्रतिदिन स्नान केल्याने मिळणारे फळ अग्नीपुराणानुसार कोट्यवधी गायींच्या दानासमान, ब्रह्मपुराणानुसार माघमासातील स्नान अश्‍वमेध यज्ञासमान आणि मत्स्यपुराणानुसार दहा कोटींहून अधिक तीर्थांच्या यात्रेच्या फळाइतके आहे. प्रयागराज येथे मकरसंक्रांतीला केलेले स्नान आणि दान यांचे फळ किती अधिक आहे, हे सांगण्यास स्वयं ब्रह्मदेवही असमर्थ आहे, असे महाभारतात म्हटले आहे.

५ आ. कल्पवास : कुंभपर्वातील एक साधना ! : प्रयागराज येथील संगमाच्या ठिकाणी पौष शुक्ल पक्ष एकादशीपासून माघ पौर्णिमेपर्यंत अनेक साधूसंत आणि भाविक प्रयागराज येथील गंगातटावर संयमपूर्वक निवास करतात. या निवासाला ‘कल्पवास’ असे म्हणतात. हा कल्पवास करणारे व्रतस्थ कल्पवासी माससमाप्तीनंतर घरी परत जातांना त्यांच्या कुटीचेही दान करतात. पुराणात ‘कल्पवास करणे’ हे विशेष पुण्यकारक मानले असून त्यात ‘कल्पवास पितरांना संतुष्ट करणारा, पापांचा विनाश करणारा आणि भवसागरातून मुक्ती देणारा आहे’, असे म्हटले आहे. धर्मशास्त्रांनी ‘प्रयागमध्ये श्रद्धाभक्तीपूर्वक आणि सविधी कल्पवास करणे अतिशय महत्त्वपूर्ण असून त्याचे फल अक्षय आहे’, असे म्हटले आहे. कल्पवास करणार्‍यांनी एक मास भूमीवर शयन (झोपणे), उपवास, त्रिकाल स्नान, जितेंद्रीय होऊन समस्त भोगांचा त्याग आणि विष्णुपूजन केले पाहिजे, असे धर्मशास्त्रे सांगतात.

कल्पवासामुळे सर्व पापे धुतली जातात, अशी श्रद्धा आहे. कुंभपर्वात कल्पवासी ईश्‍वराला मस्तिष्क आणि मन समर्पित करण्याच्या भावातून ‘मुंडण संस्कार’ करतात.

५ इ. प्रयागवाल – कुंभपर्वातील विधींचे पुरोहित ! : यांना त्रिवेणी तट आणि जल यांवरील दानदक्षिणा ग्रहण करणे, पूजाविधी करणे, तसेच कुंभमेळ्याचे आयोजन करणे, असे अधिकार असतात. कुंभमेळ्यातील कल्पवासींच्या निवासाचीही सोय ते करतात. ही परंपरा प्राचीन असून ‘मत्स्यपुराणा’त तिचा उल्लेख आहे. अस्थीविसर्जनाचे पूजाकार्यही हीच मंडळी करतात.

संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘कुंभपर्वाचे माहात्म्य (कुंभपर्वक्षेत्रे आणि कुंभमेळे यांच्या वैशिष्ट्यांसह)’    


Multi Language |Offline reading | PDF