महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’त ठाणे येथील प्रदीप चिटणीस यांनी शास्त्रीय गायन सादर केल्यावर प.पू. देवबाबा यांनी काढलेले गौरवोद्गार, आश्रमातील गाय आणि वृक्ष यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद अन् भक्तांना आलेल्या अनुभूती !

संगीत सदर ईश्‍वरप्राप्तीसाठी कला

‘संगीत आकाशतत्त्वाशी संबंधित आहे; म्हणून पृथ्वी, आप, तेज आणि वायू या तत्त्वांशी संबंधित असलेल्या कलांपेक्षा संगीताशी संबंधित अनुभूती वरच्या स्तराच्या असतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१६.१२.२०१८ या दिवशी प.पू. देवबाबा यांच्या किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’त महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ठाणे येथील श्री. प्रदीप चिटणीस यांनी शास्त्रीय गायन सादर केले. कायर्र्क्रमाचा आरंभ श्री. चिटणीस यांनी सकाळच्या प्रहराचा राग अहीरभैरव गाऊन केला. त्यानंतर ‘दरबारी कानडा’ या रागाचे गायन आणि याच रागातील ‘सुख के सब साथी…’ हे भजन म्हटले. त्यांनी कार्यक्रमाची सांगता ‘तब मैं जानकीनाथ कहाऊँ…।’ या भैरवीने केली. कार्यक्रमात श्री. चिटणीस यांच्या गायनाला श्री. गिरिजय प्रभुदेसाई यांनी तबल्यावर साथसंगत केली. या कार्यक्रमाला ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’चे संस्थापक प.पू. देवबाबा यांची वंदनीय उपस्थिती लाभली. प.पू. देवबाबा यांचे काही भक्तही या वेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी प.पू. देवबाबा यांनी श्री. प्रदीप चिटणीस आणि श्री. गिरिजय प्रभूदेसाई यांचा शाल अन् फळे देऊन सत्कार केला.

श्री. प्रदीप चिटणीस यांचा सत्कार करतांना प.पू. देवबाबा
शास्त्रीय गायन सादर करतांना श्री. प्रदीप चिटणीस

१. प.पू. देवबाबा यांनी श्री. प्रदीप चिटणीस यांच्या गायनाच्या संदर्भात काढलेले गौरवोद्गार !

प.पू. देवबाबा म्हणाले, ‘‘आजचा कार्यक्रम एवढा छान झाला की, मी शब्दांतून त्याविषयी काही बोलूच शकत नाही. आज तुम्ही गायलेल्या ‘अहीरभैरव’ या राग-गायनातून तुमच्या अंतरंगातील संगीतच बाहेर आले आहे. भैरवी रागातील तुमचे सूर पुष्कळ छान लागले होते. तुमच्या भैरवीच्या स्वरांनी आज्ञाचक्रावर अती सूक्ष्म स्तरावर कार्य केले. तारसप्तकातील तुमचे स्वर तर अधिक सूक्ष्म स्तरावर कार्य करत होते. तुमचे सूर माझ्या उजव्या मेंदूपर्यंत जात होते. असे प्रत्येक गायकाला जमत नाही. या ठिकाणी साक्षात सरस्वतीदेवीच गात होती. अशी भैरवी मी यापूर्वी कधीच ऐकली नव्हती. एका प्रसिद्ध गायकांपेक्षाही मला हे गायन प्रभावी जाणवले. तुम्हाला प्रभु श्रीरामाचा आशीर्वाद आहेच.’’

२. गायनाच्या वेळी आश्रमातील गायींनी आणि परिसरातील वृक्षाने दिलेला प्रतिसाद !

२ अ. गायन चालू असतांना आश्रमातील गायींनी आनंदाने हंबरून प्रतिसाद देणे : श्री. चिटणीस यांचे गायन चालू झाल्यापासून संपूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत आश्रमातील गायी अधून मधून हंबरून प्रतिसाद देत होत्या. मागील मासात याच ठिकाणी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने नृत्याचा कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमाची वेळही सकाळचीच होती; परंतु त्या वेळी मात्र गायींनी ध्यान लावले होते.

२ आ. अहीरभैरव रागाचे गायन चालू असतांना एका झाडाची एकच फांदी आनंदाने डोलून प्रतिसाद देत असल्याचे जाणवणे : ‘अहीरभैरव’ या रागाचे गायन चालू असतांना वारा वहात नव्हता, तरीही ‘एका झाडाची एकच फांदी आनंदाने डोलत आहे’, असे जाणवले. श्री. चिटणीसकाका आलाप घेत असतांना त्या झाडाची ठराविक पानेच हलतांना दिसत होती. तेथे उपस्थित असलेल्या तीन साधिकांचे एकाच झाडाकडे वेगवेगळ्या वेळी लक्ष गेले. त्याच वेळी चित्रीकरण करणार्‍या साधकालाही त्या एकाच झाडाचे चित्रीकरण करावेसे वाटले. ते झाड खरोखरच अहीरभैरव रागाला प्रतिसाद देत असल्याची प्रचीती येत होती.

३. शास्त्रीय गायनाच्या वेळी प.पू. देवबाबा यांच्या भक्तांना आलेल्या अनुभूती

३ अ. गायनामुळे गाढ ध्यान लागले ! : ‘ध्यान लावण्याच्या दृष्टीने हे गायन अतिशय सुंदर होते. ध्यानात खोलवर जाण्यासाठी या गायनाचा पुष्कळ लाभ झाला. इतके गाढ ध्यान मी पहिल्यांदाच अनुभवले. या कार्यक्रमात येण्याची संधी मिळाल्याने मला आनंद झाला.’ – कु. जयराम पुजारी, ता. ब्रह्मावर, उडुपी, कर्नाटक.

३ आ. ध्यानधारणेसाठी उत्कृष्ट कार्यक्रम : ‘हा कार्यक्रम ध्यानधारणेसाठी उत्कृष्ट होता. संगीतामुळे आज माझे ध्यान अधिक चांगल्या प्रकारे लागले. त्यासाठी तुम्हा सर्वांना आणि प.पू. गुरुजींना हृदयपूर्वक धन्यवाद !’ – एक भक्त

३ इ. ‘मला आरंभापासून शेवटपर्यंत गाढ ध्यान लागून आनंद मिळाला. हा आनंद शब्दांत वर्णन करणे अवघड आहे.’ – एक भक्त

– कु. तेजल पात्रीकर, संकलक, संगीत विभाग, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, सनातन आश्रम, गोवा. (२४.१२.२०१८)

शास्त्रीय गायन अनुभवतांना प.पू. देवबाबांची भक्त बिपुला

प.पू. देवबाबांच्या न्यूयॉर्क, अमेरिका येथील संगीतप्रेमी भक्त बिपुला यांनी श्री. प्रदीप चिटणीस यांच्या गायनाचे केलेले कौतुक आणि भारतीय शास्त्रीय संगीताची केलेली प्रशंसा !

१. अहंविरहित आणि आत्मानंद देणारे गायन !

‘श्री. प्रदीप चिटणीस यांच्या शास्त्रीय गायनाचा आजचा हा कार्यक्रम अहंविरहित आणि संपूर्ण ध्यानाची अनुभूती येऊन आत्मानंद देणारा होता. ‘त्यांच्या प्रत्येक स्वरात एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. त्यामुळे ते स्वर हृदयाला भिडून अंतरात्म्यापर्यंत पोचत आहेत’, असे मला जाणवत होते. प्रत्येक स्वर ध्यानाच्या उच्च अवस्थेला घेऊन जात होता. आमच्याकडे (न्यूयॉर्क येथे) बरेच प्रसिद्ध भारतीय गायक आणि वादक यांचे कार्यक्रम झाले आहेत; परंतु अहंशून्य अवस्थेतील असे गायन मला इथेच अनुभवायला मिळालेे.

२. अंतरात्म्यापर्यंत पोहोचणारे भारतीय संगीत आणि मनाची अस्वस्थता वाढवणारे पाश्‍चात्त्य संगीत !

मी संगीतप्रेमी आहे. पाश्‍चात्त्य संगीत हे मनाला उत्तेजना देणारे असते. ते ऐकतांना मजा येते; परंतु त्याचा मनावर अधिक काळ सकारात्मक परिणाम रहात नाही. ते उत्तेजनात्मक किंवा कर्कश असल्यामुळे मनाची अस्वस्थता वाढते. भारतीय शास्त्रीय संगीत चांगले असून ते अंतरात्म्यापर्यंत पोहोचते आणि या संगीताचा मनावर सकारात्मक प्रभाव होतो. त्यामुळे संपूर्ण मानवजातीने, विशेष करून लहान मुलांनी हे संगीत अवश्य ऐकायला हवे.’

– बिपुला (प.पू. देवबाबांची एक भक्त), न्यूयॉर्क, अमेरिका. (२४.१२.२०१८)

सूक्ष्म स्तरावरील घडामोडींचे आकलन होण्यासाठी व्यक्तीने स्वतःची साधना वाढवणे आवश्यक !

‘संगीतातील विविध रागांचा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अनुभवण्यासाठी स्वतःची साधना असणे आवश्यक आहे. हा अभ्यास सूक्ष्म स्तरावरील असल्याने सूक्ष्मातील घडामोडी अनुभवण्यासाठी साधनेत प्रगती करणे महत्त्वाचे आहे.

समाजातील साधारण ८० टक्के लोकांना आध्यात्मिक स्वरूपाचा, उदा. वाईट शक्ती, अतृप्त पूर्वज यांचा त्रास असतो. या त्रासामुळे व्यक्तीला सूक्ष्मातील गोष्टी अचूक कळण्यात वाईट शक्तींचा अडथळा येऊ शकतो. त्यामुळे सूक्ष्म स्तरावरील अनुभव येण्यासाठी वाईट शक्तींच्या त्रासाचे प्रमाण न्यून करण्यासह साधनेत प्रगती करणेही महत्त्वाचे आहे.

यासाठी साधनेच्या आरंभीच्या टप्प्याला आपल्या कुलदेवतेचा नामजप, उदा. श्री रेणुकादेवी कुलदेवी असल्यास ‘श्री रेणुकादेव्यै नमः ।’ किंवा कुलदेवता ठाऊक नसल्यास ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ असा नामजप अधिकाधिक करावा. यासमवेत पूर्वजांच्या त्रासापासून रक्षण होण्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप दिवसभरात ४५ मिनिटे करावा. याप्रमाणे नामजप केल्याने साधना वाढल्यावर व्यक्तीला सूक्ष्मातील घडामोडींविषयी थोडे थोडे कळायला लागते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत.त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.


Multi Language |Offline reading | PDF