उत्साही, स्वावलंबी आणि प्रेमळ असलेल्या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती वसुंधरा गवळी !

श्रीमती वसुंधरा तुकाराम गवळीआजी या मुंबईच्या साधिका आहेत. त्यांच्या मुंबईच्या घराचे काम चालू असल्यामुळे त्या पनवेल येथे रहाणार्‍या त्यांच्या मुलीकडे (सौ. वीणा म्हात्रे यांच्या घरी) वास्तव्यास होत्या. तेव्हा सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमातील साधिकांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्रीमती वसुंधरा गवळी

१. उत्साही आणि स्वावलंबी : ‘आजींची शारीरिक क्षमता अल्प आहे, तरीही त्यांचा उत्साह आम्हा सर्वांना लाजवेल, असा आहे. त्या स्वतःची कामे स्वतः करतात. आजी भाजी निवडणे आणि चिरून देणे, अशी कामे त्यांना जमेल तशी करतात.

२. ‘आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये’, याची काळजी घेणे : आजी मुलीकडे रहातात. ‘आपल्यामुळे मुलीला त्रास होतो’, याची त्यांना खंत वाटते. ‘जावयाकडे कसे रहायचे ?’, असे वाटल्याने त्यांनी भाड्याने घर घेतले आणि त्या तेथे रहात होत्या. मुलीला त्रास होऊ नये; म्हणून त्या वृद्धाश्रमातही रहाण्यास सिद्ध होत्या; परंतु मुलीने त्यांना सांगितले, ‘‘वृद्धाश्रमात नको. माझ्याकडेच रहा.’’ त्यांच्या मुंबईच्या घराचे काम झाल्यावर त्या घरी रहायला गेल्या.

३. प्रेमभाव 

अ. आम्ही आजींकडे गेल्यावर काही सांगायच्या आधीच त्या आम्हाला खाऊ आणून देतात. त्यांचे इतके वय झाले असूनही त्या वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवतात.’

– सौ. संगीता लोटलीकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

आ. ‘आजी घरी आलेल्या प्रत्येक साधकाशी प्रेमाने बोलतात आणि त्याची विचारपूस करतात.

इ. आजींच्या नातवाचा साखरपुडा झाला. तेव्हा आजी घरी आलेल्या प्रत्येक साधकाला ‘पेढा मिळाला का ?’, असे विचारून पेढा मिळाल्याची निश्‍चिती करत होत्या.’

– सौ. चारुलता भारत नखाते, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

४. ‘त्यांची कुणाकडून कसलीही अपेक्षा नसते.

५. आजींच्या आयुष्यामध्ये अनेक कठीण प्रसंग आले, तसेच पुष्कळ अडचणीही आल्या, तरीही त्या स्थिर राहून अखंड नामजप करत असतात.

६. त्यांची गुरुदेवांवर पुष्कळ श्रद्धा आहे. त्यांना चालायला त्रास होतो, तरीही त्या अधून-मधून नामजप करण्यासाठी आश्रमात येतात.’

– सौ. संगीता लोटलीकर

७. ‘आजींच्या कपाळावर ‘ॐ’ उमटलेला आहे.

८. समष्टी भाव : एकदा सद्गुरु अनुताईंचे (सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर) साधकांना मार्गदर्शन होते. तेव्हा ‘सर्व साधकांना त्याचा लाभ व्हावा’, यासाठी त्यांनी संकुलातील साधकांना त्यांच्या घरी जाऊन बोलावून आणले.

९. भाव : आजींना २ – ३ वेळा रुग्णालयामध्ये भरती करावे लागले होते. तेव्हा घरी आल्यानंतर त्या सारख्या गुरुदेवांच्या छायाचित्राकडे पाहून ‘गुरुदेवांनीच माझी काळजी घेतली. तेच माझ्या समवेत होते’, असे  कृतज्ञतापूर्वक सांगत होत्या.’

– सौ. चारुलता भारत नखाते

१०. अनुभूती – ‘आजींकडे बघत रहावे’, असे वाटणे आणि त्यांच्याकडे पाहून नामजप चालू होणे : ‘आजी या वयातही दिसायला सुंदर आहेत. त्यांचा तोंडवळा लहान मुलाप्रमाणे निरागस आहे. ‘त्यांच्याकडे बघत रहावे’, असे वाटते. त्यांच्याकडे पाहून नामजप चालू होतो.

११. वरील सर्व सूत्रांवरून ‘आजींची प्रगती झाली आहे’, असे वाटते.’

– सौ. संगीता लोटलीकर (२०.१०.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF