प्रीतीस्वरूप आणि अध्यात्मप्रसाराची तळमळ असणार्‍या एस्.एस्.आर्.एफ्.च्या ५ व्या समष्टी संत पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर यांचा सन्मान सोहळा !

‘३ जानेवारी या दिवशी ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या (एस्.एस्.आर्.एफ्.च्या) वार्षिक आंतरराष्ट्रीय शिबिराला रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात प्रारंभ झाला. त्या वेळी प्रीतीस्वरूप आणि अध्यात्मप्रसाराची तळमळ असणार्‍या अमेरिकेतील साधिका सौ. शिल्पा कुडतरकर (वय ४८ वर्षे) संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सर्वांना देण्यात आली. तसेच ऑस्ट्रिया येथील चि. नारायण डूर् (वय २ वर्षे), त्याची आई सौ. लवनिता डूर् (वय २३ वर्षे), इंडोनेशिया येथील श्री. फ्रान्सिकस बुडाअजी (वय २६ वर्षे), फ्रान्स येथील श्री. गियोम ऑलिव्हिए (वय २५ वर्षे), कॅनडा येथील श्री. अ‍ॅलन हार्डि (वय ५२ वर्षे) आणि सिंगापूर येथील श्री. व्हिन्सेंट मलहेर्बे (वय ३८ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता देण्यात आली. त्याविषयीचा सविस्तर वृत्तांत येथे देत आहोत.

पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करतांना एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) भावना शिंदे

माझा श्‍वास परम पूज्यांच्या चरणी चालू होतो आणि तिथेच पूर्ण होतो ! – पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर

१. संतपदी विराजमान झाल्यावर पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर यांनी व्यक्त केलेले मनोगत

१ अ. सर्व काही परम पूज्यांनी करून घेतले ! : ‘मी काहीच केले नाही. सर्वकाही परम पूज्यांनीच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) करून घेतले. माझा श्‍वास परम पूज्यांच्या चरणी चालू होतो आणि तिथेच पूर्ण होतो. मला कधीच ‘मी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठावी’,  अथवा ‘मी संतपदी विराजमान व्हावे’, असे वाटत नव्हते. मला अध्यात्मप्रसार करण्यासाठी गुरुदेवांचे चांगले ‘माध्यम’ बनायचे होते. मागील वर्षी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘आता समष्टीसाठी तुला कार्य करायचे आहे’, असे सांगितले. त्यांनीच ते माझ्याकडून करून घेतले. साधनेत पू. (सौ.) भावनाताई यांनी नेहमीच साहाय्य केले. त्यांचा संतसंग लाभला, हे माझे भाग्य आहे. त्या एखादी सेवा सांगायच्या आणि ती सेवा आपोआप झालेली असायची. त्यांच्या अस्तित्वानेच ती होत होती.

१ आ. स्वतःला पालटण्यासाठी प्रयत्न केले ! : वर्ष २०११ मध्ये आयोजित केलेल्या शिबिरामध्ये ‘स्वतःला पालटण्याची तळमळ अल्प पडते’, असे साधकांना सांगण्यात आले. त्या वेळी मी ‘माझ्यात पालट होऊ दे’, अशी प्रतिदिन १०० वेळा प्रार्थना करत असे. परम पूज्य जे काही सांगतात ते त्वरित कृतीत आणले पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करण्यास आरंभल्यास ते आपल्याला भरभरून देतात.

१ इ. परम पूज्यांच्या कृपेमुळे साधक आई-वडील आणि चांगले पती लाभले ! : आई-वडिलांमुळेच मी साधनेला आरंभ केला. श्री. राजीव यांच्याशी माझा विवाह निश्‍चित झाला. खरे तर श्री. राजीव ही परम पूज्यांचीच निवड होती. विवाहानंतर श्री. राजीव यांचा मला सतत पाठिंबा लाभला.’

२. पू. (सौ.) शिल्पाताई मनोगत व्यक्त करत असतांना त्यांच्या पाठीमागे परम पूज्यांचे अस्तित्व जाणवणे

पू. शिल्पाताई यांचा सन्मान केल्यानंतर त्या त्यांचे मनोगत व्यक्त करत होत्या. त्या वेळी पू. (सौ.) योया वाले यांना पू. शिल्पाताई यांच्या पाठीमागे परम पूज्यांचे अस्तित्व जाणवले.

३. साधना हाच पू. (सौ.) शिल्पा यांच्या आयुष्यातील केंद्रबिंदू ! – श्री. राजीव कुडतरकर (पू.(सौ.) शिल्पा कुडतरकर यांचे पती)

बर्‍याचदा एखादी व्यक्ती इतर ठिकाणाहून अमेरिकेत गेल्यावर ती तेथील भौतिक सुखात रममाण होते. सौ. शिल्पा यांचे मात्र तसे नव्हते. त्या माझ्याशी विवाह करून अमेरिकेत आल्यावर तेथील भौतिक सुखात त्या कधीच रममाण झाल्या नाहीत. साधना आणि सेवा हेच त्यांच्या आयुष्यातील केंद्रबिंदू राहिले आहेत. त्यांच्या या साधनाप्रवासात मी काही अंशी त्यांना साहाय्य करण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेत प्रसार करण्यासाठी त्यांनी बरेच कष्ट घेतले. त्यानंतर पू. भावनाताई आमच्या आयुष्यात आल्या आणि परिस्थिती हळूहळू पालटू लागली. सौ. शिल्पा यांच्या सेवेत शिस्तबद्धता आणि नियोजनबद्धता असते. मी माझ्या पत्नीचे अनुकरण केले. त्यामुळे मी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठू शकलो.

श्री. कुडतरकर असे म्हणाल्यावर सद्गुरु सिरियाक वाले म्हणाले, ‘‘आता तुम्ही संतांचे अनुकरण कराल. त्यामुळे तुमची आध्यात्मिक उन्नती आणखी जलद होईल !’’

४. भावाचे मूर्तीमंत रूप म्हणजे पू. (सौ.) शिल्पाताई ! – पू. (सौ.) भावना शिंदे

मी पू. शिल्पाताईंना वर्ष १९९९ पासून ओळखते. त्यांच्यासमवेतचा साधनेचा प्रवास अतिशय आनंददायी होता. त्या भावाचे मूर्तीमंत रूप आहेत. त्यांच्यामध्ये ‘इतरांसाठी करत रहाणे’, हाही प्रमुख गुण आहे. त्या माझ्या आध्यात्मिक आई आहेत. त्यांच्याकडून मला बरेच काही शिकता आले. ‘साधकत्व म्हणजे काय असते’, हे पू. शिल्पाताईंकडून शिकायला मिळाले. त्यांच्यामध्ये १०० टक्के स्वीकारण्याची वृत्ती आहे. त्यामुळे ‘एखादे सूत्र त्यांना कसे सांगायचे’ असा विचार माझ्या मनात येत नाही. त्या प्रत्येक सूत्र कृतज्ञताभावाने स्वीकारतात.


Multi Language |Offline reading | PDF