लहान वयातही कठीण प्रसंगात स्थिर रहाणारा आणि प्रगल्भ बुद्धीमत्ता असलेला सोलापूर येथील कु. देवदत्त योगेश व्हनमारे (वय १५ वर्षे) याने गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

कु. देवदत्त व्हनमारे याचा सत्कार करतांना कु. दीपाली मतकर

सोलापूर, ३ जानेवारी (वार्ता.) – कठीण प्रसंगात स्थिर रहाणारा आणि लहान वयातही प्रगल्भ बुद्धीमत्ता असलेला कु. देवदत्त योगेश व्हनमारे (वय १५ वर्षे) याने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. सोलापूर येथे एका अनौपचारिक सत्संगात ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. दीपाली मतकर यांनी ही आनंदवार्ता दिली. या वेळी कु. देवदत्त याची आई श्रीमती अलका योगेश व्हनमारे यांच्यासह अनेक साधक उपस्थित होते. या आनंदवार्तेने वातावरण चैतन्यमय झाले. या वेळी देवदत्तची आई आणि अन्य साधक यांनी देवदत्तची गुणवैशिष्ट्ये सांगितली. कु. दीपाली यांनी या वेळी कु. देवदत्त याचा भेटवस्तू देऊन सत्कार केला. या सोहळ्यापूर्वी अनेक साधकांना कु. देवदत्तकडे पाहून ‘त्याची प्रगती झाली आहे’, असे जाणवत होते.

१५ डिसेंबर २०१८ या दिवशी कु. देवदत्त याचे वडील कै. योगेश व्हनमारे यांचे निधन झालेे. या कठीण प्रसंगात वयाने लहान असूनही कु. देवदत्तने सर्व कुटुंबियांना स्थिर राहून सावरले, तसेच वडिलांचे सर्व विधी व्यवस्थित केले. अशा कठीण प्रसंगात त्याने आई आणि अन्य कुटुंबियांना वेळोवेळी योग्य दृष्टीकोन देऊन स्थिर रहाण्यास सांगितले. त्याच्यातील या गुणांकडे पाहून ‘साधकांनाच नाही; तर समाजातील लोकांना’ही कौतुक वाटत होते.

कु. देवदत्तने कुटुंबियांना धीराने सावरले ! – श्रीमती अलका योगेश व्हनमारे (आई)

‘देवदत्त त्याच्या बाबांच्या निधनानंतर पुष्कळ स्थिर होता. लहान असूनही त्याने कठीण प्रसंगात मला आणि कुटुंबियांना धीराने सावरले. त्याच वेळी त्याने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्याचे ध्येय घेतले होते. त्याचे हे ध्येय लवकरच पूर्ण झाले. पूर्वी आणि आताही अनेक संतांनी मला सांगितले आहे की, ‘देवदत्तची काळजी करण्याची आवश्यकता नाही, त्याची साधना चालू आहे.’ परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्याचे बाबा यांनीच त्याला घडवले.

‘आई-बाबांची साधना व्हावी’, यासाठी देवदत्त वयाच्या ६ ते १२ वर्षांपर्यंत त्याच्या मामा-मामीकडे राहिला. मला त्याची पुष्कळ आठवण यायची. त्या वेळी त्याचे बाबा (कै. योगेश व्हनमारे) म्हणायचे, ‘देवदत्तचे खरे आई-बाबा परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत.’ ‘आई-बाबांपासून दूर रहावे लागते’, याविषयी त्याने कधीच तक्रार केली नाही.

कै. योगेश यांच्या निधनानंतर मला ‘मी सगळे गमावले’, असे वाटत होते. त्या वेळी सद्गुरु (सौ.) बिंदाताई दूरभाषवर म्हणाल्या, ‘‘तुम्हाला देवदत्तची काळजी करण्याची आवश्यकताच नाही. त्याच्यावर देवानेच संस्कार केले आहेत. तोच तुमची काळजी घेणार आहे.’’

कु. दीपाली मतकर यांनी कु. देवदत्तची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

‘कु. देवदत्त त्याच्या सर्व कृती वेळेत करतो. त्याच्या बाबांच्या निधनानंतर तो रडत नव्हता. त्यामुळे नातेवाइकांना वाटत होते की, ‘तो दु:खी आहे; पण तो ते दाखवत नाही किंवा व्यक्त करत नाही’; मात्र तो आतून स्थिर होता. तो सतत श्रीकृष्णाच्या अनुसंधानात असल्यामुळे त्याच्यावर बाह्य वातावरणाचा कसलाही परिणाम होत नाही. तो मनाचा अभ्यासही टक्केवारीत करतो.’

आनंदी आनंद झाला… !

आनंदी आनंद झाला… सोलापूर नगरीला… ।

देवदत्त दादाची ऐकूनी प्रगती… ॥ १ ॥

तळमळ आणि ध्यास लक्ष असे, एकाग्र चित्त तो रहात असे ।

प्रेरणा त्यातून मिळाली आम्हा साधकजनांस ॥ २ ॥

साधनेत साहाय्य अखंड श्रीकृष्णतत्त्व, श्रीकृष्णतत्त्व ।

आनंदी आणि भावानंदात देवदत्त, देवदत्त ॥ ३ ॥

कु. देवदत्तने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्याचे ध्येय लवकर पूर्ण केले ! – सौ. रेखा जावळी (मावशी)

‘ही आनंदवार्ता ऐकून पुष्कळ आनंद झाला. देवदत्त म्हणाला होता, ‘बाबांनी वयाच्या ४० व्या वर्षी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. मला २० व्या वर्षीच प्रगती करून घ्यायची आहे.’ देवाने पुष्कळ लवकर त्याची इच्छा पूर्ण केली. प.पू. गुरुमाऊलीच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’

कै. योगेश व्हनमारे यांच्या मृत्यूनंतर कु. देवदत्तच्या संदर्भात सोलापूर येथील साधकांना जाणवलेली सूत्रे

१. स्थिर राहून विचारून कृती करणे

‘तिसर्‍या दिवशी विधी असतांना नातेवाईक देवदत्तला अनेक गोष्टी सांगत होते. तो स्थिर राहून सर्व गोष्टी विचारून विचारून करत होता.’ – श्री. राजन बुणगे (डिसेंबर २०१८)

२. ‘या कठीण प्रसंगातही देवदत्तची प्रगल्भता जाणवत होती.’

– श्री. हिरालाल तिवारी (डिसेंबर २०१८)


Multi Language |Offline reading | PDF