प्रसिद्धीमाध्यमांनी समाजाला दिशादर्शक व्हावे !

नोंद

ख्रिस्ती वर्ष २०१८ ची समाप्ती आणि १ जानेवारीला ख्रिस्ती नववर्षाचा प्रारंभ याविषयीच्या बातम्या जवळजवळ सर्वच वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात आल्या. ख्रिस्ती नववर्षाचे उदात्तीकरण करतांना ‘भारतीय संस्कृतीनुसार नववर्षारंभ हा चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी होतो. सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा आहे आणि अशी आपली महान संस्कृती आहे’, याचे भान एकाही वृत्तवाहिनीने ठेवलेे नाही. एखाद्या घटनेचे वृत्त प्रसारित करतांना केवळ ते तटस्थपणे दाखवणे, ही पत्रकारिता नसून त्याचा समाजावर होणार्‍या परिणामांची जाणीवही ठेवायला हवी आणि घातक परिणामांविषयी जागृतही असायला हवे. अशा प्रकारे समाजहित जपणारी पत्रकारिता खर्‍या अर्थाने समाजाला दिशादर्शक ठरू शकेल. वृत्तवाहिन्यांनी काय दाखवायचे आणि काय दाखवू नये, हा वृत्तस्वातंत्र्याचा त्यांचा अधिकार आहे; मात्र समाजहिताला बाधा येणार नाही, याची सूचकता प्रसिद्धीमाध्यमांनी ठेवायला हवी. अन्यथा दिशादर्शक ठरण्याऐवजी पत्रकारिताच समाजाला भरकटवेल.

बहुतांश शिक्षित हिंदूंची मानसिकता ‘अन्य धर्मांचाही आदर आपण ठेवायला हवा. केवळ स्वत:च्या संस्कृतीचा अभिमान बाळगणे हे संकुचितपणाचे लक्षण आहे. त्यामुळे आपण जगासमवेत चालायला हवे’, अशी असते. वरवर पाहिले, तर हे योग्य वाटते. दुसर्‍या बाजूला पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष मंडळी हिंदूंना बुरसटलेल्या विचारांचे ठरवायला टपलेलीच आहेत. यामध्ये अन्य धर्मीय त्यांच्या धर्माप्रमाणे आचरण करतात; मात्र धर्मशिक्षण मिळत नसल्यामुळे हिंदु समाज पुरता संभ्रमित होऊन जातो. येथे हिंदूंनी हे लक्षात घ्यायला हवे की, संस्कृती आणि राष्ट्रप्रेम यांचा जवळचा संबंध आहे. संस्कृती राष्ट्राच्या अस्मितेशी निगडीत असते. जो स्वत:च्या संस्कृतीचे पालन करतो, तो त्या मातृभूमीशीही एकनिष्ठ असतो. उलट कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी मुले केवळ भारतीय संस्कृतीपासून दूर जातात एवढेच नाही, तर त्यांच्या मनात भारतीय संस्कृतीविषयी तिरस्कार निर्माण होतो, पाश्‍चात्त्यांचे आकर्षण वाढते म्हणजेच त्यांच्या मनातील राष्ट्रीय अस्मिता लोप पावते. हा गंभीर परिणाम प्रसारमाध्यमांनी ओळखावा. अन्य धर्माचा आदर करण्याचा गोंडस उपदेश करणार्‍यांनी उल्हासनगर येथे येऊन ख्रिस्ती मिशनर्‍यांनी दीड लाखाहून अधिक सिंधी लोकांचे आमीष दाखवून केलेले धर्मांतर प्रत्यक्ष डोळ्यांनी पहावे, काश्मीरपासून देशभरात धर्मांधांनी केलेल्या हिंदूंच्या हत्यांची नोंद घ्यावी, लव्ह जिहादद्वारे हिंदु युवतींच्या झालेल्या धर्मांतराची आकडेवारी पहावी आणि त्यानंतर संस्कृतीचे पालन करणार्‍या हिंदूंना उपदेशाचे डोस पाजावेत. प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींनी वृत्त प्रसारित करतांना राष्ट्रहिताची भूमिका सदैव जागृत ठेवून भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व समाजावर बिंबवल्यास खर्‍या अर्थाने पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ ठरेल.

– श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई


Multi Language |Offline reading | PDF