पंतप्रधानांच्या दौर्‍यामुळे अल्पावधीत कल्याण येथील रस्ता झाला ‘स्मार्ट’ !

माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे ‘कल्याण-भिवंडी-ठाणे ५’, ‘दहिसर-मिरा-भाईंदर ९’ मेट्रो प्रकल्प आणि सिडकोच्या १८ सहस्र कोटी रुपयांचा गृहप्रकल्प यांच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी १८ डिसेंबरला कल्याण येथील फडके मैदानात आले होते. या सोहळ्यास अनुमाने १५ सहस्र नागरिक उपस्थित होते. कल्याण-डोंबिवली शहराचा ‘स्मार्टसिटी’च्या सूचित समावेश झाल्याने येथील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; त्यामुळे शहराचा कायापालट होईल, अशी आशा मात्र फोल ठरलेली आहे ! भ्रष्टाचारामुळे कुप्रसिद्ध झालेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने पंतप्रधान मोदींच्या दौर्‍याच्या निमित्ताने कात टाकत अत्यल्प कालावधीत नागरिकांना शहरातील एक विभाग मात्र ‘स्मार्ट’ करून दाखवला ! पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या निमित्ताने प्रशासनाचा हा दिखाऊपणा आणि नागरिकांना आलेल्या अडचणी येथील नागरिकांनी सांगितल्या.

संकलक : श्री. विजय ठाकरे, कल्याण

वृक्षांच्या प्रतीक्षेत रस्तादुभाजक
रस्तादुभाजकात वृक्षारोपण
रस्त्यावरील खड्डे बुजवतांना कामगार
कठड्याला रंगरंगोटी करतांना कामगार

अनेक दिवस भेडसावणार्‍या कचराक्षेपणभूमीच्या समस्येकडे पंतप्रधानांच्या दौर्‍यापूर्वी विशेष लक्ष !

कल्याण-डोंबिवलीचे अतिशय कळीचे सूत्र बनलेल्या आणि दिवसागणिक उग्र प्रश्‍न बनत चाललेल्या कचराक्षेपणभूमीमुळे महापालिकेचे नाक कापले जाऊ नये, यासाठी महापालिकेने अथक प्रयत्न केले. अनेक दिवस भेडसावणार्‍या या समस्येकडे पंतप्रधानांच्या दौर्‍यापूर्वी विशेष लक्ष देण्यात आले. दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर या ठिकाणी २४ घंटे सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले. यासह दुर्गंधी येऊ नये म्हणून सुवासिक फवारणी केली जात होती. गेल्या काही वर्षांत कल्याण-डोंबिवलीतील कचर्‍याचा प्रश्‍न अत्यंत जटील बनला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका आणि त्यातले सत्ताधारी हा प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दाखवत असले, तरी अद्याप त्याला म्हणावे तितके यश आले नाही. आता देशातील सर्वोच्च व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरात आल्याने निदान त्यांच्यासमोर तरी महापालिकेची या सूत्रामुळे नामुष्की होऊ नये, यासाठी महापालिकेने विशेष काळजी घेतली.

पंतप्रधानांसमोर कचर्‍याला आग लागू नये, यासाठी खडा पहारा !

काही दिवसांपूर्वीच फडके मैदानात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. त्या वेळी कचर्‍याला आग लागली होती. हा प्रकार पंतप्रधानांसमोर घडू नये, यासाठी महापालिकेने कचराक्षेपणभूमीवर २४ घंटे ३० सुरक्षा रक्षक तैनात केले होते. कचराक्षेपणभूमीच्या चारही दिशेला हे सुरक्षारक्षक खडा पहारा देत होते. आग लागल्यास सतर्कतेचा उपाय म्हणून शेजारील ‘एस्टीपी’ प्रकल्पातून पाण्याची मोठी ‘लाईन’ही वरपर्यंत नेण्यात आली होती. नागरिकांनी कचराक्षेपणभूमीविषयी महापालिकेने केलेल्या या उपाययोजनांचे स्वागत केले असले, तरी ‘याआधी हे उपाय का केले नाहीत ?’, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. पंतप्रधान येणार म्हणून या उपाययोजना न राबवता कायमस्वरूपी त्याची कार्यवाही करण्याची मागणीही स्थानिक रहिवाशांनी केली आहे. ‘करदात्या सामान्य नागरिकांच्या जिवाची किंमत नाही का ?’, असा प्रश्‍न नागरिक करत आहेत.

कामासाठी अधिकारी रस्त्यावर उतरले !

नेहमी वातानुकूलित वातावरणात केवळ आदेश देणारे अधिकारी मोदी यांच्या दौर्‍यामुळे मात्र प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करतांना दिसले; परंतु कामाच्या ताणामुळे त्यांना थंडीतही घाम सुटला होता. हेलिपॅडवर धूळ उडू नये म्हणून ४ ते ५ टँकरच्या साहाय्याने सतत पाणी फवारण्यात येत होते. सभेच्या वेळी विद्युत पुरवठ्याची अडचण येऊ नये, यासाठी नवीन विदुयतरोहित्र लावण्यात आले.

पंतप्रधानांच्या स्वागतासाठी रस्ते झाले चकाचक !

बापगाव ते फडके मैदान हा ३ किलोमीटरचा रस्ता कधी नव्हे एवढा चकाचक करण्यात आला होता. त्या मार्गावरील सर्व गतिरोधक काढण्यात आले. रस्तावरील खड्डे काळजीपूर्वक भरण्यात आले. इतके दिवस वृक्षांची वाट पहात असलेल्या रस्तादुभाजकांमध्ये एका रात्रीत वृक्षारोपण करण्यात आले. रस्ते रंगरंगोटी करून सुशोभित करण्यात आले. त्या रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमणे हटवण्यात आली.

दौर्‍यापूर्वी स्मशानभूमी बंद ठेवल्याने नागरिकांची गैरसोय !

पंतप्रधान मोदींच्या कल्याण दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर कल्याणमधील स्मशानभूमी बंद ठेवण्यात आली. मोदी कल्याणमध्ये असेपर्यंत एकही अंत्ययात्रा लालचौकी स्मशानभूमीत येणार नाही, याची काळजी घेतली. ‘पंतप्रधानांच्या सोयीसाठी ही व्यवस्था करण्यात आली असली तरी ती नागरिकांसाठी गैरसोय ठरत आहे’, असा संताप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला.


Multi Language |Offline reading | PDF