केरळमध्ये भाजप खासदार आणि माकप आमदार यांच्या घरांवर बॉम्बफेक

शबरीमला मंदिरात २ महिलांनी केलेल्या प्रवेशाचे प्रकरण

  • शबरीमला प्रकरणावरून केरळमधील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे, हे आता केंद्र सरकारने न्यायालयात मांडले पाहिजे, असेच जनतेला वाटते !
  • लोकशाहीमध्ये न्याय देतांना कायदेच नव्हे, तर जनतेच्या धार्मिक भावनाही पहायला हव्यात, हे आता लक्षात घ्यायची वेळ आली आहे !
  • केरळ आणि बंगाल येथे उघडपणे बॉम्ब फेकले अन् फोडले जातात; मात्र संबंधितांवर आणि त्यांच्या पक्ष किंवा संघटना यांवर कधी बंदीची मागणी केली जात नाही; मात्र खोट्या आरोपांवरून निरपराध सनातन संस्थेवर बंदीची मागणी केली जाते, हे लक्षात घ्या !
आमदार ए.एन्. शमसीर आणि भाजप खासदार व्ही. मुरलीधरन्

थिरूवनंतपूरम् – केरळमधील कन्नूर जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार ए.एन्. शमसीर यांच्या निवासस्थानावर बॉम्ब फेकण्यात आला. या वेळी शमसीर घरी नव्हते. या घटनेच्या काही वेळेनंतर भाजप नेते आणि राज्यसभेतील खासदार व्ही. मुरलीधरन् यांच्या घरावरही काही अज्ञातांनी गावठी बॉम्ब फेकला. या बॉम्बफेकीमध्ये कोणीही घायाळ झाले नाही. ४ जानेवारीच्या रात्री या घटना घडल्या. याच रात्री शबरीमला मंदिर प्रशासनाचे सदस्य शशिकुमार यांच्या घरावरही बॉम्ब फेकण्यात आला होता. तत्पूर्वी सायंकाळी माकप नेते शशी यांच्या घरावरही बॉम्ब फेकण्यात आला. यात त्यांच्या घराची हानी झाली. या आक्रमणानंतर थिरुवनगाड येथे संघाचे नेते के. चंद्रशेखरन् यांच्या घरावर आक्रमण करण्यात आले. इरिट्टी परिसरात एका माकप कार्यकर्त्यावर चाकूने वार करण्यात आले. शबरीमला मंदिरात २ महिलांनी केलेल्या प्रवेशावरून झालेल्या हिंसाचाराच्या वेळीच या घटना घडल्या.

१. शमसीर यांनी त्यांच्या घरावर बॉम्बफेक करण्यामागे रा.स्व. संघाच्या मोठ्या नेत्यांचा हात आहे, असा आरोप केला आहे. दुसरीकडे भाजप आणि संघ यांच्या कार्यालयांवर कम्युनिस्ट पक्षाच्या समर्थकांनी आक्रमण केल्याचा आरोप भाजपने केला आहे. मुरलीधरन् यांच्या घरावर आक्रमण करणारेही कम्युनिस्ट पक्षाचे समर्थक असल्याचा आरोप केला जात आहे.

२. भाजपचे नेते जी.व्ही.एल्. नरसिम्हा राव यांनी या हिंसाचारामागे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांना उत्तरदायी ठरवले आहे. केरळ सरकार भाजप कार्यकर्त्यांना लक्ष्य करत आहे. शबरीमलाच्या नावाखाली केरळ सरकार लांगूलचालनाचे राजकारण करत आहे, असा आरोप राव यांनी केला आहे.

३. केरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कन्नूरमध्ये ४ जानेवारीच्या रात्री झालेल्या हिंसक घटनांच्या प्रकरणी ३३ जणांना अटक करण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF