‘गुर्वाज्ञापालन’ आणि ‘परात्पर गुरुदेवांप्रती अपार कृतज्ञता भाव’ या गुणांमुळे जलद आध्यात्मिक उन्नती करून ‘समष्टी संतपदा’वर विराजमान झालेल्या पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर !

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ
पू .(सौ.) शिल्पा कुडतरकर

१. परात्पर गुरु डॉक्टरांचे आज्ञापालन करून अमेरिकेतील स्वतःच्या घराचा ‘आश्रम’ बनवणे

‘पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर यांचा महत्त्वाचा गुण म्हणजे आज्ञापालन करणे ! परात्पर गुरु डॉक्टरांनी जे जे सांगितले, ते त्यांनी त्वरित कृतीत आणले. विवाहानंतर गोव्यातून अमेरिकेला गेलेल्या सौ. शिल्पा यांना आश्रमजीवनाची उणीव भासू लागली. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना ‘घर आश्रमाप्रमाणे बनव’, असे सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी ते लगेच कृतीत आणले. तेथील घराच्या दारावरही त्यांनी ‘सनातन आश्रम’ असे लिहिले. घरातील सर्वकाही आश्रमाप्रमाणेच केल्याने घर सात्त्विक झाले आणि साधकांना तेथे अनुभूतीही येऊ लागल्या. तेथे गुरुपौर्णिमा महोत्सव साजरे केले जातात, तसेच सत्संग, कार्यशाळा इत्यादींचे आयोजनही केले जाते. ‘आपण प.पू. गुरुदेवांच्याच आश्रमात रहात आहोत’, असा त्यांचा कृतज्ञताभाव असतो.

२. आई-वडिलांची भावपूर्ण सेवा केल्याने अवघ्या दीड मासातच आध्यात्मिक पातळी २ टक्क्यांनी वाढणे

वर्ष २०१४ मध्ये त्यांचे आई-वडील प्रभाकर वेरेकर आणि डॉ. (सौ.) मंगला वेरेकर हे दोघेही रुग्णाईत असतांना पू. शिल्पा यांनी त्यांची मनोभावे सेवा केली. ‘ही सेवा म्हणजे गुरुसेवाच आहे’, असा भाव असल्याने या सेवेतूनही त्यांची २ टक्के आध्यात्मिक उन्नती झाली. खरेतर वर्षाला सरासरी २ टक्के एवढीच आध्यात्मिक पातळी वाढते; पण त्यांच्या सेवेमुळे त्यांची पातळी केवळ दीड मासातच २ टक्क्यांनी वाढली. इतक्या कमी काळात एवढी प्रगती होण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे.

३. ‘सहजसुंदर स्वभाव’ आणि ‘मोकळेपणा’ या गुणांमुळे सर्वांशी जवळीक साधणे

पू. (सौ.) शिल्पा यांच्या स्वभावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा साधेपणा आणि सहजतेने वागणे-बोलणे. त्यांचे रहाणीमान अत्यंत साधे असून अमेरिकेत राहूनही त्यांनी त्यांचा साधेपणा जपला आहे. त्यांच्यातील सहजता आणि मोकळेपणा या गुणांमुळे त्या सर्वांशी जवळीक साधू शकतात.

४. सतत शिकण्याच्या स्थितीत राहून गुरुदेवांना अपेक्षित असा पालट करण्याची तळमळ !

शिबिराच्या निमित्ताने पू. (सौ.) शिल्पा रामनाथी आश्रमात आल्यावर किंवा त्या अमेरिकेत असतांनाही आमचा वरचेवर संपर्क होतो. प्रत्येक वेळी मला विशेषत्वाने जाणवते, ते म्हणजे ‘स्वतःचे प्रयत्न कोठे न्यून पडतात ?’, हे जाणण्याची त्यांची जिज्ञासा आणि शिकण्याची तळमळ ! त्यांना एखादी चूक सांगितली, तरी शिकण्याच्या स्थितीत राहून त्या सहजतेने तिचा स्वीकार करतात आणि स्वतःत पालट करण्याचा मनापासून प्रयत्न करतात.

अशा अनेक दैवी गुणांमुळे पू. (सौ.) शिल्पा यांचा ‘समष्टी संतपदा’पर्यंतचा साधनाप्रवास सर्वच साधकांसाठी स्फूर्तीदायी बनला आहे. अशी संतरत्ने घडवणार्‍या आणि एस्.एस्.आर.एफ्.च्या साधकांना ‘पंच संतरत्नांची अनमोल भेट’ देणार्‍या परात्पर गुरु डॉक्टर अन् भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ (३.१.२०१९)    

एस्.एस्.आर.एफ्.च्या ५ व्या ‘समष्टी संत पू. (सौ.) शिल्पा राजीव कुडतरकर’ यांचा आध्यात्मिक उन्नती केलेला नातेवाईक परिवार !


Multi Language |Offline reading | PDF