‘केरळ बंद’च्या आंदोलनात एकाचा मृत्यू

शबरीमला मंदिरात नास्तिकतावादी माकपच्या कार्यकर्तीसह २ महिलांनी मंदिरात प्रवेश केल्याचा परिणाम

हिंदूंच्या मंदिरांमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणारे नास्तिकतावादी, मुसलमान महिला आणि अन्य पुरो(अधो)गामी यांच्या विरोधासाठी आता ‘हिंदु महिलांनी मशिदी, दर्गे आणि चर्च येथील महिलांसाठीच्या प्रतिबंधित भागामध्ये घुसावे’, असे कोणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये ! असा कोणी प्रयत्न केल्यास कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाहीत, असे समजायचे का ?

थिरुवनंतपूरम् – केरळच्या शबरीमला मंदिरात २ जानेवारीच्या पहाटे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची कार्यकर्ती बिंदू आणि केरळच्या नागरी पुरवठा विभागात हंगामी काम करणारी कनकदुर्गा या महिलांनी पोलिसांच्या सुरक्षेत मंदिरात प्रवेश केला होता. त्यास विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि भाविक यांच्याकडून विनिष्ठ संघटना, रोध होत आहे. या विरोधाच्या अनुषंगाने ३ जानेवारीला ‘केरळ बंद’चे आंदोलन करण्यात आले. या वेळी राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यात चकमक उडाली. यात माकप आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीमध्ये ‘शबरीमला कर्म समिती’चे ५५ वर्षीय कार्यकर्ते उन्नीथन् पंडलम यांचा मृत्यू झाला. या बंदच्या आंदोलनाचा परिणाम संपूर्ण राज्यात दिसून आला. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. या सर्वांवर महिला पोलीस कर्मचार्‍यांवर आक्रमण केल्याचा आरोप आहे. दुसरीकडे माकपच्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी कह्यात घेतले आहे. मंदिरातील महिलांच्या प्रवेशाच्या निषेधार्थ काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट’ने ‘काळा दिवस’ पाळला.

महिलांच्या मंदिर प्रवेशामागे मुख्यमंत्री पिनराई विजयन् ! – काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथला

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथला म्हणाले की, राज्यात सरकार पुरस्कृत महिलांची साखळी बनवण्याचे आंदोलन झाल्याच्या पार्श्‍वभूमीवरच या २ महिलांना शबरीमला मंदिरात कोणी आणले ? २४ डिसेंबरला मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यानंतर या महिला अनेक दिवस पसार होत्या. यावरून हे स्पष्ट होते की, त्या पोलीस संरक्षणात होत्या. मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांच्या निर्देशांवरून पोलिसांनी काम केले.

या घटनेतून मुख्यमंत्र्यांचा आडमुठेपणा दिसून येतो.’ ‘शुद्धीकरण’ विधीसाठी मंदिर बंद ठेवणे शंभर टक्के योग्य आहे.

भाजपचे नेते एम्.टी. रमेश म्हणाले की, मंदिरात महिलांनी प्रवेश करून परंपरा मोडल्याने इतिहासात प्रथमच मंदिर बंद ठेवावे लागले आहे. यातून माकपचे षड्यंत्र स्पष्ट होते. त्यासाठी मुख्यमंत्री उत्तरदायी आहेत. (हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून आणि त्यामुळे राज्यातील शांतता बिघडवल्यावरून केंद्रातील भाजप सरकार केरळचे सरकार विसर्जित का करत नाही ? बाबरी मशीद पाडल्यामुळे केंद्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारने उत्तरप्रदेशचे भाजपचे सरकार विसर्जित केले होते, हे भाजपला माहिती नाही का ? – संपादक)

हा हिंदूंवर दिवसाढवळ्या केलेला बलात्कार ! – भाजपचे केंद्रीयमंत्री अनंतकुमार हेगडे

सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले होते की, महिलांच्या प्रवेशाविषयी आम्ही सहमत आहोत; मात्र हे राज्य सरकारचे दायित्व आहे की, त्यांनी जनतेच्या भावनांना ठेच लागू न देता हे सांभाळले पाहिजे; मात्र केरळ सरकार न्यायालयाच्या या अपेक्षेवर पूर्णपणे अपयशी ठरली आहे. अशा प्रकारे हिंदूंवर दिवसाढवळ्या बलात्कार केल्यासारखे आहे, अशी टीका केंद्रीयमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केली आहे.

शबरीमला मंदिरात प्रवेश करणार्‍या महिला भाविक नव्हे, तर माओवादी ! – भाजप नेते व्ही. मुरलीधरन्

शबरीमला मंदिरात प्रवेश करणार्‍या महिला भाविक नाहीत, तर माओवादी आहेत. माकपच्या सत्ताधारी सरकारने काही निवडक पोलिसांच्या साहाय्याने या महिलांना गाभार्‍यापर्यंत जाऊ दिले. हा एक सुनियोजित कट होता. हे एक षड्यंत्र असून माओवाद्यांनी केरळ सरकार आणि माकप यांच्या संरक्षणाखाली ते बनवले आहे, असा आरोप भाजपचे नेते व्ही. मुरलीधरन् यांनी केला आहे.

(म्हणे) ‘संघ केरळला संघर्षाचे क्षेत्र बनवत आहे !’ – मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांचा आरोप

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् म्हणाले की, रा.स्व. संघाने केरळला संघर्षाचे क्षेत्र बनवले आहे. अशा प्रकारच्या हिंसक निदर्शनांना सरकारचा विरोध आहे. (असे हिंसक आंदोलन होण्याला केरळचे सरकारच उत्तरदायी आहे, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे ! – संपादक) आंदोलनामध्ये पोलिसांची ७ वाहने, ७९ सरकारी बस आणि ३९ पोलीस कर्मचारी यांवर आक्रमणे झाली आहेत. (सरकारी संपत्तीची हानी करण्याऐवजी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांच्या विरोधात भाविकांनी वैध मार्गाने आवाज उठवायला हवा ! – संपादक) आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय लागू करण्याचा निर्णय घेत आहोत. (सर्वोच्च न्यायालयाने मशिदींवरील अवैधरित्या लावलेले भोंगे काढण्याचाही आदेश दिला आहे, तसेच समान नागरी कायदा करण्याचा आणि रस्त्यावर नमाजपठण करून वाहतूक कोंडी न करण्याचाही आदेश दिला आहे, यांवर केरळच्या सरकारने काय कार्यवाही केली आहे ? – संपादक)

मंदिराच्या शुद्धीकरणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

शबरीमला मंदिरात ५० वर्षांखालील २ महिलांनी प्रवेश केल्यानंतर मंदिर १ घंट्यासाठी बंद करून त्याची शुद्धी करण्यात आली. या विरोधात अधिवक्ता पी.व्ही. दिनेश यांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायालयाचा अवमान करण्यात आल्याचे सांगत याचिका प्रविष्ट केली आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळेच या मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय झाला आहे. असे असतांना महिलांनी प्रवेश केल्यावर मंदिराची शुद्धी करणे म्हणजे न्यायालयाचा अवमान आहे’, असे दिनेश यांनी म्हटले. या याचिकेवर २२ जानेवारीला सुनावणी होणार आहे. (धर्मांधांकडून अनेक ठिकाणी न्यायालयांचा अवमान केला जातो, त्या विरोधात अधिवक्ता दिनेश याचिका का करत नाहीत ? – संपादक)

मंदिर प्रशासनाने घेतलेला मंदिर शुद्धीकरणाचा निर्णय योग्यच ! – अश्‍विनी कुलकर्णी, प्रवक्त्या, सनातन संस्था

‘जय महाराष्ट्र’ वाहिनीवरील चर्चासत्र

मुंबई – केरळ येथील अय्यप्पा मंदिरामध्ये १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांनी प्रवेश करू नये, अशी शबरीमला मंदिराची परंपरा आहे. त्यामुळे ५० वर्षे वयाच्या आतील महिलांनी मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर धर्मशास्त्रानुसार मंदिराचे शुद्धीकरण करण्याचा मंदिर प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्यच आहे, असे मत सनातन संस्थेच्या प्रवक्त्या अश्‍विनी कुलकर्णी यांनी ‘जय महाराष्ट्र’ या वाहिनीवरील चर्चासत्रात बोलतांना मांडले.

२ जानेवारीच्या पहाटे ५० वर्षांच्या खालील २ महिलांनी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून शबरीमला मंदिरामध्ये गुपचूप प्रवेश करून भगवान अय्यप्पांचे दर्शन घेतले. यामुळे परिसरामध्ये तणाव निर्माण झाला. त्यामुळे मंदिराचे शुद्धीकरण करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आला. मंदिर प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे समाजामध्ये वाद निर्माण झाला आहे, तसेच अनेकांनी याविषयी प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. या चर्चासत्रात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘जय महाराष्ट्र’चे विशाल पाटील यांनी केले.

‘नवीन वर्षाच्या प्रारंभी दोन महिलांनी केलेला प्रवेश हा ऐतिहासिक विजय आहे, तसेच महिलांना येणारी मासिक पाळी अपवित्र मानून मंदिर २ घंटे बंद ठेवून मंदिराचे शुद्धीकरण केले, यातून मंदिरातील पुजार्‍यांच्या मानसिकतेचे शुद्धीकरण करण्याची वेळ आली आहे’, असे मत हिंदु धर्माचा कोणताही अभ्यास नसलेल्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा हिंदुद्रोही तृप्ती देसाई यांनी मांडले.


Multi Language |Offline reading | PDF