हॉटेलच्या महागड्या दरांमुळे गोवा हे एक महागडे पर्यटनस्थळ म्हणून अपकीर्त ! – मनोहर आजगावकर, पर्यटनमंत्री

पणजी, ४ जानेवारी (वार्ता.) – हॉटेलच्या महागड्या दरांमुळे पर्यटन क्षेत्रात गोवा हे एक महागडे पर्यटनस्थळ म्हणून अपकीर्त होत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी शासन टुरिस्ट ट्रेड कायद्यात पालट करून हॉटेलमधील खोलीचे भाडे आकारण्यावर नियंत्रण आणणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी दिली आहे. नुकत्याच झालेल्या नाताळाच्या हंगामात गोव्यात देशी आणि विदेशी पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर गोवा शासन या वेळी झालेल्या चुका सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. या पार्श्‍वभूमीवर पर्यटनमंत्री आजगावकर यांनी ही माहिती दिली.

मंत्री आजगावकर पुढे म्हणाले, जी उपाहारगृहे खाद्यपदार्थांवर अधिक किंमत आकारतात त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नाताळाच्या हंगामात एका हॉटेलने एका खोलीसाठी एका रात्रीचे भाडे ६० ते ७० सहस्र रुपये आकारले आहे. यामुळे गोव्याबाहेर पर्यटनक्षेत्रात गोव्याविषयी चुकीचा संदेश जात आहे. हा प्रकार थांबवला पाहिजे. पंचतारांकित हॉटेलच्या महाव्यवस्थापकांची एक बैठक घेऊन याविषयी निर्णय घेण्यात येणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF