महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली संभाजीनगर येथील चि. निविका निखिल तिवारी !

मार्गशीर्ष कृष्ण पक्ष त्रयोदशी (३.१.२०१९) या दिवशी रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ सेवा करणार्‍या डॉ. आरती तिवारी यांची भाची (भावाची मुलगी) संभाजीनगर येथील चि. निविका निखिल तिवारी हिचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त संभाजीनगर येथे रहाणारी तिची आई सौ. निधी तिवारी आणि आजी सौ. सविता तिवारी यांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. गरोदरपण

१ अ. गर्भधारणेनंतर उभयतांतील भांडणे न्यून होणे : ‘लग्न झाल्यापासून आम्हा उभयतांत प्रतिदिन भांडण होत असे. मला गर्भधारणा झाल्यानंतर आमची भांडणे न्यून झाली. गर्भधारणेनंतर त्यांच्यात पुष्कळ पालट झाला आणि त्यांच्या मनात माझ्याविषयी असलेल्या शंका-कुशंका, राग-द्वेष आदी कायमचे नष्ट झाले.

१ आ. देवाधर्माची ओढ लागणे

१ आ १. धार्मिक ग्रंथांचे वाचन करणे : लग्नाआधी मी क्वचितच देवासमोर बसत असे; मात्र गर्भधारणा झाल्यावर मला ‘देवाचे काहीतरी वाचावे किंवा कुणीतरी मला वाचून दाखवावे’, असे वाटू लागले. तेव्हापासूनच मी अध्यात्माकडे वळले. मी ‘श्रीरामरक्षा स्तोत्र’ म्हणत असे, तसेच ‘सुंदरकांड’ सारख्या ग्रंथांचे वाचन करत असे.

१ आ २. मंदिरात जाणे : मला आधी मंदिरात जायला आवडत नव्हते; परंतु गर्भधारणेनंतर मला मंदिरात गेल्यावर प्रसन्न वाटत असे.

१ आ ३. सतत नामस्मरण करणे : माझे लग्न झाल्यावर सासूबाईंनी मला नामस्मरणाचे महत्त्व सांगितलेे; परंतु गर्भधारणा झाल्यावर मला त्याचे महत्त्व समजले. तेव्हापासून मी नामस्मरण करू लागले. नामस्मरणामुळे मला अनेक अनुभूती आल्या.

१ आ ४. सेवेचे महत्त्व लक्षात येणे : ‘सासूबाई सेवा करतात’, हे बघून आरंभी मला राग यायचा; पण गर्भधारणेनंतर मला अनेक अनुभूती आल्यावर सेवा करण्याचे महत्त्व माझ्या लक्षात आले.

२. जन्म

मला प्रसुतीवेदना होत असतांना मी सतत श्रीपाद श्रीवल्लभ यांचे नामस्मरण करत होते. तेव्हा मला रुग्णालयातील प्रत्येक लादीवर दत्तगुरूंचे दर्शन होत होते. त्या वेळी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण करून प्रार्थना करत होते. गुरुकृपेने माझी नैसर्गिक प्रसूती झाली.’

– सौ. निधी तिवारी (आई)

३. जन्मानंतर

३ अ. जन्म ते दीड वर्ष

३ अ १. देवाची ओढ

अ. ती ५ मासांची असतांना आम्ही तिला ‘जय श्रीकृष्ण’ म्हणून आमच्याकडे असलेल्या राधाकृष्णाच्या प्रतिमेकडे बोट दाखवायचो. तेव्हा ती खदखदून हसत असे.

आ. आम्ही सद्गुरूंचा जयघोष केल्यावर ती बराच वेळ हसत असे.’

– सौ. तिवारी (आजी) आणि सौ. निधी तिवारी

इ. ‘एकदा आम्ही तिला आमच्या शेजार्‍यांकडे घेऊन गेलो होतो. त्यांच्या देवघरातील कृष्णाची मूर्ती बघून तिने ‘जय श्रीकृष्ण’ असे म्हणून मूर्तीसमोर डोके टेकवून नमस्कार केला. हे पाहून मला आश्‍चर्यच वाटले.’ – सौ. निधी तिवारी

३ आ. वय – दीड ते ३ वर्षे

३ आ १. आनंदी आणि उत्साही : ‘तिचा तोंडवळा तेजस्वी असून ती आनंदी आणि उत्साही असते. आम्हाला तिचा सहवास हवाहवासा वाटतो.

३ आ २. व्यवस्थितपणा : ती तिचे साहित्य त्या त्या जागेवरच ठेवते. ती शाळेतून किंवा बाहेरून घरी आल्यावर पादत्राणे आणि मोजे लगेच जागेवर ठेवते.

३ आ ३. शांत आणि समंजस स्वभाव : तीला कोणतीही गोष्ट समजावून सांगितल्यावर ती लक्षपूर्वक ऐकते. तिला भूक लागली असली आणि तिचा खाऊ बनवायला वेळ लागत असेल, तरी ती शांत रहाते.

३ आ ४. उत्तम स्मरणशक्ती आणि निरीक्षणक्षमता : एक वर्षापूर्वी घडलेल्या गोष्टींची ती आठवण करून देते. मोठ्या व्यक्तींनी केलेली प्रत्येक कृती ती लक्षपूर्वक पहाते आणि तशी कृती करण्याचा प्रयत्न करते.

३ आ ५. स्पष्ट उच्चार करणे : ती प्रत्येक शब्दाचा स्पष्ट उच्चार करते. मी एखाद्या शब्दाचा उच्चार अयोग्य रितीने केल्यास ती मला ‘योग्य उच्चार कसा करायचा ?’, ते सांगते.

३ आ ६. कौतुकाने हुरळून न जाणे : तिची कितीही प्रशंसा किंवा कौतुक केले, तरी ती हुरळून जात नाही.

३ आ ७. सतर्कता

अ. ‘निविका खेळण्यात मग्न आहे’, असे वाटते; परंतु तिचे सगळीकडे लक्ष असते. ती खेळत असतांना आईला काही गोष्टींची आठवणही करून देते.

आ. एक दिवस आमचे ‘हनुमान चालिसा’ म्हणून झाल्यानंतर तिने कनकला (आतेबहिणीला) विभूती लावली नाही. तिला याचे कारण विचारले असता तिने सांगितले, ‘‘तिने आज पाठ वाचला नाही; म्हणून तिला विभूती लावली नाही.’’

३ आ ८. देवाची ओढ

अ. ती कधीकधी देवाला चंदन लावते आणि आरती म्हणते. ती देवाला साष्टांग दंडवत घालते.

आ. आम्ही प्रतिदिन हनुमान चालीसा म्हणतो. प्रत्येक दिवशी पाठ म्हणण्याची वेळ झाल्यावर ती सर्वांना पाठ म्हणण्याची आठवण करून देते. ती सर्वांना पुस्तिका वाटते. पाठ संपल्यावर ती सर्वांना विभूती लावते. आता तिला त्यातील बर्‍याच ओळी मुखोद्गत झाल्या आहेत.

इ. तिचे बरेच संस्कृत श्‍लोक मुखोद्गत झाले आहेत. ती आमच्यासह आनंदाने श्‍लोक म्हणते.

ई. आम्ही नवनाथांच्या मंदिरात गेलो होतो. होमहवन, आरती आणि महाप्रसाद ग्रहण करणे, यांसाठी आम्हाला २ – ३ घंटे रखरखत्या उन्हात थांबावे लागले. तेव्हा इतके उन असूनही ती शांतपणे खेळत होती.

३ आ ९. भाव : तिने साखर मागितल्यावर तिच्या आजोबांनी तिला देवापुढे ठेवलेल्या वाटीतील साखर खाण्यास सांगितली. तेव्हा ती त्यांना म्हणाली, ‘‘भगवान नाराज हो जाएंगे उनकी शक्कर लेने से ।’’

४. निविकाचे स्वभावदोष

राग येणे आणि हट्टीपणा.

– सौ. सविता तिवारी (कु. निविकाची आजी) आणि सौ. निधी तिवारी (कु. निविकाची आई), संभाजीनगर (डिसेंबर २०१८)


Multi Language |Offline reading | PDF