रेल्वे मंत्रालयाने हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनाची नोंद घेत अधिभार केला रहित !

कुंभमेळ्याच्या कालावधीत रेल्वेच्या तिकिटावर अधिभार लावल्याचे प्रकरण

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलनां’च्या माध्यमातून अधिभार रहित करण्याची केली होती मागणी !

  • हिंदूंनो, या यशासाठी ईश्‍वरचरणी कृतज्ञता व्यक्त करा आणि यातून कृतीशील हिंदूसंघटनाचे महत्त्व जाणा !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथे लवकरच प्रारंभ होणार्‍या कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने भाविकांसाठी रेल्वेच्या तिकिटावर लावलेला अधिभार रहित केला आहे. मंत्रालयाकडून या आशयाचे एक लेखी पत्र हिंदु जनजागृती समितीला नुकतेच प्राप्त झाले.

ऑक्टोबर २०१८ मध्ये उत्तरप्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलनां’च्या अंतर्गत रेल्वे तिकिटावरील अधिभार रहित करण्याची एकमुखी मागणी केली होती. यासमवेतच हिंदु जनजागृती समितीने रेल्वे मंत्रालय आणि विविध ठिकाणचे सरकारी अधिकारी यांना या आशयाचे निवेदनही सुपुर्द केले होते. या आंदोलनांची नोंद घेत मंत्रालयाने हा अधिभार रहित केल्याचे एका लेखी पत्राद्वारे हिंदु जनजागृती समितीला कळवले आहे.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये रेल्वे मंत्रालयाला दिलेल्या निवेदनातील सूत्रे

१. प्रयागराज, उत्तरप्रदेश येथे १४ जानेवारी २०१९ पासून चालू होत असलेल्या कुंभमेळ्यासाठी रेल्वेने येणार्‍या भाविकांवर रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त अधिभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत ‘सर्वसाधारण (जनरल) आणि ‘स्लिपर क्लास’ डब्यांमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी तिकिटामागे १० रुपये, ‘थ्री टायर एसी’साठी २० रुपये, ‘टू टायर एसी’साठी ३० रुपये आणि ‘फर्स्ट एसी’साठी ४० रुपये अतिरिक्त अधिभार आकारण्यात येणार आहे.

२. हा निर्णय म्हणजे जाणीवपूर्वक हिंदूंच्या यात्रेवर बंधने आणण्याचा प्रकार आहे आणि तो संतापजनक आहे. कोट्यवधी भाविक जेथे जमतात, तो कुंभमेळा हा जगातील सर्वांत मोठा धार्मिक कार्यक्रम आहे. त्यामुळे अशा मेळाव्यासाठी सोयीसुविधा देणे तर लांब; मात्र शासन बहुसंख्येने येणार्‍या हिंदूंवर अधिभार लावते.

३. अन्य धर्मियांच्या धार्मिक यात्रांसाठी प्रवासावर अधिभार लावणे तर सोडाच, उलट सरकारकडून त्यांना विविध सवलती दिल्या जातात. यामुळे हिंदूंना त्यांच्याच देशात विविध यात्रा या गुलाम असल्याप्रमाणे कराव्या लागत आहेत. त्यांच्यावर बंधने लादली जात आहेत.

४. रेल्वे प्रशासनाचा तिकिटावर अधिभार लावण्याचा निर्णय हा अत्यंत अन्यायकारी, भेदभाव करणारा, तसेच हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा आहे. या निर्णयामुळे हिंदूंमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

५. धर्मनिरपेक्ष न्यायप्रणालीत सर्व धर्मांना समान न्याय मिळणे आवश्यक असतांना हिंदूंच्या संदर्भात मात्र तो दिसून येत नाही. तरी रेल्वे मंत्रालयाने कुंभमेळ्यासाठी येणार्‍या भाविकांसाठी रेल्वेच्या तिकीटावर लावलेला अधिभार त्वरित रहित करावा.’


Multi Language |Offline reading | PDF