‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या डिसेंबर २०१८ मधील संशोधन कार्याचा आढावा !

‘आजकाल अनेक लोकांचा संतांच्या अनुभवसिद्ध ज्ञानापेक्षा वैज्ञानिक उपकरणाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीवर अधिक विश्‍वास असतो. त्यामुळे वर्ष २०१४ पासून ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने हिंदु धर्मातील आचार, धार्मिक कृती, सामाजिक कृती (उदा. दीपप्रज्वलन, उद्घाटन इत्यादी), यज्ञ, अनुष्ठान, मंत्रपठण इत्यादी विषयांचे आध्यात्मिक महत्त्व आधुनिक वैज्ञानिक परिभाषेत समजावून सांगण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक स्तरावर संशोधन करण्यात येत आहे. यासाठी ‘इलेक्ट्रोसोमॅटोग्राफिक स्कॅनिंग’, ‘यूनिव्हर्सल थर्मो स्कॅनर (यू.टी.एस्.)’, ‘पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी (पिप)’, ‘थर्मल इमेजिंग’, ‘गॅस डिस्चार्ज व्हिजुअलायझेशन (जी.डी.व्ही.)’ इत्यादी आधुनिक वैज्ञानिक उपकरणे आणि प्रणाली यांचे साहाय्य घेण्यात येत आहे. या संशोधन कार्याला पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील ज्ञानाची, म्हणजे सूक्ष्म परीक्षणाची जोड देऊन विश्‍लेषण करण्यात येत आहे. या संशोधन कार्याचा डिसेंबर २०१८ या मासातील आढावा येथे देत आहोत.

प.पू. तुळशीदास महाराज यांच्या समाधीतील ऊर्जेची ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे मोजणी करतांना श्री. आशिष सावंत

१. डिसेंबर २०१८ मध्ये ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ऊर्जा आणि प्रभामंडळ मापक यंत्रांच्या साहाय्याने एकूण ९७ प्रयोगांतर्गत केलेल्या १०१ चाचण्यांमध्ये ३२८ घटक किंवा सहभागी व्यक्ती यांच्या ५६४ मोजण्यांच्या नोंदी करण्यात आलेल्या असणे

डिसेंबर २०१८ मध्ये ‘यूनिव्हर्सल थर्मो स्कॅनर (यू.टी.एस्.)’ आणि ‘गॅस डिस्चार्ज व्हिजुअलायझेशन (जी.डी.व्ही.)’ ही ऊर्जा आणि प्रभामंडळ मापक यंत्रे अन् प्रणाली यांच्या माध्यमातून करण्यात आलेले प्रयोग, चाचण्या, घटक आणि मोजणीच्या नोंदी यांची संख्या पुढील सारणीत दिली आहे.

१ अ. ‘प्रयोग, चाचण्या, घटक आणि मोजण्यांच्या नोंदी’ या संज्ञांचे अर्थ : या संज्ञांचे अर्थ ‘सात्त्विक आणि असात्त्विक नक्षी असलेल्या सोन्याच्या अलंकारांचा व्यक्तीवर आध्यात्मिक स्तरावर होणारा परिणाम’ अभ्यासण्यासाठी केलेल्या एका प्रयोगाचे उदाहरण घेऊन त्यातून आपण समजून घेऊया. या प्रयोगात वाईट शक्तींचा त्रास असलेल्या ५ साधिका आणि वाईट शक्तींचा त्रास नसलेल्या ५ साधिका सहभागी झाल्या होत्या. या प्रयोगाच्या संदर्भात ‘प्रयोग, चाचण्या, घटक आणि मोजणीच्या नोंदी’ या संज्ञांचे अर्थ पुढीलप्रमाणे आहेत.

१ अ १. प्रयोग : प्रयोगातील प्रत्येक साधिकेने सात्त्विक नक्षी असलेला हार आणि असात्त्विक नक्षी असलेला हार घालण्यापूर्वी अन् घातल्यानंतर वरील सारणीमध्ये दिलेल्या यंत्रांपैकी एका यंत्राद्वारे (उदा. ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे) केलेल्या मोजणीच्या नोंदी करण्यात आल्या. हा एक प्रयोग झाला.

१ अ २. चाचण्या : या एका प्रयोगात ‘सात्त्विक नक्षी असलेल्या हाराचा परिणाम अभ्यासणे’ आणि ‘असात्त्विक नक्षी असलेल्या हाराचा परिणाम अभ्यासणे’, अशा २ चाचण्या आहेत.

१ अ ३. घटक : या प्रयोगामध्ये वाईट शक्तींचा त्रास असलेल्या ५ साधिका आणि वाईट शक्तींचा त्रास नसलेल्या ५ साधिका अशा एकूण १० साधिका, म्हणजे १० घटक आहेत.

१ अ ४. मोजण्यांच्या नोंदी : या प्रयोगामध्ये प्रत्येक साधिकेच्या संदर्भात तिने सात्त्विक नक्षी असलेला हार घालण्यापूर्वी आणि घातल्यानंतर, तसेच असात्त्विक नक्षी असलेला हार घालण्यापूर्वी अन् घातल्यानंतर, अशा प्रकारे यंत्राद्वारे केलेल्या मोजणीच्या एकूण ४ नोंदी करण्यात आल्या. याचा अर्थ १० साधिकांच्या यंत्राद्वारे केलेल्या एकूण ४० मोजण्यांच्या नोंदी झाल्या.

२. डिसेंबर २०१८ मध्ये ‘यू.टी.एस्.’ या यंत्राच्या साहाय्याने केलेल्या प्रयोगांमध्ये केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे आध्यात्मिक विश्‍लेषण करून १२ संशोधन अहवाल बनवण्यात आले आहेत, तसेच सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण पालटांच्या संदर्भात केलेल्या सूक्ष्म परीक्षणावर आधारित २ लेख बनवण्यात आले आहेत.

‘व्हिडिओ गेम्स’चा श्री. योसिप (उभे असलेले) यांच्यावर झालेला परिणाम अभ्यासण्यासाठी ‘जी.डी.व्ही.’ उपकरणाद्वारे मोजणी करतांना श्री. आशिष सावंत

३. समाजात जाऊन संशोधन करणे

३ अ. उद्देश : यामध्ये समाजात घडणार्‍या विविध आध्यात्मिक घटनांची नोंद घेऊन तेथेही आध्यात्मिक संशोधन करण्याची संधी मिळवली जाते. हे संशोधन ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध केले जाते, तसेच त्याची ध्वनीचित्र-चकती (सी.डी.) संबंधितांना दिली जाते. यामुळे समाजातील व्यक्तींशी जवळीक होते, तेथे केलेल्या संशोधनातून अध्यात्मशास्त्र सांगितल्याने अध्यात्मप्रसार होतो, तसेच सनातन धर्म आणि हिंदु संस्कृती यांचे महत्त्व लोकांवर बिंबते.

३ आ. केलेले संशोधन

३ आ १. सोमयाग प्रवर्ग्य विधी : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेंडोली येथील ‘सोमयाग सेवा समिती’ने संकल्प केलेले ‘चरक सौत्रामणि याग’ आणि ‘बृहस्पतीसव याग’ हे याग ६ ते १६ डिसेंबर २०१८ या कालावधीत झाले. या यज्ञसोहळ्यांमध्ये अंतर्भूत असलेल्या ‘सोमयाग प्रवर्ग्य विधी’च्या संदर्भात संशोधन करण्याची महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संशोधन गटाला संधी मिळाली. हे संशोधन ‘यू.टी.एस्.’ उपकरणाच्या साहाय्याने करण्यात आले.
८, ९ आणि १० डिसेंबर या दिवशी झालेल्या सोमयाग प्रवर्ग्य विधीच्या दिवशी यज्ञस्थळी उपस्थित असलेल्या पुढील घटकांची चाचणी करण्यात आली.

अ. यज्ञवेदी

आ. यज्ञाचे पुरोहित वेदमूर्ती गणेश वासुदेव जोगळेकर गुरुजी

इ. यज्ञातील अश्‍व

ई. सोमयागात दुधाच्या आहुतींसाठी दूध देणारी शेळी आणि गाय

उ. यज्ञाला उपस्थित असलेली गावातील एक व्यक्ती

ऊ. यज्ञाच्या परिसरात संशोधनासाठी कुंडीतील शोभेचे एक झाडही ठेवण्यात आले.

‘या सर्व घटकांवर यज्ञाचा काय परिणाम होतो ?’, यासंदर्भात ‘यू.टी.एस्.’ उपकरणाच्या साहाय्याने चाचणी करण्यात आली. त्यात लक्षात आले की, यागाचा सर्वच घटकांवर पुष्कळ सकारात्मक परिणाम झाला. त्या सर्वांतील सकारात्मक ऊर्जा आणि त्यांची एकूण प्रभावळ वाढली. हे संशोधन करतांना गावातील अनेक जणांनी करण्यात आलेल्या चाचण्या आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे एकूण कार्य यांच्या संदर्भात जिज्ञासेने माहिती जाणून घेतली. यज्ञविधीत सहभागी झालेल्या पुरोहितांनी संशोधनामध्ये उत्स्फूर्तपणे सहकार्य केले.

३ आ २. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संतांच्या वास्तव्याची स्थाने : सिंधुदुर्ग जिल्हा ही संतांची भूमी आहे. या भूमीतील संतरत्नांपैकी कणकवली येथील प.पू. भालचंद्र महाराज; उभादांडा, वेंगुर्ले येथील प.पू. तुळशीदास महाराज (कूर्मदास महाराज) आणि आंदुर्ले, कुडाळ येथील प.पू. गिरीश आंबिये महाराज यांच्या वास्तव्याच्या स्थानी जाऊनही संशोधन करण्यात आले. तेथे देहत्याग केलेल्या संतांच्या नित्य वापरातील वस्तू, त्यांची समाधी इत्यादींचे ‘यू.टी.एस्.’ उपकरणाच्या साहाय्याने संशोधन करण्यात आले. त्या वेळी केलेल्या मोजण्यांच्या नोंदींतून ‘संत देहाने भूतलावर नसले, तरी त्यांचे चैतन्य वातावरणात अनेक वर्षे कार्यरत असते’, हे स्पष्ट झाले. या पवित्र स्थानी येणारे या संतांचे भक्त, तसेच शेकडो भाविक ‘संतांच्या स्थानी मन शांत होणे, नामजप एकाग्रतेने होणे’, अशा प्रकारे तेथील चैतन्याची प्रत्यक्ष अनुभूती घेत आहेत !

३ आ ३. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील नेरुर येथील साईबाबांचे मंदिर : येथे साईबाबांचे भारतातील पहिले मंदिर आहे. ते वर्ष १९२२ मध्ये बांधण्यात आले आहे. येथे एक वेगळाच दैवी गंध, तसेच गारवा जाणवला. मंदिरातील साईबाबांच्या मूर्तीच्या ‘यू.टी.एस्.’ यंत्राच्या साहाय्याने केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचा अभ्यास केल्यावर मूर्तीमध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असल्याचे आढळले.
(या सर्व चाचण्यांचे विश्‍लेषणात्मक अहवाल लवकरच प्रसिद्ध करणार आहोत.)

४. फ्रीबर्ग, जर्मनी येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग

६ डिसेंबर २०१८ या दिवशी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘दी इंटरनॅशनल जर्नल ऑफ आर्ट्स अँड सायन्स क्रिस्मस कॉन्फरन्स’ या फ्रीबर्ग, जर्मनी येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘समाजसेवेमुळे आध्यात्मिक उन्नती होते का ?’ हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक संशोधनावर आधारित त्यांनी लिहिलेला शोधनिबंध सादर करण्यात आला. युरोपमधील साधिका सौ. द्रगाना किस्लोव्हस्की यांनी तो सादर केला. या परिषदेत प्रत्येक सादरकर्त्याला केवळ १५ मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. त्यामुळे शोधनिबंधाचे सादरीकरण झाल्यानंतर उपस्थित जिज्ञासूंपैकी केवळ दोघांच्या प्रश्‍नांसाठी वेळ देता आला. परिषदेचे मुख्य आयोजक श्री. जोसफ अज्जोपर्दी यांना शोधनिबंध पुष्कळ आवडल्यामुळे, तसेच नंतरचे सादरकर्ते तोपर्यंत न पोहोचल्यामुळे श्री. अज्जोपर्दी यांनी सौ. द्रगाना यांना १५ मिनिटे वेळ वाढवून दिला. अशा प्रकारे शोधनिबंधाच्या सादरीकरणाला एकूण ३० मिनिटे मिळाली. असे वेळ वाढवून मिळणे हे आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये क्वचितच घडते आणि या परिषदेत हे केवळ महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या शोधनिबंधाच्या संदर्भातच घडले ! उपस्थितांपैकी दोघांनी रामनाथी, गोवा येथील संशोधन केंद्राला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली.

५. ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने आध्यात्मिक संशोधनावर पाठवण्यात आलेल्या ९ प्रबंधांचा पुढे होणार्‍या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांकडून स्वीकार

– कु. प्रियांका लोटलीकर आणि श्री. शॉर्न क्लार्क, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२.१.२०१९)

ई-मेल : [email protected]

ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री होणार्‍या ‘पार्टी’च्या परिणामाचा केलेला अभ्यास

ख्रिस्ती नववर्षाचे स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री ‘पार्टी’चे आयोजन करणे जगभरात रूढ झाले आहे. समाजातील सर्व धर्मांतील आणि सर्व स्तरांतील व्यक्ती यात सहभागी होतात. ‘या पार्टीचा सहभागी व्यक्तींवर काय परिणाम होतो ?’, याचा अभ्यास करण्यासाठी विश्‍वविद्यालयाच्या वतीने एक वैशिष्ट्यपूर्ण चाचणी करण्यात आली. या चाचणीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असलेले १२ देशी आणि विदेशी साधक ३१ डिसेंबरच्या रात्री गोव्यातील एका समुद्रकिनारी आयोजित केलेल्या एका पार्टीत सहभागी झाले. या चाचणीत सहभागी झालेल्या साधकांमध्ये ८ साधकांना वाईट शक्तींचा तीव्र त्रास आहे, २ साधकांना वाईट शक्तींचा त्रास नाही, तर २ साधकांना वाईट शक्तींचा त्रास नसून त्यांची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के आहे. या प्रयोगांतर्गत ते पार्टीसाठीची वेशभूषा, केशभूषा (हेअरस्टाइल) आणि रंगभूषा (मेकअप) करून गेले. तेथे ते सर्व साधक ५ घंटे होते. ३१.१२.२०१८ या दिवशी रात्री पार्टीला जाण्यापूर्वी, तसेच १.१.२०१९ या दिवशी पहाटे पार्टीहून परतल्यानंतर त्या सर्वांच्या ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. या केलेल्या सर्व मोजण्यांच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातून पुढील सूत्रे लक्षात आली.

१. वाईट शक्तींचा त्रास असलेल्या साधकांमधील नकारात्मक ऊर्जा पार्टीनंतर पुष्कळ प्रमाणात वाढली.

२. वाईट शक्तींचा त्रास नसलेल्या साधकांमध्ये, तसेच ६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या साधकांमध्ये पार्टीला जाण्यापूर्वी नकारात्मक ऊर्जा नव्हती. पार्टीला जाऊन आल्यानंतर केलेल्या चाचणीत ती वाढलेली आढळली. तसेच या साधकांमध्ये पार्टीला जाण्यापूर्वी असलेली सकारात्मक ऊर्जा पूर्णतः नष्ट झाली.
या चाचणीतून ३१ डिसेंबरला ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केल्या जाणार्‍या पार्टीचा आध्यात्मिक स्तरावर किती भयावह परिणाम होतो, हे स्पष्ट झाले. अनेक वर्षे साधना करत असलेले साधक केवळ काही घंटे या पार्टीत गेल्यावर एवढा अनिष्ट परिणाम होत असेल, तर साधना न करणार्‍यांवर तो किती अधिक प्रमाणात होत असावा, याची कल्पनाही करता येत नाही.

‘गाढवाला गुळाची चव काय ?’, ही म्हण सार्थ करणारे तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने जुलै २०१६ पासून ३१.१२.२०१८ पर्यंत ३८ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांत शोधनिबंध सादर करण्यात आले. नुकतेच अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या ‘समाजसेवेमुळे आध्यात्मिक उन्नती होते का ?’, तसेच पुरी, ओडिशा येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या ‘खरे नेतृत्व उच्च आध्यात्मिक स्तर असलेली व्यक्तीच करू शकते !’ या शोधनिबंधांना ‘सर्वोत्कृष्ट शोधनिबंध’, म्हणून घोषित करण्यात आले. सर्व शोधनिबंधांचे संशोधनकर्ते आणि लेखक परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत. त्यांच्या हिंदु धर्म, संस्कृती इत्यादी विषयांवरील संशोधनकार्याच्या एक लक्षांश तरी कार्य तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी केले आहे का ? ‘गाढवाला गुळाची चव काय ?’, अशा वृत्तीच्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये काय कळणार !’

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.१.२०१९)

 वाचकांना निवेदन

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF