नाताळ साजरा करतांना ‘जय सोफिया’ या वांद्रे समुद्रातील तरंगत्या उपाहारगृहाकडून फटाक्यांची आतषबाजी !

 • ख्रिस्ती नववर्ष जल्लोषात साजरे केल्याचे दुष्परिणाम !

 • मुंबई मेरेटाईम बोर्ड आणि वांद्रे पोलीस यांच्याकडून उपाहारगृहावर कारवाई !

  • अशा प्रकारे मनमानी करणार्‍या उपाहारगृहाचा परवाना कायमस्वरूपीच रहित करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली पाहिजे !
  • मुंबईचा समुद्र आतंकवादी आक्रमणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे येथे कोणत्याही प्रकारच्या नियमांचे उल्लंघन मुंबई महानगराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते !

मुंबई – नाताळ साजरा करतांना वांद्रे समुद्रातील ‘जय सोफिया’ या तरंगत्या उपाहारगृहावर फटाके फोडून सुरक्षेचे नियम पायदळी तुडवल्याच्या प्रकरणी ‘मुंबई मेरेटाईम बोर्डा’ने त्या उपाहारगृहाचा परवाना २ दिवसांसाठी रहित केला आहे, तसेच वांद्रे पोलिसांनी या उपाहारगृहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव अगरवाल आणि व्हाईट फॉक्स इव्हेंट मॅनेजमेंट’ या आस्थापनाचे मनोज मुलचंदानी यांच्या विरोधात गुन्हाही नोंद केला आहे. त्यांच्यावर भा.दं.वि. कलम २८६ आणि ३३६ च्या अंतर्गत निष्काळजीपणे स्फोटक पदार्थ बाळगून नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या उपाहारगृहावरील फटाक्यांच्या आतिषबाजीची ध्वनीचित्रफीत सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाली होती. त्याची नोंद घेत वांद्रे पोलिसांनी कारवाई केली.

१. अशा प्रकारची फटाक्यांची आतषबाजी कशी धोकादायक ठरू शकते, हे गिरगाव चौपाटीवरील ‘मेक इन इंडिया’च्या कार्यक्रमा वेळी लागलेल्या आगीमुळे आम्ही अनुभवले आहे, असे एका अधिकार्‍याने सांगितले.

२. या प्रकरणी तरंगत्या उपाहारगृहाच्या मालकाच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी मुंबई मेरेटाईम बोर्डा’चे (एम्एम्बीचे) अधिकारी विक्रम कुमार यांनी ‘डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंग’ यांना पत्र लिहिले आहे.

३. जगभरात जवळपास सर्वच तरंगत्या उपाहारगृहांवर फटाक्यांची आतिषबाजी केली जाते, तसेच आमच्याकडे आग प्रतिबंधक यंत्रणाही आहे. याविषयी आम्ही ‘मुंबई मेरेटाईम बोर्डा’कडे आमची बाजू मांडू. परवाना रहित केल्यामुळे आमची मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली आहे, असे उपाहारगृहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव अगरवाल यांनी कारवाईविषयी अप्रसन्नता व्यक्त करतांना म्हटले आहे. (यांना नियमांचे पालन करणे महत्वाचे वाटत नसून झालेली आर्थिक हानी क्लेशदायी वाटत आहे. ही पैशांची मस्ती बोलत आहे. त्यामुळे नियमांचे पालन कसे करायचे,  हे यांना कडक कारवाईतून शिकवले पाहिजे !  – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF