मराठी साहित्य संमेलनातील प्रायोजक आणि देणगीदार यांची सूची घोषित करा !

शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीची मागणी

नागपूर – ३ कोटी ५० लक्ष रुपयांचे मोठे अंदाजपत्रक असलेल्या यवतमाळ येथील नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मोठ्या प्रमाणात प्रायोजक आणि देणगीदार शोधले जात आहेत. संमेलनाच्या नावाने शासकीय कर्मचारी, व्यावसायिक प्रतिष्ठाने, विविध संस्था, एवढेच नव्हे, तर चक्क विद्यार्थी यांच्याकडूनही पैशांची वसुली केली जात आहे. आयोजकांचा कारभार खरोखरच पारदर्शक असेल, तर त्यांनी संमेलनापूर्वी प्रायोजक आणि देणगीदार यांची सूची घोषित करावी, तसेच खर्चाचा हिशेब जनतेसाठी खुला करावा, अशी मागणी शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीने केली आहे. (राज्यावर ४ लक्ष ५० सहस्र कोटी रुपयांचे कर्ज असतांना आणि प्रतिदिन शेतकरी आत्महत्या करत असतांना मराठी साहित्य संमेलनासाठी ३ कोटी ५० लक्ष रुपये खर्च करणे म्हणजे ‘रोम जळत असतांना निरो फिडल वाजवत होता’, असे म्हटल्यास चुकले कुठे ? – संपादक)

समितीचे निमंत्रक देवानंद पवार म्हणाले की, कर्ज आणि नापिकीपायी शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत असतांना आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब साहाय्याच्या प्रतीक्षेत असतांना या संमेलनावर ३ कोटी ५० लक्ष रुपयांहून अधिक पैशाची उधळपट्टी केली जाणार आहे. या उधळपट्टीला समाजाच्या विविध स्तरातून आणि साहित्यिक यांच्याकडून विरोध होत आहे. संमेलन जरूर व्हावे; मात्र त्यात साधेपणा असावा आणि संमेलनाच्या नावाने गोळा होणारा पैसा शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना द्यावा, अशी त्यांनी मागणी केली.


Multi Language |Offline reading | PDF