राममंदिर आणि शबरीमला मंदिर यांविषयी भाजप अन् संघ परिवार यांची भूमिका मृदुंग दोन्ही बाजूने वाजवण्यासारखी !

दैनिक सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची टीका

मुंबई, ५ जानेवारी (वार्ता.) – राममंदिर आणि शबरीमला मंदिर या देशातील प्रमुख मंदिरांवरून लोकभावना तीव्र आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे, ‘राममंदिराचा प्रश्‍न न्यायालयातच सोडवू.’ दुसर्‍या बाजूला केरळमध्ये मंदिर आणि हिंदुत्व रक्षण यांसाठी संघ रस्त्यावर उतरला आहे; मात्र राममंदिराच्या प्रश्‍नी ते थंड आहेत. म्हणजे अयोध्येतील राममंदिरासाठी न्यायालयाकडे बोट दाखवायचे; मात्र शबरीमला मंदिरातील महिला प्रवेशाच्या वादाविषयी न्यायालयीन निर्णय झुगारून द्यायचा. राममंदिर आणि शबरीमला मंदिर यांविषयी भाजप अन् संघ परिवार यांची वेगवेगळी भूमिका म्हणजे मृदुंग  दोन्ही बाजूने वाजवण्यासारखी आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी ५ जानेवारीच्या ‘दैनिक सामना’मधील अग्रलेखातून केली आहे. राममंदिर आणि शबरीमला मंदिरांविषयीची भाजप आणि संघ यांची दुटप्पी भूमिका श्री. ठाकरे यांनी या अग्रलेखातून उघड केली आहे.

या अग्रलेखात श्री. ठाकरे यांनी पुढे म्हटले आहे की,

१. राममंदिरप्रश्‍नी अध्यादेश काढा. मंदिर बांधावे, ही लोकभावना आहे. ही लोकभावना मान्य करायला भाजप सरकार सिद्ध नाही; मात्र शबरीमला मंदिर प्रकरणात लोकभावनेस महत्त्व देत आहे. मोदी यांच्या बतावणीवर अमित शहा बोलत नाहीत आणि सरसंघचालक पुढे जात नाहीत.

२. भाजपचे दोन मित्र नितीशकुमार आणि रामविलास पासवान यांनी राममंदिरास संपूर्ण विरोध केला आहे. तरीही बिहारमध्ये भाजप नेतृत्वाने त्यांच्यापुढे गुडघे टेकले. राममंदिरासाठी बाजी लावणार्‍या शिवसेनेपुढे अहंकार आणि रामास विरोध करणार्‍यांपुढे शरणागती. वा रे हिंदुत्व !

३. शबरीमला मंदिरात महिला गेल्या, तर बिघडते काय ?, असे आव्हान रामविलास पासवान यांनी अमित शहा यांना दिले. तरीही मृदुंगाचा गजर चालूच आहे. हिंदुत्वाच्या नावावर सध्या जो खेळ चालू आहे, तसा काँग्रेसच्या राजवटीतही झाला नव्हता.

४. ‘शबरीमला मंदिरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य नाही. लोक स्वीकारतील असेच निर्णय द्यावेत’, असे मार्गदर्शन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देशाच्या न्यायव्यवस्थेस केले. हे मार्गदर्शन स्वीकारून सर्वोच्च न्यायालय राममंदिर निर्माणाविषयीचा निर्णय देणार असेल, तर प्रश्‍नच संपला.

५. केरळमध्ये जसे मंदिरप्रश्‍नी आंदोलन चालू आहे, तसे आंदोलन अयोध्याप्रकरणी करण्याचा भाजप आणि संघ यांचा मानस नाही. तसा काही हेतू असेल, तर त्यांनी आम्हास नक्की कळवावे. तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही राममंदिराची दुसरी लढाई लढण्यास सिद्ध आहोत.

६. केरळात साम्यवाद्यांची राजवट असल्याने तेथे भाजप, संघ मित्रमंडळ शबरीमला मंदिराच्या पावित्र्यासाठी शंख फुंकीत रस्त्यावर उतरले; मात्र केंद्र आणि उत्तरप्रदेश येथे हिंदुत्वनिष्ठ मोदी आणि योगी यांचे राज्य असल्याने शंख मुका झाला आहे.

७. हिंदुत्व पक्के असेल, तर जी भूमिका केरळमध्ये तीच राममंदिराविषयी घ्या. मृदुंग दोन्ही बाजूंनी वाजतो हे खरे; मात्र प्रत्येक थापेचा सूर वेगळा काढण्याची कला हिंदुत्वनिष्ठ मतदार सध्या अनुभवीत आहेत.

८. राममंदिराचा प्रश्‍न न्यायालयात कसा सुटणार आहे ? मुळात न्यायालयाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा विषय नाही. ४ जानेवारीला सुनावणी होणार म्हणून सगळेच खुशीत होते; मात्र न्यायालयाने ६० सेकंदांत पुढचा दिनांक देऊन सगळ्यांना निराश केले. अध्यादेशाची मागणी का होत आहे, हे आता तरी मोदी यांना समजायला हवे.

९. राज्य रामाने दिले; पण रामाचा वनवास संपवायचे धारिष्ट्य  आमच्यात नाही. काँग्रेस सत्तेवर होती; म्हणून राममंदिर उभे रहात नव्हते. आता मोदी सत्तेवर आहेत आणि मंदिर उभारता येत नसल्याचे खापर ते काँग्रेसवर फोडत आहेत. याचा दुसरा अर्थ असा की, तुम्हाला राज्य करणे जमले नाही आणि संघाला घोड्यास लगाम घालणे जमले नाही; म्हणून केरळात एक आणि अयोध्येत दुसरेच, असा तमाशा चालू आहे.


Multi Language |Offline reading | PDF