६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या साधकांनी व्यक्त केलेले मनोगत आणि त्यांच्याविषयी संत, कुटुंबीय अन् साधक यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये !

‘३ जानेवारी या दिवशी ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या (एस्.एस्.आर्.एफ्.च्या) वार्षिक आंतरराष्ट्रीय शिबिराला रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात प्रारंभ झाला. त्या वेळी प्रीतीस्वरूप आणि अध्यात्मप्रसाराची तळमळ असणार्‍या अमेरिकेतील साधिका सौ. शिल्पा कुडतरकर (वय ४८ वर्षे) संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सर्वांना देण्यात आली. तसेच ऑस्ट्रिया येथील चि. नारायण डूर् (वय २ वर्षे), त्याची आई सौ. लवनिता डूर् (वय २३ वर्षे), इंडोनेशिया येथील श्री. फ्रान्सिकस बुडाअजी (वय २६ वर्षे), फ्रान्स येथील श्री. गियोम ऑलिव्हिए (वय २५ वर्षे), कॅनडा येथील श्री. अ‍ॅलन हार्डि (वय ५२ वर्षे) आणि सिंगापूर येथील श्री. व्हिन्सेंट मलहेर्बे (वय ३८ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता देण्यात आली. त्याविषयीचा सविस्तर वृत्तांत येथे देत आहोत.

डावीकडून बसलेले सद्गुरु सिरियाक वाले, पू. (सौ.) योया वाले, पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर, पू. (सौ.) भावना शिंदे आणि पू. रॅन्डी इकारांतियो. डावीकडून उभे असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले श्री. अ‍ॅलन हार्डि, श्री. फ्रान्सिकस बुडाअजी, सौ. लवनिता डूर्, त्यांच्या कडेवर असलेला चि. नारायण डूर्, श्री. गियोम ऑलिव्हिए आणि श्री. व्हिन्सेंट मलहेर्बे

१. ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा ऑस्ट्रिया येथील चि. नारायण डूर् (वय २ वर्षे) याची त्याच्या कुटुंबियांनी सांगितलेली वैशिष्ट्ये !

१ अ. चि. नारायण याच्या जन्मानंतर साधनेच्या प्रयत्नांना गती मिळाली ! – सौ. लवनिता डूर् (चि. नारायण याची आई)

मी गरोदर असतांना पोटातील बाळाच्या हालचाली मला आनंद देत असत. सत्संगात असतांना बाळ अजिबात हालचाल करत नसे. त्यामुळे बाळ मला एक प्रकारे सत्संगात सहभागी होण्यास साहाय्य करत असे. प्रसुतीच्या वेळी माझा नामजप सहजपणे चालू झाला. नारायणचा जन्म झाल्यानंतर त्याच्या तोंडवळ्यावर हास्य होते. तो ५ मासांचा असतांना श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून त्याच्याशी बोलत असे. त्याच्या जन्मानंतर माझ्या साधनेच्या प्रयत्नांना गती मिळाली.

१ आ. चि. नारायणसमवेत असतांना नामजप सहजपणे चालू होतो ! – श्री. अद्रियन डूर् (चि. नारायण याचे वडील)

नारायण नेहमी आनंदी असतो. त्याच्यासमवेत असतांना नामजप सहजपणे चालू होतो. तो लहान वयातही प्रगल्भ आहे. रामनाथी येथील आश्रमात तो प्रथमच आला आहे; मात्र तो सहजपणे येथे रमून गेला.

१ इ. चि. नारायण याच्यात इतरांना देण्याचा गुण आहे ! – मार्गेट निकोलेडस (चि. नारायण याची आजी)

नारायण याच्या जन्मानंतर घरातील सर्वांना खूप आनंद झाला. इतरांना होणारा त्रास त्याला पहावत नाही. त्याच्या समवेत असलेली लहान मुले रडत असल्यास तो त्याच्याकडील खेळणी त्या मुलांना देतो.

२. स्वभावदोष निर्मूलन आणि भावजागृती यांसाठी सातत्याने प्रयत्न करणार्‍या ऑस्ट्रिया येथील सौ. लवनिता डूर् !

सौ. लवनिता डूर् यांनी ६१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठल्याचे पू. शिल्पाताई यांनी घोषित केले.

२ अ. ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे कळल्यावर मी स्थिर आहे ! – सौ. लवनिता डूर्

६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता कळल्यावर मला ना आनंद झाला, ना दुःख झाले. मी स्थिर आहे. पूर्वी ‘६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठायला हवी’, असा विचार माझ्या मनात येत असे. त्या वेळी सद्गुरु सिरियाकदादा यांनी मला प्रयत्नांकडे लक्ष द्यायला सांगितले. ‘६१ टक्के पातळी गाठणे’, हीसुद्धा एक प्रकारची अपेक्षाच झाली. त्यामुळे कुठलीच अपेक्षा न ठेवता अखंड प्रयत्न करत राहिले. ‘माझ्यात श्रीकृष्ण आहे’, अशी मला जाणीव होते. आता साधकांमध्येही मला श्रीकृष्ण दिसतो.

२ आ. सौ. लवनिता यांनी स्वतःला पालटण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले ! – श्री. अद्रियन डूर् (सौ. लवनिता यांचे पती)

सौ. लवनिता यांनी स्वतःला पालटण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. त्यांना अनेक अडचणी आल्या; मात्र त्यावर त्यांनी लढून मात केली. एकाच वेळी पत्नी आणि मुलगा यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याने मी आनंदी आहे आणि स्वतःला भाग्यवान समजतो.

२ इ. कठोर साधना केल्यामुळेच सौ. लवनिता यांच्यात पालट झाला ! – मार्गेट निकोलेडस (सौ. लवनिता यांच्या आई)

सौ. लवनिता हिने वयाच्या पंधराव्या वर्षी साधनेला आरंभ केला. असात्त्विक कपडे न वापरण्याविषयी कळल्यावर तिने तसे कपडे परिधान करणे सोडून दिले. स्वभावदोषांचे निर्मूलन करण्यासाठी ती सतत प्रयत्न करत राहिली. आज देवाने तिला त्याचे फळ दिले आहे.

२ ई. सौ. लवनिता यांच्यातील स्थिरता, हे त्यांच्या प्रगतीचे द्योतक ! – पू. (सौ.) भावना शिंदे

६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्यावर सौ. लवनिता यांना आनंद झाला नाही. हे त्यांच्या प्रगतीचे द्योतक आहे. त्यांच्याकडे पाहिल्यावर ‘त्यांच्यात खूप भाव आहे’, हे लक्षात येते.

३. प्रेमभाव आणि शिकण्याची वृत्ती असणारे कॅनडा येथील अ‍ॅलन हार्डि !

३ अ. साधनेमुळे सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या आहेत ! – श्री. अ‍ॅलन हार्डि

मागील ६ मास मला रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात रहाण्याची संधी मिळाली. हा आनंददायी अनुभव होता. सद्गुरु सिरियाकदादांनी मला राग या दोषावर मात करण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. त्यानुसार प्रयत्न केल्यावर लाभ झाला. साधनेमुळे सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या आहेत. परम पूज्य आम्हाला पुढे घेऊन जात आहेत. देवाने आम्हाला त्यांच्याशी जोडून ठेवल्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो.

३ आ. श्री. अ‍ॅलन हे आतून शांत झाले आहेत ! – सौ. क्रिस्टन हार्डि (श्री. अ‍ॅलन हार्डि यांच्या पत्नी)

मागील काही मासांत ‘त्यांना राग येण्याचे प्रमाण उणावले आहे’, हे लक्षात आले. कुटुंबामध्ये काही मनासारखे न घडल्यास पूर्वी त्यांची चिडचिड होत असे; मात्र हल्ली ते स्थिर असतात. त्यांच्यात सकारात्मकता वाढली आहे.सौ. क्रिस्टन यांनीही यापूर्वी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे.

३ इ. ‘प्रेमभाव आणि शिकण्याची वृत्ती असल्यामुळेच श्री. अ‍ॅलन हार्डि यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली !’ – सद्गुरु सिरियाक वाले

४. आज्ञापालन करून प्रत्येक कृती त्वरित कृतीत आणणारे सिंगापूर येथील व्हिन्सेंट मलहेर्बे !

४ अ. गुरुदेवच सर्व काही करून घेत आहेत ! – व्हिन्सेंट मलहेर्बे

मी साधनेला आरंभ केला, तेव्हा मला जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त व्हायचे होते. ‘तो क्षण इतक्या लवकर येईल’, असे वाटले नव्हते. मी कुठलीही अपेक्षा न ठेवता सेवा करण्याचा प्रयत्न करतो. ईश्‍वरी राज्याची स्थापना होणारच आहे. जगभरात आपल्याला अध्यात्माचा प्रसार करायचा आहे. गुरुदेवांच्या कृपेमुळे तोही होणारच आहे. आपण मात्र त्या प्रवाहासमवेत रहाण्याचा प्रयत्न करायला हवा.

४ आ. श्री. व्हिन्सेंट यांनी अष्टांग साधना कृतीत आणल्यामुळे त्यांनी जलद प्रगती केली ! – सद्गुरु सिरियाक वाले

श्री. व्हिन्सेंट यांना एखादे सूत्र सांगितल्यास ते लगेच कृतीत आणतात. ते १०० टक्के आज्ञापालन करतात. त्यांनी अष्टांग साधना कृतीत आणल्यामुळे त्यांची जलद प्रगती झाली. त्यांच्यात सेवाभाव आहे. ते परिपूर्ण सेवा करतात. सिंगापूरमध्ये अध्यात्मावर विविध ठिकाणी व्याख्याने घेण्याचे नियोजन होते. व्याख्यानाची सर्व सूत्रे त्यांना ठाऊक होती, तरीही ते पुनःपुन्हा व्याख्यानाचा सराव करत होते. यातून त्यांचा परिपूर्ण सेवा करण्याचा ध्यास दिसून येतो.

 ४ इ. श्री. व्हिन्सेंट यांच्यात प्रत्येक कृती साधना म्हणून करण्याचा ध्यास आहे ! – सौ. श्‍वेता क्लार्क

श्री. व्हिन्सेंट यांच्यासारखे साधक विरळ असतात. ते जीवनातील प्रत्येक कृती साधना म्हणून करतात. ते प्रत्येक गोष्ट सात्त्विक आणि परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. एखादी कृती परिपूर्ण होण्यासाठी ते सतत इतरांना विचारून घेतात आणि त्याप्रमाणे कृती करतात.

५. साधना करता यावी, यासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे फ्रान्स येथील गियोम ऑलिव्हिए !

५ अ. इतरांकडून शिकण्याच्या स्थितीत राहिलो ! – गियोम ऑलिव्हिए

मागील काही दिवस मला हलके आणि आनंदी वाटत आहे. साधकांना भेटल्यावर मला आनंद होतो; कारण त्यांच्याकडून मला शिकायला मिळते. विदेशातील साधक तेथील रज-तमात्मक वातावरणात राहूनही साधना करतात. मला आश्रमात रहाण्याची संधी मिळाली; मात्र या संधीचा मी म्हणावा तसा लाभ करून घेतला नाही. माझ्याकडून परम पूज्यच सर्व काही सूक्ष्मातून करून घेत आहेत.

५ आ. साधनेसाठी कुटुंबीय आणि देश यांचाही गियोम यांनी त्याग केला ! – सद्गुरु सिरियाक वाले

श्री. गियोम हे फ्रान्स येथील रहिवासी आहे. त्यांनी आताच सांगितले की, ते आश्रमात रहात असूनही त्यांनी त्याचा लाभ करून घेतला नाही; मात्र असे नाही. येथे येण्यासाठी त्यांनी कुटुंबियांचा आणि देशाचाही त्याग केला.

५ इ. श्री. गियोम हे नियोजनबद्धरित्या सेवा करतात ! – श्री. अ‍ॅलन हार्डि

श्री. गियोम हे स्वतःविषयी अल्प बोलतात. ते सतत सेवारत असतात आणि ते नियोजनबद्धरित्या सेवा करतात. त्यांना जिज्ञासूंनी एखादा प्रश्‍न विचारल्यास ते त्याविषयी अचूक उत्तर देतात. त्यांच्यात नीटनेटकेपणा आहे.

६. इतरांना साहाय्य करण्यास तत्पर असणारे आणि अनेक अडचणी असूनही सेवारत असणारे इंडोनेशिया येथील श्री. फ्रान्सिकस बुडाअजी !

६. अ. पू. रेन्डीदादा यांनी सांगितल्याप्रमाणे मी अंतर्मुख होण्याचा प्रयत्न केला ! – फ्रान्सिकस बुडाअजी

मी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, याचे मला आश्‍चर्य वाटते; कारण ‘माझे प्रयत्न अपुरे पडतात’, असे मला वाटते. पूर्वी याची मला सतत खंत असायची. साधना करतांना अडचणी यायच्या. त्यामुळे निराशा यायची. सनातनच्या आश्रमात आल्यावर अडचणी संपल्या. येथे आल्यावर असुरक्षिततेची भावना नष्ट झाली. आश्रमात खूप आनंद जाणवतो. साधना करतांना पू. रेन्डीदादा यांनी मला अंतर्मूख होण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. त्याप्रमाणे प्रयत्न केले.

६ आ. जिज्ञासूंना आपलेसे करणारे आणि सेवेची तळमळ असणारे फ्रान्सिकस बुडाअजी ! – पू. रेन्डी इकारांतियो

फ्रान्सिकस यांच्यामध्ये मनमोकळेपणा आहे. त्यांच्यात प्रेमभावही आहे. अध्यात्मप्रसार करतांना संपर्कात आलेल्या जिज्ञासूंना ते आपलेसे करतात. त्यांना सेवा करतांना अनेक अडचणी येतात; मात्र ते कधीच याविषयी तक्रार करत नाहीत. बर्‍याचदा त्यांना ४ – ५ घंटे प्रवास करून इतर ठिकाणी अध्यात्मप्रसारासाठी जावे लागते. त्यामुळे घरी पोहोचण्यासही विलंब होतो, तरीही ते रात्री उशिरा घरी पोहोचल्यावर भाषांतराची सेवा करतात. त्यांच्यात सेवेविषयी तळमळ आहे.

६ इ. फ्रान्सिकस हे पू. रेन्डीदादा यांचे छोटे रूप आहेत ! – सौ. श्‍वेता क्लार्क

फ्रान्सिकस यांच्यामध्ये अनेक गुण आहेत. ते नेहमीच इतरांना साहाय्य करण्यासाठी तत्पर असतात. त्यांच्यात प्रेमभाव असल्यामुळे ते इतर साधकांशी लगेच जवळीक साधतात. प्रेमभाव, निर्मळता आदी गुणांमुळे ते पू. रॅन्डीदादा यांचे छोटे रूपच वाटतात.


Multi Language |Offline reading | PDF