हिंदूंच्या धर्मभावनांना न्याय कधी ?

संपादकीय

मैसूरू येथील लेखक के.एस्. भगवान यांनी त्यांच्या‘राममंदिर का नको ?’ या कन्नड भाषेतील पुस्तकात हिंदूंचे परमश्रद्धेय असणारे भगवान श्रीराम यांचा ‘दारूडा’ आणि ‘मांसभक्षक’ असा उल्लेख केला आहे. या पुस्तकाच्या २ आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. यापूर्वीही त्यांनी हिंदु धर्म, हिंदूंचे धर्मग्रंथ, शंकराचार्य, हिंदूंच्या देवता यांवर अनेकदा टीका करून त्यांच्याविषयी आक्षेपार्ह आणि बेताल अशी विधाने केली आहेत. मैसूरूत मध्यंतरी आयोजित केलेल्या खाद्यसंस्कृतीविषयीच्या संमेलनात त्यांनी गोमांस खाल्ल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांनीही पाहिले होते. ‘भगवान’ या शब्दाची व्याख्या त्यांनी ‘लोकांना भयभीत करून आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध धर्मांच्या पुजार्‍यांच्या माध्यमातून केली गेलेली व्यवस्था’ अशी केली होती. एकूणच पहाता भगवान यांची संपूर्ण पार्श्‍वभूमीच हिंदूंच्या दृष्टीने वादग्रस्त आहे. साक्षात श्रीरामाविषयी अपशब्द वापरून हे भगवान महाशय हिंदु धर्माच्या जणू मुळावर उठले आहेत. नावात ‘भगवान’; मात्र तोंडी ‘भगवंता’विषयी अपशब्द वापरणार्‍या प्राध्यापक महाशयांच्या आई-वडिलांनाही त्यांच्या या नावाविषयी पश्‍चात्ताप होत नसेल का ? असो.

कर्नाटक सरकारचे दुर्लक्ष !

प्रत्येक वेळी प्रा. भगवान हिंदु धर्मावर टीका करतात, हिंदू त्यांना विरोध करतात, मग भगवान यांना अटक होते आणि काही दिवसांनी जामीनही मिळतो. त्यांच्या जामिनाला विरोधही होत नाही. बरे, बाहेर आल्यावर पुन्हा हे महाशय हिंदु धर्माविषयी अपशब्द उच्चारण्यास मोकळे ! हे नेहमीचेच झाले आहे. स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारी काँग्रेस मात्र त्यांच्यावर ठोस कारवाई कधीच करत नाही. उलट त्यांना त्यांच्या ‘उदात्त’ (?) विचारांसाठी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते, हे हिंदूंसाठी संतापजनकच आहे. ‘हिंदूंवर टीका केल्यास पुरस्कार मिळतात’, हे धर्मद्रोह्यांना ठाऊक झाल्याने तेही वारंवार अशी टीका करण्यास धजावतात. सर्वधर्मसमभाव जोपासणार्‍या भारतात हिंदूंच्या पदरी मात्र निराशा, अवमान आणि टीकाच पडते, हे दुर्दैवी आहे. के.एस्. भगवान यांच्या विरोधात हिंदूंनी आतापर्यंत अनेकदा आंदोलने केली, पोलीस-प्रशासनाला निवेदनेही दिली; पण खेदाची गोष्ट म्हणजे भगवान यांच्यावरील कारवाईच्या हिंदूंच्या मागणीकडे सरकारने मात्र प्रत्येक वेळी दुर्लक्षच केले. ना आंदोलनांना दाद दिली गेली, ना निवेदनांची नोंद घेतली, पुन्हा पदरी घोर निराशाच ! हे कुठवर चालणार आहे ? यावर आळा घालायला नको का ? मध्यंतरी काँग्रेसचे राहुल गांधी यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याने कर्नाटकातील हिंदूंच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेवर असल्याने तेथे भगवान यांच्यासारख्या हिंदुद्रोह्यांवर आतातरी कारवाई होईल, असे हिंदूंना वाटले होते. कालांतराने त्यांच्या मंदिरप्रवेशामागील मतपेटीच्या राजकारणाचा प्रत्यय आल्याने पुन्हा हिंदू एकटे पडले. हिंदूंच्या पाठीशी उभे रहाणार तरी कोण ?

‘जय श्रीरामा’चा हुंकार आणि प्रखर धर्माभिमान हवा !

हिंदूंनो, तुमच्या या दुःस्थितीचाच अपलाभ घेत भगवान यांच्यासारखे साम्यवादी श्रीरामाविषयी अपशब्द वापरून हिंदुद्वेषाचा कंड शमवून घेतात. देशात अजूनही श्रीरामाचे मंदिर बांधले जात नाही. केवळ घोषणा आणि अध्यादेश यांच्या कचाट्यातच भगवान श्रीराम अडकले आहेत. त्यामुळे राममंदिराचे पुनर्निर्माण ही तर दूरचीच गोष्ट आहे. असे जरी असले, तरी ‘केवळ भगवान श्रीरामच आपले तारणहार आहेत’, अशी समस्त रामभक्तांची ठाम श्रद्धा आहे. या श्रद्धेच्या बळावरच कर्नाटकातील हिंदूंनीच नव्हे, तर भारतभरातील सर्वच हिंदूंनी, पर्यायाने रामभक्तांनी संघटितपणे वैध मार्गाने लढा देण्याची आवश्यकता आहे. निद्रिस्त हिंदूंनी जागे व्हायला हवे. ‘जय श्रीराम’ असा धर्मरक्षणासाठीचा हिंदूंचा निनाद सर्वत्र घुमायला हवा. या हुंकारातच धर्मद्रोह्यांच्या उरात धडकी भरवण्याचे सामर्थ्य आहे. तसे झाल्यासच श्रीराम, हिंदु धर्म यांविषयी होणारी आक्षेपार्ह विधाने थांबतील ! आज अनेकांकडून ‘भारत देश असहिष्णू होत चालला आहे. हिंदू आज असहिष्णू झाले आहेत’, अशा प्रकारची ओरड केली जाते; पण खर्‍या अर्थाने ‘सहिष्णू आहे तरी कोण’, तर याचे उत्तर ‘हिंदू’ असेच म्हणता येईल. सहिष्णू हिंदूंकडून कोणतीही ‘विशेष’ प्रतिक्रिया येणार नाही, हे ठाऊक असल्यानेच भगवान यांच्यासारखे लोक हिंदु धर्मावर गरळओक करून मोकळे होतात. हे वास्तवही हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे.

‘सुवर्ण टीव्ही’च्या वृत्तवाहिनीचे संपादक अजित हनुमक्कनवार यांनी एका कार्यक्रमात इस्लामचे संस्थापक महंमद पैगंबर यांच्याविषयी अनुचित शब्दांचा कथित वापर केल्यावर अनेक मुसलमान आणि मुसलमान संघटना आक्रमक झाल्या. शेवटी संपादकांना वृत्तवाहिनीवरून जाहीर क्षमायाचना करावी लागली. येशू ख्रिस्ताविषयी आक्षेपार्ह विधाने केली गेली असती, तर संपूर्ण ख्रिस्ती समाजही रस्त्यावर उतरला असता. हिंदूंमध्येही असा प्रखर धर्माभिमान असता, तर भगवान महाशयांना सर्वांसमक्ष जाहीर क्षमायाचना करावी लागली असती. अजूनही वेळ गेलेली नाही. श्रीरामाच्या अवमानप्रकरणी भगवान यांच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे. त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होईपर्यंत हिंदूंनी हे प्रकरण लावून धरणे, हे खर्‍या अर्थाने धर्मरक्षण ठरेल !


Multi Language |Offline reading | PDF